Weather Update : मे महिना आग ओकणार, 6 मे पासून हवामानात मोठा बदल

Weather Update :  राज्यात गेल्या काही दिवसांपासून तापमानात मोठा बदल झालेला पाहायला मिळत आहे. 40 डिग्रीस सेल्सियसवर पारा गेला आहे. मे महिना प्रचंड ऊन जाणवणार आहे. 

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: May 5, 2024, 10:38 AM IST
Weather Update : मे महिना आग ओकणार, 6 मे पासून हवामानात मोठा बदल  title=

मे महिना सुरु झाला असून राज्यात तापमानात मोठा बदल झाला आहे. पहिलाच आठवडा नागरिकांसाठी खूप त्रासदायक ठरला आहे. अक्षरशः अंगातून घामाच्या धारा बाहेर पडत आहेत. असं असताना हवामान खात्याने राज्यात उष्णतेची लाट कायम राहण्याची दाट शक्यता वर्तवली आहे. 

मुंबई शहर आणि उपनगरामध्ये उष्णतेची लाट कायम राहील. तसेच उत्तर कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागांमध्ये उन्हाचा प्रकोप पाहायला मिळेल, अशी माहिती हवामान खात्याने दिली आहे. मुंबईमध्ये कमाल तापमान ३८ अंश सेल्सिअस आणि किमान तापमान हे २७ अंश सेल्सिअस इतके राहिल. तर कोकणात उष्ण आणि दमट असे वातावरण राहिल. 

(हे पण वाचा - महाष्ट्राच्या हवामानात विचित्र बदल; उष्ण- दमट वातावरण, सोसाट्याचा वारा आणि तुफान पाऊस) 

तसेच दक्षिणेकडील काही राज्यांना या आठवड्यात उष्णतेपासून दिलासा मिळण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. उन्हाचा तडाखा वाढल्यामुळे  राज्यात उष्माघाताचे रुग्ण देखील वाढत आहेत. अशावेळी नागिरकांनी स्वतःची विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन हवामान खात्याकडून केले जात आहे. दुपारच्यावेळी गरज नसल्यास घराबाहेर पडू नये तसेच पाण्याचे प्रमाण वाढवावे. सुती कपडे परिधान करावेत. असे आवाहन हवामान खात्याने दिले आहे. 

हवामान खात्यातर्फे पावासासंदर्भात अलर्ट जारी करण्यात आला आहे. मराठवाड्यात पुढचे काही दिवस वादळी वा-यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मराठवाड्यातील एक, दोन जिल्ह्यात विजांचा कडकडाटासह पाऊस पडणार आहे.  तर, काही ठिकाणी हलक्या स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे.  कोकणातील तुरळक क्षेत्रात उष्ण आणि दमट परिस्थिती राहण्याची शक्यता आहे असा हवामान विभागाचा अंदाज आहे. 

मुंबई समुद्र किनारी उंच लाटा,पर्यटक समुद्रात

मुंबईत समुद्रकिनाऱ्यावर आज उंच लाटा येण्याची शक्यता हवामानाने वर्तवलेली आहे आणि त्याच अनुषंगाने मुंबई महापालिका असेल किंवा पोलीस यंत्रणा असेल त्यांना अलर्ट करण्यात आला आहे. दादर चौपाटी या ठिकाणी मात्र अनेक पर्यटक आहेत ते समुद्रात जात असल्याचा पाहायला मिळते आहे यामुळे एखादी दुर्घटना होण्याची शक्यता आहे. या ठिकाणी कुठलाही पोलीस अथवा महापालिकेचे कर्मचारी सुरक्षेसाठी तैनात असल्याचं दिसत नाही आणि त्यामुळेच पर्यटक हे समुद्रात जात असल्याचा पाहायला मिळते आहे. हवामानात झपाट्याने होणाऱ्या बदलामुळे नागरिकांच्या आरोग्यावर मोठा परिणाम होत आहे.