सलमान खानसह डेब्यू; सुपरफ्लॉप करिअर, टीबीची लागण अन् अखेर 'या' अभिनेत्रीवर चाळीत राहण्याची वेळ

अभिनेत्रीला टीबीची लागण झाली आहे हे जेव्हा तिचा पती आणि सासू-सासऱ्यांना समजलं तेव्हा त्यांनी नातं तोडलं. यामुळे अभिनेत्री मुंबईत एकटी पडली होती.   

शिवराज यादव | Updated: May 16, 2024, 06:40 PM IST
सलमान खानसह डेब्यू; सुपरफ्लॉप करिअर, टीबीची लागण अन् अखेर 'या' अभिनेत्रीवर चाळीत राहण्याची वेळ title=

बॉलिवूडमध्ये प्रत्येक वर्षी नवनवे चेहरे आपलं नशीब आजमावण्यासाठी येतात. यातील काहीजण यशस्वी होतात तर काही चेहरे मात्र लोकांच्या लक्षात येण्याआधीच गायब होतात. मोठ्या पडद्यापासून दूर गेलेले हे अभिनेते नंतर सर्वसामान्यांप्रमाणे आयुष्य जगू लागतात. पण यावेळी त्यांच्यातील अनेकांना संघर्ष करावा लागतो. या संघर्षावर मात करण्यात काहीजण यशस्वी होतात, तर काही त्याखाली दबले जातात. बॉलिवूड असे अनेक अभिनेते, अभिनेत्री आहेत जे पहिल्या चित्रपटानंतर कुठे गेले हे कोणालाही समजलं आहे. 

आज अशाच एक अभिनेत्रीबद्दल आपण जाणून घेऊयात जी सलमान खानसोबत डेब्यू करत मोठ्या पडद्यावर झळकली होती. 1995 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'वीरगती' चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. चित्रपट फ्लॉप झाला, पण अभिनेत्री चर्चेत आली होती. आम्ही बोलत आहोत दुसरे तिसरे कोणी नसून पूजा डडवाल हिच्याबद्दल. 

पूजा डडवाल अनेक वर्षं मोठ्या पडद्यापासून दूर होती. 2019 मध्ये वैद्यकीय उपचारासाठी पैसे नसल्याने ती चर्चेत आली होती. जानेवारी 1977 मध्ये जन्मलेल्या पूजाला नेहमीच अभिनेत्री व्हायचं होतं.  शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर तिने अभिनयाचं प्रशिक्षण घेतलं. वयाच्या 17 व्या वर्षी तिला चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. पहिल्याच चित्रपटात तिला सलमान खानसह काम करण्याची संधी मिळाली. सलमान खानसोबत 'वीरगती' चित्रपटातून तिने पदार्पण केलं. हा चित्रपट सुपर फ्लॉप ठरला आणि पूजा डडवालच्या पदरी अपयश आलं. 

पहिला चित्रपट फ्लॉर ठरल्यानंतर पूजा डडवालला बॉलिवूडमधूल चांगल्या ऑफर्स मिळाल्या नाहीत. यानंतर तिने टीव्हीकडे लक्ष वळवलं. 1999 मध्ये 'आशिकी' आणि 2001 मध्ये 'घराना'मध्ये ती दिसली होती. बॉलिवूड आणि टीव्हीवर काम करूनही पूजा डडवाल यशस्वी होऊ शकली नाही. यानंतर तिने लग्न करून आयुष्यात स्थैर्य आणण्याचं ठरवलं.

पूजा लग्नानंतर गोव्याला गेली. तिथे तिने पतीला कॅसिनोत मदत केली. 2018 मध्ये जेव्हा तिला आजाराने घेरलं तेव्हा गोष्टी बिघडू लागल्या. पूजा टीबीने त्रस्त होती आणि तिच्या या प्रकृतीची माहिती तिच्या सासरच्या मंडळींना आणि पतीला मिळताच त्यांनी तिच्याशी असलेलं नातं संपवलं आणि मुंबईत एकटं सोडलं.

पूजा मुंबईत कुटुंब आणि आर्थिक मदतीविना एकटी पडली होती. यावेळी राजेंद्र सिंह यांनी तिला शासकीय रुग्णालयात दाखल केलं. पण स्थिती आणखी बिघडू लागल्यानंतर तिने इंडस्ट्रीकडे मदतीची विनंती केली. तिने यूट्यूबवर एका व्हिडिओ संदेशाद्वारे सलमान खानकडे आर्थिक मदत मागितली. तिचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सलमान खानने तिच्या पुढील सहा महिन्यांच्या उपचाराचा सर्व खर्च उचलला.

पूजा प्रकृती बरी झाल्यानंतर मुंबईतील एका चाळीत राहायला गेली. तिने 2020 मध्ये 'शुक्राना: गुरु नानक देव जी' या पंजाबी चित्रपटाद्वारे पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला. पण तिच्या पदरी पुन्हा एकदा अपयश आलं. पूजाला तिचा मित्र आणि दिग्दर्शक राजेंद्र सिंग यांनी उदरनिर्वाहासाठी टिफिनचा व्यवसाय सुरू करण्याचा सल्ला दिला. आजही पूजा मुंबईत एका चाळीत राहते आणि तिथून टिफिन पुरवण्याचा व्यवसाय करते.