YouTube वर पाहून घरातच छापल्या 100, 200 च्या नोटा; आरोपीची हुशारी पाहून पोलिस शॉक

नवी मुंबईत एका तरुणाला अटक करण्यात आली आहे. या तरुणाने YouTube वर पाहून घरातच बनावट नोटा छापल्या आहेत. 

Updated: May 17, 2024, 06:16 PM IST
YouTube वर पाहून घरातच छापल्या 100, 200 च्या नोटा; आरोपीची हुशारी पाहून पोलिस शॉक title=

Navi Mumbai Crime News:  बनावट नोटा छापणाऱ्या एका तरुणाला नवी मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. या तरुणाने YouTube वर पाहून घरातच 100, 200 च्या नोटा छापल्या होत्या तसेच त्या चलनात देखील आणल्या होत्या. तरुणाने या नोटा नेमक्या कशा छापल्या याची प्रोसेस पाहून पोलिसही हडबडले आहेत. 

नवी मुंबई पोलिसांच्या मध्यवर्ती गुन्हे शाखेने तळोजा भागातील तोंडरे गावातील एका घरावर छापा मारुन बनावट नोटा छापणाऱ्या एका तरुणाला अटक केली आहे. प्रफुल्ल गोविंद पाटील ( वय 26) असे या आरोपीचे नाव आहे. प्रफुल्ल याने YouTube वर पाहून आपल्या घरातच बनावट नोटा छापल्याचे उघडकीस आले आहे. पोलिसांनी त्याच्या घरातून 2 लाख 3 हजार रुपये किमंतीच्या बनावट नोटा तसेच बनावट नोटा तयार करण्यासाठी लागणारे साहित्य जफ्त केले आहे.  

याचबरोबर या बनवत नोटा विकणाऱ्या त्याचा 19 वर्षीय साथीदार प्रतीक येळे याला पोलिसांनी अटक  केली आहे. या कारवाईत अटक करण्यात आलेला आरोपी प्रफुल्ल गोविंद पाटील हा तळोजा एमआयडीसीतील तोंडरे गावात राहत होता. तसेच तो घरामध्येच कॉम्फ्यूटर व प्रिंटरद्वारे बनावट नोटा तयार करुन त्या नोटा आपल्या एजंटमार्फत बाजारात चलनात आणत होता. याबाबतची माहिती गुन्हे शाखा मध्यवर्ती कक्षाला मिळाली होती. 

सदर माहितीच्या आधारे गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त अजयकुमार लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक हर्षल कदम व त्यांच्या पथकाने बुधवारी दुपारी तोंडरे गावातील आरोपी राहत असलेल्या घरावर छापा मारला.  यावेळी आरोपी प्रफ्ल्लु पाटील हा कॉम्फ्यूटर व प्रिंटरद्वारे घरामध्येच नोटा छापत असल्याचे आढळून आले. त्यानंतर गुन्हे शाखेने सदर घरामध्ये 2 लाख 3 हजार 200 रुपयांच्या 50, 100 आणि 200 रुपयांच्या छापलेल्या बनावट नोटा जफ्त केल्या आहेत. मागील तीन चार महिन्यापासून प्रफुल्ल पाटील याने अशा पद्धतीने बनावट नोटा तयार करण्यास सुरुवात केल्याचे तपासात आढळुन आले आहे. त्यामुळे त्याने अतापर्यंत किती बनावट नोटा बाजारात आणल्या याबाबत पोलिसांकडुन अधिक तपास करण्यात येत आहे.  

बनावट नोटा छापणाऱ्या टोळीचा पर्दाफाश 

काही दिवसांपूर्वी मावळमधील देहूरोड पोलिसांनी बनावट नोटा छापणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला होता. सहा जणांच्या टोळक्याने प्रिंटिंग प्रेसचा व्यवसाय सुरू करायचा म्हणून पुण्यातून मशीन घेतली, मात्र व्यवसाय तेजीत चालत नसल्यानं त्यांनी बनावट नोटा छापायला सुरुवात केली. बनावट नोटा छापण्यासाठी त्यांनी चीनमधून कागद मागवला आणि 500 रुपयांच्या बनावट नोटा छापायला सुरुवात केली. 70 हजारांच्या नोटाही छापल्या. मात्र त्या विकत असताना देहूरोड पोलिसांनी त्यांना बेड्या ठोकल्या आणि टोळीचा पर्दाफाश केला. यात आयटी डिप्लोमा केलेल्या तरुणाचाही समावेश आहे.