'मोदींनी भारताला अश्मयुगात नेलं, देशाला बुरसटलेल्या मार्गाने..'; राऊतांचा हल्लाबोल

Sanjay Raut On PM Modi Political Stand: "भारताची फाळणी झाली म्हणून अजून शोक करणाऱ्यांनी लक्षात घ्यावे की, मोदी काळात 40 हजार वर्ग किलोमीटर जमीन चीनने घुसखोरी करून गिळली आहे व त्यावर मोदी बोलायला तयार नाहीत," असं राऊत म्हणालेत.

स्वप्निल घंगाळे | Updated: May 5, 2024, 08:46 AM IST
'मोदींनी भारताला अश्मयुगात नेलं, देशाला बुरसटलेल्या मार्गाने..'; राऊतांचा हल्लाबोल title=
राऊत यांनी मोदींवर निशाणा साधला

Sanjay Raut On PM Modi Political Stand: "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकशाहीशी काहीच घेणे देणे नाही. लोकशाहीच्या छातीवर पाय ठेवून त्यांनी निवडणूकच हायजॅक करायचे ठरवले. सुरत व इंदूर येथे काँग्रेस उमेदवारास बाद करून भाजपने त्यांचे उमेदवार विजयी घोषित करून घेतले. लोकशाहीचा उघडपणे गळा घोटण्याचाच हा प्रकार आहे, अशी घणाघाती टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे. 

निवडणुकांत मतदान होऊ न देता भाजपला निवडणूक ताब्यात घ्यायची आहे

"पंतप्रधान मोदी व त्यांच्या लोकांना देशातील लोकसभा निवडणुका ‘हायजॅक’ करायच्या आहेत. सुरत येथील लोकसभा निवडणूक भाजपने बिनविरोध जिंकली. काँग्रेसच्या उमेदवाराचा अर्ज बाद केला. उरलेल्या उमेदवारांना माघार घ्यायला लावली व जिल्हाधिकाऱ्यांनी भाजप उमेदवारास विजयी घोषित केले. सुरतचीच पुनरावृत्ती मध्य प्रदेशातील इंदूर येथे घडली. काँग्रेसच्या उमेदवाराचा अर्ज रिंगणात राहणार नाही याची काळजी भाजपकृत प्रशासनाने घेतली. उरलेल्यांना माघार घ्यायला लावून इंदूरलाही भाजप उमेदवारास विजयी घोषित केले. भविष्यात अनेक मतदारसंघांत हे असेच घडेल असे भाजपचे नेते छातीठोकपणे सांगतात. याचा अर्थ निवडणुकांत मतदान होऊ न देता भाजपला निवडणूक ताब्यात घ्यायची आहे. निवडणुकीच्या रिंगणात उतरून, लढून जिंकण्याची भाजपची उमेद संपली आहे. पैसा व दहशत याचा वापर करून त्यांना उमेदवार विजयी करायचे आहेत. संसदेतून एकाच फटक्यात विरोधकांचे 150 खासदार निलंबित करणारे सरकार कोणत्याही थराला जाऊ शकते. चित्र तरी तेच दिसत आहे," असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

उद्योगपती मित्रांची 28 लाख कोटींची कर्जे माफ पण शेतकऱ्यांसाठी एमएसपी नाही

"पंतप्रधानपदास न शोभणारी विधाने मोदी रोज उठून करीत आहेत. काँग्रेसमुक्त भारत हे त्यांचे 2014 पासूनचे स्वप्न, पण काँग्रेस त्यांच्या मानेवरच बसली व मोदी-शहांना रोज उठून काँग्रेसवरच बोलावे लागते. काँग्रेस रोज मजबूत होत आहे व त्याच भयातून मोदी काँग्रेसवर घसरत आहेत," असंही राऊत यांनी 'रोखठोक'मधून म्हटलं आहे. "काँग्रेसच्या आर्थिक धोरणामुळे देशाचा विकास झाला नाही असे जार्ज फर्नांडिसही जनता पक्षाच्या काळात रोज बोलत होते, पण त्यांचे सरकार असताना विकासाला खीळ बसली व जनता पक्षाचे काँग्रेसविरोधी सरकार धड दोन वर्षेही चालले नाही. गुजरातचे मोरारजी देसाई तेव्हाचे पंतप्रधान. त्याच गुजरातचे मोदी हे दहा वर्षे पंतप्रधान. मोदी यांच्या काळात महागाईपासून बेरोजगारीपर्यंत ओझी वाढत गेली. मोदींनी आपल्या उद्योगपती मित्रांची 28 लाख कोटींची कर्जे माफ केली, पण शेतकऱ्यांच्या बाबतीत न्यूनतम आधार मूल्याचा निर्णय ते घेऊ शकले नाहीत," असा टोला राऊत यांनी लगावला आहे.

लसीमुळे झालेले मृत्यू हाच विकास मानायचा का?

"कोविड काळात लसीच्या प्रमाणपत्रांवर मोदींनी स्वत:चा फोटो छापून प्रचार केला, पण त्या कोविशिल्ड लसीमुळेच कोट्यवधी लोकांचे प्राण गेले, असा धक्कादायक खुलासा लस बनविणाऱ्या कंपनीने केला. म्हणजे आधी कोविडचे बळी गेले व नंतर रोगापेक्षा भयंकर उपचार लोकांच्या माथी मारून पंतप्रधानांनी मृत्यूचा कारखाना उघडला व त्या प्रत्येक ‘डेथ वॉरंट’वर निर्लज्जपणे स्वत:चा फोटो छापला. हाच विकास मानायचा काय?" असा सवाल राऊत यांनी केला आहे.

बलात्कारी लोकांना सोबत घ्यायलाही तयार

"मोदी यांनी गेल्या दहा वर्षांत देशाला व जनतेला फसवले व तिसऱ्यांदा सत्तेत येण्यासाठी ते फसवाफसवीच करत आहेत. मोदी म्हणजे विसंगतीचे हायब्रिड बियाणे. त्यांच्या चेहऱ्यावर मुखवटेच आहेत. त्यांनी भ्रष्टाचार मुक्तीपासून आर्थिक सुबत्तेची स्वप्ने दाखवली. त्यातले काहीच खरे निघाले नाही. भ्रष्टाचाराच्या चिखलात जुन्याच डुकरांसह ते रममाण झाल्याचे चित्र धक्कादायक आहे. मोदी यांना कोणत्याही मार्गाने सत्ता टिकवायची आहे व त्यासाठी ते महिलांवर अत्याचार करणाऱ्या भयंकर बलात्कारी लोकांना सोबत घ्यायलाही तयार आहेत. कर्नाटकात त्यांनी प्रज्ज्वल रेवन्ना या उमेदवारासाठी मते मागितली. रेवन्ना हे माजी पंतप्रधान देवेगौडा यांचे नातू. या रेवन्नाने गेल्या काही वर्षांत शेकडो महिलांवर बलात्कार, अत्याचार केले. त्याचे व्हिडीओ आता समोर आले. भारतीय जनता पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी प्रज्वल रेवन्नाचा प्रचार करण्यास नकार दिला. अशा उमेदवाराचा प्रचार कसा करायचा? असा प्रश्न त्यांना पडला, पण प्रज्वल रेवन्ना हे मोदी परिवाराचे घटक बनले व स्वत: पंतप्रधान मोदी हेच प्रज्वलच्या प्रचारात उतरले," असं राऊत यांनी म्हटलं आहे.

गुंड, बलात्कारी, भ्रष्टाचाऱ्यांचेही वावडे नाही

"भरसभेत मोदींनी प्रज्वलच्या पाठीवर शाब्बासकीची थाप मारून त्याने केलेल्या बलात्कारी कृत्याला जणू राष्ट्रीय आशीर्वाद दिले. आज हे मोदींचे लाडके प्रज्वल रेवन्ना जर्मनीत पळून गेले. मोदींना लोकशाही हायजॅक करायचीच आहे, पण त्यांना गुंड, बलात्कारी, भ्रष्टाचाऱ्यांचेही वावडे नाही. प्रज्वल व त्याचा पक्ष काँग्रेससोबत असता तर मोदी व त्यांच्या लोकांची भूमिका वेगळी असती," असं राऊत म्हणाले.

नेहरूंनी माकडांची माणसे केली

"भारताची फाळणी झाली म्हणून अजून शोक करणाऱ्यांनी लक्षात घ्यावे की, मोदी काळात 40 हजार वर्ग किलोमीटर जमीन चीनने घुसखोरी करून गिळली आहे व त्यावर मोदी बोलायला तयार नाहीत. मोदी यांनी महिलांना ‘लखपती दीदी’ बनविण्याचे स्वप्न दाखवले, पण 400 रुपयांचे गॅस सिलिंडर 1300 रुपयांवर गेले, त्यावर ते बोलत नाहीत. पंडित नेहरूंची कारकीर्द ज्यांनी पाहिली ते आजही नेहरूंच्या व्यक्तिमत्त्वाने व धोरणांनी देश प्रभावित झाल्याचे सांगतात. नेहरू व त्यांच्या सहकाऱ्यांनी लोकशाही मूल्यांचा व विरोधकांचा मान राखला. त्यांनी देशाला खोटी स्वप्ने दाखवली नाहीत व जनतेला माकडे बनवून आपल्या मागे नाचायला लावले नाही. नेहरूंनी माकडांची माणसे केली. मोदी काळात त्याच माणसांची पुन्हा माकडे केली व देश ते अश्मयुगात घेऊन गेले," असा टोला संजय राऊतांनी लगावला आहे.

आधुनिकता व विज्ञानवादाचा ऱ्हास 

"केमाल पाशाने इस्लामी धर्मांधांच्या जोखडातून तुर्कस्थान मुक्त केले व एक आधुनिक, विज्ञानवादी तुर्कस्थान निर्माण केले. अमेरिका व युरोपला अचंबित करणारे तुर्कस्थान आता बुरसटलेल्या विचारांच्या, धर्मांध नेत्यांच्या हाती गेले व आधुनिकतेचे सर्व खांब कोसळून तुर्कस्थानचा पुन्हा तोच मातीचा ढिगारा झाला. भारतातून त्याच आधुनिकता व विज्ञानवादाचा ऱ्हास होऊन मोदी देशाला बुरसटलेल्या मार्गाने घेऊन जात आहेत. हे आपण होऊ द्यायचे काय? हा विचार शेवटी मतदारांनी करायचा आहे.लोकशाहीत निवडणुकाच ‘हायजॅक’ करणाऱ्यांच्या हाती देश यापुढे राहू नये," असं लेखाच्या शेवटी राऊत यांनी म्हटलं आहे.