HSC-SSC Result 2024 Maha Board: 'या' तारखेपर्यंत लागणारा बारावीचा निकाल? दहावीच्या निकालाची डेडलाईनही पाहा

HSC-SSC Result 2024 Maharashtra Board: यंदाच्या वर्षी बारावीच्या परीक्षेला 12 लाख विद्यार्थी बसले होते. तर दहावीच्या परीक्षेला 17 लाख विद्यार्थी बसले होते.

स्वप्निल घंगाळे | Updated: Apr 29, 2024, 07:54 AM IST
HSC-SSC Result 2024 Maha Board: 'या' तारखेपर्यंत लागणारा बारावीचा निकाल? दहावीच्या निकालाची डेडलाईनही पाहा title=
दोन्ही परीक्षांच्या निकालांच्या संभाव्या तारखा आल्या समोर

HSC-SSC Result 2024 Maharashtra Board: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (राज्य मंडळ) घेण्यात आलेल्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या निकालासंदर्भातील महत्त्वाची माहिती समोर आली आहे. या दोन्ही परीक्षांच्या निकालांच्या संभाव्य तारखा काय असतील याबद्दलचा तपशील उघड झाला आहे. बारावीचा निकाल 25 मे पूर्वी लावण्यासंदर्भात शिक्षण मंडळाचं नियोजन असून दहावीचा निकाल आजपासून साधारण दीड महिन्यामध्ये लावला जाईल, असं सांगितलं जात आहे. दहावीचा निकाल 6 जूनपूर्वी लावण्यासंदर्भात शिक्षण मंडळाचं नियोजन असल्याची माहिती समोर आली आहे. बारावीची (सर्वसाधारण, द्विलक्ष्यी आणि व्यवसाय अभ्यासक्रम) परीक्षा 21 फेब्रुवारी ते 19 मार्च या कालावधीत पार पडली. तर दहावीची परीक्षा 1 मार्च ते 26 मार्च या कालावधीत झाली. 

उत्तरपत्रिका तपासणीचे काम पूर्णत्वाकडे

राज्य शिक्षण मंडळाकडून निकाल वेळेत लावण्यासंदर्भातील नियोजन सुरु असून सध्या उत्तरपत्रिका तपासणीचे काम सुरु आहे. उत्तरपत्रिका तपासणीचे काम लवकरच पूर्ण होईल असं सांगण्यात आलं आहे. यंदाच्या वर्षी बारावीच्या परीक्षेला 12 लाख विद्यार्थी बसले होते. तर दहावीच्या परीक्षेला 17 लाख विद्यार्थी बसले होते. यंदा या परीक्षेसाठी झालेल्या विद्यार्थी नोंदणीतून दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांची संख्या दर वर्षीच्या तुलनेत वाढल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे यंदा अचानक विद्यार्थिसंख्या का वाढली, याचा अभ्यास राज्य मंडळाकडून करण्यात येत आहे.

यंदा नेमके किती विद्यार्थी परीक्षेला बसले?

दहावी आणि बारावीच्या यंदाच्या वर्षी झालेल्या परीक्षेसाठी अर्जनोंदणी प्रक्रिया ऑक्टोबरमध्ये सुरू करण्यात आली होती. दरवर्षी दहावीच्या परीक्षेसाठी सुमारे 15 लाख 75 हजार विद्यार्थी, तर बारावीसाठी सुमारे 15 लाख 60 हजार विद्यार्थी नोंदणी करतात. गेल्या वर्षी दहावीच्या 15 लाख 61 हजार विद्यार्थ्यांनी, तर बारावीच्या 14 लाख28 हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.

नक्की वाचा >> महत्त्वाची बातमी! लोकसभा निवडणुकीमुळे मुंबई विद्यापीठाने परीक्षा पुढे ढकलल्या; पाहा नवं वेळापत्रक

सदर आकडेवारीचा विचार केला तर यंदाच्या वर्षी म्हणझेच 2023-2024 च्या शैक्षणिक वर्षामध्ये या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांची संख्या तुलनेनं अधिक आहे. यंदाच्या वर्षी दहावीची विद्यार्थिसंख्या 16 लाख 10 हजार इतकी झाली. तर बारावीची विद्यार्थिसंख्या 15 लाख 15 हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केल्याचे दिसून आलं. 

आधी निकाल ऑनलाइन माध्यमातून जाहीर केले जातील त्यानंतर ते विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळा तसेच कॉलेजमध्ये उपलब्ध करुन दिले जातात.