तब्बल 8 वेळा मत देणाऱ्या व्यक्तीवर अटकेची कारवाई; कुठे घडला हा धक्कादायक प्रकार?

Loksabha Election 2024 : महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदान सुरु झालं आहे. मतदानाचा हक्क बजावताना एका व्यक्तीने तब्बल 8 वेळा मतदान केल्याप्रकरणी त्याला अटक करण्यात आली आहे. 

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: May 20, 2024, 07:44 AM IST
तब्बल 8 वेळा मत देणाऱ्या व्यक्तीवर अटकेची कारवाई; कुठे घडला हा धक्कादायक प्रकार? title=

देशभरात लोकसभा निवडणुकांची लगबग पाहायला मिळत आहे. आज महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील मतदान होत आहे. 18 वर्षांपुढील व्यक्ती आपल्या मतदानाचा हक्क बजावताना दिसत आहे. अशातच एका तरुणाने तब्बल 8 वेळा मतदान केलं आहे. या मतदानाचा व्हिडीओ व्हायरल झाला असून तरुणाला अटक करण्यात आलं आहे. 

कुठे घडला हा प्रकार? 

उत्तर प्रदेशातील एटा मतदान केंद्रामध्ये एका तरुणाने तब्बल 8 वेळा मतदान केलं आहे. या संपूर्ण प्रकाराचा तरुणाने व्हिडीओ बनवला आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ झपाट्याने व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ काँग्रेस नेता राहुल गांधी आणि सपाचे अखिलेश यादव यांनी शेअर केला आहे. 

मतदाराला अटक 

हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर एटा जिल्ह्यातील नयागाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आठ वेळा मतदान करणाऱ्या व्यक्तीची ओळख खिरियावरून झाली आहे. पमारान गावातील राजन सिंह असं याचं नाव आहे. राजनला पोलिसांनी अटक केलं आहे. 

व्हिडीओत काय?

व्हिडिओमध्ये एक तरुण ईव्हीएमजवळ उभा आहे. या व्हिडिओमध्ये तो 8 वेळा मतदान केल्याचा दावा करत आहे. समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी सोशल मीडिया अकाउंटवर शेअर करुन निवडणूक आयोगाकडे कारवाई करण्याची मागणी केली होती. 

अखिलेश यादव यांनी शेअर केला व्हिडीओ

समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव यांनी रविवारी सोशल मीडियावर असा एक व्हिडिओ टाकला त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या निष्पक्षतेवर आणि पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या व्हिडिओमध्ये एक तरुण एकामागोमाग एक असे आठवेळा वेगवेगळ्या नावांनी बूथवर जातो आणि मतदान करतो. तो मतदान करण्याचा व्हिडिओही बनवत आहे. तसेच काँग्रेसच्या X अकाऊंटवरुनही व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.