निवडणूक साक्षरतेसाठी मुंबई विद्यापीठाचं महत्वाचं पाऊल, 400 हून अधिक महाविद्यालयांचा सहभाग

Mumbai University Electoral Literacy: विविध महाविद्यालयांच्या सहकार्याने गेल्या सहा महिन्यात विविध  कार्यक्रमांचे आयोजन करून निवडणूक साक्षरता वाढीस लावण्यात मोलाची कामगिरी बजावली आहे.

Pravin Dabholkar | Updated: May 18, 2024, 07:54 PM IST
निवडणूक साक्षरतेसाठी मुंबई विद्यापीठाचं महत्वाचं पाऊल, 400 हून अधिक महाविद्यालयांचा सहभाग title=
Mumbai University Electoral Literacy

Mumbai University Electoral Literacy: सार्वत्रिक निवडणूक २०२४ या अनुषंगाने सर्व सामान्य जनता व विद्यार्थ्यांमध्ये निवडणूक साक्षरता व्हावी याकरिता मुंबई विद्यापीठाने विविधांगी कार्यक्रमांचे आयोजन करून लक्षणीय कामगिरी केली आहे. भारत निवडणूक आयोग आणि शिक्षण मंत्रालय, भारत सरकार यांच्यामध्ये झालेल्या सामंजस्य करारानुसार मुंबई विद्यापीठाने मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांच्या सहकार्याने गेल्या सहा महिन्यात विविध  कार्यक्रमांचे आयोजन करून निवडणूक साक्षरता वाढीस लावण्यात मोलाची कामगिरी बजावली आहे.

राज्य निवडणूक आयोगाच्या सहकार्याने मुंबई विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन व विस्तार विभागाच्या वतीने निवडणूक साक्षरता व जागृती मोहीमेच्या माध्यमातून  निवडणूक  साक्षरतेचे विविध कार्यक्रम राबवण्यात आले.  या निवडणूक साक्षरता मोहिमेचे उद्घाटन गेल्या डिसेंबर महिन्यात मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले होते. त्यावेळी कुलगुरूंनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत आजमितीस मुंबई विद्यापीठाच्या शैक्षणिक विस्तार उपक्रमांमध्ये सहभाग घेतलेल्या सुमारे चारशे महाविद्यालयांनी या मोहिमेत सहभाग घेतला आहे.

 शासनाच्या प्रयत्नांना हातभार 

भारताच्या इतर भागांप्रमाणेच मुंबईतही नागरिकांमध्ये निवडणूक साक्षरता वाढवण्यासाठी शासनामार्फत प्रयत्न केले जात आहेत. सार्वत्रिक निवडणूक 2024  मध्ये नवीन मतदार नोंदणी करणे व मतदानात जास्तीत जास्त लोकांनी सहभाग घ्यावा या हेतूने निवडणूक साक्षरता अत्यंत महत्वाची बनली आहे. एकंदरीत शासकीय प्रणाली, मतदान प्रक्रिया, निवडणूक प्रक्रिया या बाबतची समज व ज्ञान जनतेला व्हावे हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेऊन विद्यापीठाने  अत्यंत परिश्रमपूर्वक निवडणूक साक्षरता उपक्रम हाती घेऊन  शासनाच्या प्रयत्नांना हातभार लावला आहे.

विद्यार्थ्यांची नोंद

मतदान या विषयावर पथनाट्य, भित्तीचित्र प्रदर्शन, प्रबोधन गीते, वक्तृत्व, पोवाडा, सर्वेक्षण, वक्तृत्व, परिसंवाद आणि परिषदा अशा विविध उपक्रमांद्वारे जनतेमध्ये निवडणूक साक्षरता वाढीस लागण्यास मुंबई विद्यापीठाने नियोजन पूर्वक कार्यक्रमांची आखणी करून बाजी मारली आहे. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये निवडणूक साक्षरता वाढवण्यासाठी विविध विद्या शाखेतील विद्यार्थ्यांसाठी मतदार शिक्षण व निवडणूक साक्षरतेचा अभ्यासक्रम तयार करून आवश्यक ते श्रेयांक देण्याची तरतूद मुंबई विद्यापीठाने केली आहे. निवडणूक साक्षरतेच्या अनुषंगाने अध्यापन करण्यासाठी शिक्षकांचे प्रशिक्षण घेण्यात आले आहे. युनिफाईड डिस्ट्रिक इन्फॉर्मेशन सिस्टीम फॉर एज्युकेशन (USISE), ऑल इंडिया सर्वे फॉर हायर एज्युकेशन (AISHE) आणि अन्य डेटाबेस सहाय्याने महाविद्यालयातील सतरा वर्ष पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची नोंद घेऊन 1 जानेवारी, 1 एप्रिल, व 1 ऑक्टोबर या दिवशी आणि मतदार याद्यांच्या वार्षिक अवलोकनावेळी पात्र विद्यार्थ्यांना ऑनलाइन मतदार नोंदणी करण्याच्या अनुषंगाने संस्थात्मक कार्यप्रणाली तयार करण्यात आली होती. त्याचबरोबर मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची नोंद नव्याने मतदार म्हणून करण्यास शासनाच्या सहकार्याने विशेष मोहीम विद्यापीठामार्फत राबवण्यात आली होती. 

इलेक्टोरल लिटरसी क्लबची स्थापना 

नवीन भावी मतदारांना देशाच्या निवडणूक व्यवस्थेची पूर्णपणे परिचित करण्यासाठी त्याचबरोबर त्यांच्यामध्ये मतदार नोंदणी करण्याची इच्छा निर्माण करण्यासाठी तसेच मतदार जागृती करण्यासाठी विद्यार्थ्यांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात घेण्यात आलेले आहेत. तसेच इलेक्टोरल लिटरसी क्लबचे उपक्रम आयोजित करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत विविध महाविद्यालयांमध्ये इलेक्टोरल लिटरसी क्लबची स्थापना करण्यात आलेली आहे. मुंबई विद्यापीठाच्या विविध कार्यक्रमांमधून विद्यार्थ्यांना मतदानाची शपथ देण्यात आली आहे त्याचबरोबर शासनाच्या सहकार्याने ईव्हीएम व्हीव्हीपॅटची प्रात्यक्षिक दाखवण्यात आली आहेत व मुलांमार्फत मॉक मतदानाचे आयोजन करण्यात आले आहे.

 विविध उपक्रमांचे आयोजन

राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त देखील व्यापक उपक्रम आयोजित करण्यात आलेले होते. यामध्ये मतदार जागृती मोहीम हाती घेऊन रॅलीचे आयोजन, सुलेखन स्पर्धा, सृजनशील लेखन स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, रांगोळी स्पर्धा व भित्ती चित्र स्पर्धा अशा विविध स्पर्धांचे आयोजन मुंबई विद्यापीठाने सर्व जिल्ह्यांमध्ये केले होते. निवडणूक साक्षरतेला चालना देण्यासाठी व महाविद्यालयातील इतर विद्यार्थ्यांना प्रशिक्षित करण्यासाठी कार्यशाळा आणि प्रशिक्षण सत्रे आयोजित करण्यात आली होती. अश्या पद्धतीने  मुंबई विद्यापीठाने या कार्यक्रमांचे नियोजन करून मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी व प्र. कुलगुरू प्राचार्य डॉ. अजय भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याचे आजीवन अध्ययन आणि विस्तार विभागाचे संचालक प्रा. बळीराम गायकवाड यांनी सांगितले. या सर्व कार्यक्रमाच्या यशस्वी नियोजनासाठी प्रा. कुणाल जाधव यांनी अथक प्रयत्न केले असल्याचेही त्यांनी सांगितले.