कोणालाही धारावीबाहेर पाठवणार नाही; स्थानिकांच्या घरांबाबत आणखी काय म्हणाले मुख्यमंत्री शिंदे?

Mumbai Dharavi Redevelopment News : घर मिळणार, दुकानही मिळणार... ; धारावीतील रहिवाशांसाठी मुख्यमंत्र्यांचं आश्वासक वक्तव्य   

सायली पाटील | Updated: May 15, 2024, 01:40 PM IST
कोणालाही धारावीबाहेर पाठवणार नाही; स्थानिकांच्या घरांबाबत आणखी काय म्हणाले मुख्यमंत्री शिंदे?  title=
Mumbai news cm eknath shinde Assures dharavi people to give their own house and shop at same place

Mumbai Dharavi Redevelopment News : मुंबईत गेल्या काही वर्षांमध्ये पुनर्विकासाअंतर्गत शहरातील बहुतांश भागांचा विकास करण्यात आला. असंख्य चाळी आणि बैठ्या वस्ती जाऊन तिथं गगनचुंबी इमारती आणि सदनिका उभारण्यात आल्या आणि शहरातील नागरिकांना हक्काचं आणि आकारानं मोठं असणारं घर, सोबतच काही सोयीसुविधाही मिळाल्या. शहराच्या विकासाची ही प्रक्रिया अद्यापही सुरुच असून, आता सर्वांच्या नजरा धारावीच्या पुनर्विकासाकडे लागल्या आहेत. 

अनेक वर्षांपासून धारावीच्या पुनर्विकासावर (dharavi Redevelopment) चर्चा झाली, काही विकासकही आले. सिंगापूरच्या धर्तीवर धारावीचा पुनर्विकास होणार असं म्हटलं गेलं. सध्या त्यच दृष्टीनं पावलं उचलली जात असून, (Loksabha Election 2024) लोकसभा निवडणुकीमध्येही हा मुद्दा दुर्लक्षित राहिलेला नाही. 

धारावीतील नागरिकांचे प्रश्न, त्यांच्या हक्काच्या घराचा आणि पुनर्विकासाचा मुद्दा या सर्व गोष्टींचं महत्त्वं लक्षात घेता खुद्द मुख्यमंत्री एकनाश शिंदे यांनी नागरिकांना आश्वस्त केलं आहे. दक्षिण मध्य मुंबईतील महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळे यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री धारावीत पोहोचले होते. येथील 90 फीट रोडवर आयोजित करण्यात आलेल्या प्रचारसभेवेळी ते या मुद्द्यावर स्पष्टपणे बोलताना दिसले. यावेळी प्रचारसभेसाठी तामिळनाडूचे भाजप प्रदेशाध्यक्ष के अन्नामलाई, भाजप नेते अशोक चव्हाण यांचीही या सभेसाठी उपस्थिती होती. 

धारावीबाहेर कोणालाही पाठवणार नाही... 

धारावीतील नागरिकांना त्याच परिसरात घरं दिली जाणार असून, कोणालाही धारावीबाहेर जावं लागणार नाही असं आश्वासन त्यांनी यावेळी स्थानिकांना दिलं. धारावीमध्ये दुकान असणाऱ्यांना इथंच दुकानासाठीची जागा दिली जाणार असल्याचं म्हणत मुख्यमंत्र्यांनी स्थानिकांना विश्वासात घेतलं. शिंदेंनी धारावीवासियांना दिलेला हा विश्वास पाहता आता येत्या काळात इथं पुनर्विकासाच्या कामांना वेग येणार का, याकडे अनेकांचच आणि प्रामुख्यानं स्थानिकांचं लक्ष राहणार आहे. 

धारावी मॉडेलवरून वाद... 

एकिकडे धारावीच्या पुनर्विकासाचा मुद्दा चर्चेचा विषय ठरत असतानाच दुसरीकडे कोरोना काळातील (Dharavi Model) धारावी मॉडेलवरूनही आता राजकीय मतभेद सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. (Corona) कोरोना काळात मुंबईमध्ये राबवण्यात आलेल्या धारावी मॉडेलवरून (South Central Mumbai) दक्षिण मध्य मुंबईतील शिवसेनेच्या दोन्ही गटाच्या उमेदवारांमध्ये चांगलीच जुंपली आहे. 

हेसुद्धा वाचा : IT Raid in Nanded : व्यापारी कुटुंबाकडून 170 कोटींची मालमत्ता, 8 किलो सोनं, 14 कोटींची रोकड जप्त ; आयकर विभागानं 'असा' रचला सापळा 

'धारावीतील माझ्या कामाचं क्रेडिट उद्धव ठाकरेंनी घेतलं', असा आरोप विद्यमान खासदार आणि शिवसेनेच्या शिंदे गटाचे उमेदवार राहुल शेवाळे यांनी केला. झी 24 तासच्या 'निवडणूक यात्रा' या कार्यक्रमात बोलताना त्यांनी ठाकरेंवर निशाणा साधला. कोरोना काळात कोणी काम केलंय, हे लोकांना चांगलंच माहितीये, त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी प्रत्येक कुटुंबाच्या मनात स्थान निर्माम केलं होतं असा पलटवार ठाकरे गटाच्या अनिल देसाई यांनी केला. त्यामुळं आता कोरोना काळातील धारावी मॉडेलही वादाचा विषय ठरताना दिसत आहे.