मतदानासाठी गेलेल्या मतदाराला आमदाराकडून मारहाण, व्हिडीओ आला समोर

आंध्र प्रदेशातील गुंटूर जिल्ह्यातील एका मतदान केंद्रावर ही घटना घडली. याचा एक व्हिडीओही सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

Updated: May 13, 2024, 04:17 PM IST
मतदानासाठी गेलेल्या मतदाराला आमदाराकडून मारहाण, व्हिडीओ आला समोर title=

YSRCP MLA Shivakumar Slaps Voter : सध्या संपूर्ण देशभरात लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदान पार पडत आहे. पण याचदरम्यान आंध्र प्रदेशातील एका आमदाराने मतदान करण्यासाठी आलेल्या नागरिकाला मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. आंध्र प्रदेशातील गुंटूर जिल्ह्यातील एका मतदान केंद्रावर ही घटना घडली. याचा एक व्हिडीओही सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

या व्हिडीओत वायएसआर काँग्रेस पक्षाचे तेनाली येथील आमदार ए शिवकुमार हे मतदान करण्यासाठी जाताना दिसत आहे. यावेळी ते मतदान केंद्रावर मतदानासाठी पोहोचले. त्यावेळी शिवकुमार हे मतदानाची रांग मोडून पुढे जाण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे. यावरुन एका मतदाराने आक्षेप घेतला. त्यानंतर शिवकुमार यांनी त्या मतदाराच्या जोरदार कानशिलात लगावली.  

कार्यकर्ते त्या व्यक्तीला बेदम मारहाण

यानंतर तो व्यक्तीही आमदार शिवकुमार यांच्या कानशिलात लगावतो. यावेळी शिवकुमार यांच्यासोबत असलेले कार्यकर्ते त्या व्यक्तीला बेदम मारहाण करतात. यावेळी तिथे उपस्थित असलेले लोक ही घटना बघत असल्याचे दिसत आहे. तर तिथे असलेल्या स्त्रिया या प्रकारानंतर जागेवरुन उठून जात असल्याचे दिसत आहे. 

सध्या या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओवर अनेक नेटकरी संतप्त प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. मतदान करण्यासाठी आलेला व्यक्ती आणि शिवकुमार यांच्यातील वाद नेमका कशामुळे झाला, याबद्दलची माहिती अद्याप समोर आलेली नाही. तसेच याबद्दल आमदार शिवकुमार यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. या प्रकरणी पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु असल्याची माहिती सांगितली जात आहे. 

10 राज्यातील 96 मतदारसंघात मतदान

दरम्यान लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी आज (13 मे) 10 राज्यातील 96 मतदारसंघात मतदान पार पडत आहे. आंध्र प्रदेश आणि ओडिशामध्ये लोकसभा आणि विधासभेसाठी एकाचवेळी मतदान होत आहे. आंध्र प्रदेशच्या 175 विधानसभा जागांसाठी आणि ओडिशाच्या 28 विधानसभा जागांवर मतदान प्रक्रिया पार पडत आहे. आंध्र प्रदेशमध्ये वायएस जगन मोहन रेड्डी यांच्या नेतृत्वाखालील वायएसआर काँग्रेस पक्षाला भाजप आणि चंद्राबाबू नायडू यांच्या नेतृत्वाखालील तेलगू देसम पक्षाच्या युतीचे आव्हान आहे.