'हे वैचारिक दारिद्रयच, पंतप्रधान हिंदू-मुस्लिमांमध्ये द्वेष निर्माण करणारी भाषणे..'; ठाकरेंचा हल्लाबोल

Uddhav Thackeray Group On PM Modi Speechs: ‘काळा पैसा खणून काढू’, ‘दरवर्षी 2 कोटी लोकांना रोजगार देऊ’, ‘स्मार्ट सिटी बनवू’, ‘बहोत हो गई महंगाई की मार’ वगैरे पोकळ घोषणा देऊन सत्तेवर आलेले पंतप्रधान मोदी आता मात्र या महत्त्वाच्या मुद्द्यांवर एकदाही तोंड उघडताना दिसत नाहीत, असं ठाकरे गटाने म्हटलं आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: May 4, 2024, 07:32 AM IST
'हे वैचारिक दारिद्रयच, पंतप्रधान हिंदू-मुस्लिमांमध्ये द्वेष निर्माण करणारी भाषणे..'; ठाकरेंचा हल्लाबोल title=
मोदींवर ठाकरे गटाचा निशाणा

Uddhav Thackeray Group On PM Modi Speechs: देशवासीयांना एकसंध ठेवण्याऐवजी केवळ मतांसाठी देशातील हिंदू व मुस्लिम धर्मीयांमध्ये द्वेष निर्माण करणारी भाषणे देशाचे पंतप्रधान देतात आणि त्यांचे घरगडी बनलेले निवडणूक आयुक्त ही भाषा खपवून घेतात, असा एकंदर तमाशा लोकशाही व निवडणुकांच्या नावाने देशात सध्या सुरू आहे, असं म्हणत ठाकरे गटाने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणांवर टीका केली आहे. राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख नेते लालू प्रसाद यादव यांनी केलेल्या एका पोस्टचा संदर्भ देत ठाकरे गटाने मोदींना लक्ष्य केलं आहे.

मोदींच्या मुद्द्यांनीही अतिशय खालची पातळी गाठली

"लोकसभा निवडणुकांचे सातपैकी दोन टप्पे पार पडले आहेत. आणखी पाच टप्प्यांचे मतदान बाकी आहे. मात्र पहिल्या दोन टप्प्यांतील निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रचाराचा स्तर तर खाली आणलाच; त्यांच्या भाषणातील मुद्द्यांनीही अतिशय खालची पातळी गाठली. पंतप्रधानपदाची एक गरिमा किंवा प्रतिष्ठा असते. अशा सर्वोच्च पदावरील व्यक्तीने आपल्या पदाला शोभेल व त्या पदाचा आब राखला जाईल, याच पद्धतीने बोलावे असा एक संकेत किंवा शिष्टाचार असतो, पण ज्यांच्या आचरणातच कमालीचा शिष्टपणा आहे, त्यांच्याकडून ही अपेक्षा तरी कशी करायची?" असा सवाल ठाकरे गटाने उपस्थित केला आहे.

लालूप्रसाद यादव यांनी कमीत कमी शब्दांत

"देशाला आजवर लाभलेल्या सर्वच पंतप्रधानांनी आपल्या वाणीतून वा आचरणातून या पदाची प्रतिष्ठा व एक राष्ट्रप्रमुख म्हणून संयमाने बोलण्याचा शिष्टाचार कसोशीने जोपासला. पंतप्रधान मोदी मात्र हे सारेच संकेत धाब्यावर बसवून या पदाची प्रतिष्ठा धुळीत मिसळवण्याचे काम करीत आहेत. राष्ट्रीय जनता दलाचे नेते व बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांनी मोदी यांच्या याच थिल्लरबाजीवर नेमके बोट ठेवले आहे. लालू यादव हे तसे राजकारणातील इरसाल गडी. आपल्या खास तिरकस शैलीत कोपरखळ्या मारून खसखस पिकवणे व भल्याभल्यांची टोपी उडवणे यात त्यांचा हातखंडा आहे. सोशल मीडियावर एरव्ही ते फारसे सक्रिय नसतात. मात्र पंतप्रधान मोदींच्या दोन टप्प्यांतील प्रचार सभा व त्यांची बेताल भाषणे यावरून मोदींना चिमटा घेण्याचा मोह लालूंना आवरला नसावा. त्यामुळे निवडणुका जाहीर झाल्यापासून ताळतंत्र सोडून बोलणाऱ्या पंतप्रधान मोदींच्या भाषेचा समाचार घेणारी एक पोस्टलालूंनी ‘एक्स’ या समाज माध्यमावर टाकली व ही पोस्ट नेटकऱ्यांनीही चांगलीच डोक्यावर घेतली. या पोस्टच्या माध्यमातून मोदींची खिल्ली उडवताना लालू म्हणतात, ‘‘हिंदी भाषेत आजमितीस तब्बल दीड लाख शब्द आहेत. याशिवाय सर्व शाखांच्या अभ्यासक्रमांचा विचार केला व तांत्रिक शब्दही त्यात मिसळले तर सुमारे साडेसहा लाखांपर्यंत ही शब्दसंख्या जाते. इतक्या विपुल प्रमाणात शब्दभांडार उपलब्ध असतानाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सर्वात आवडते शब्द कोणते आहेत, तर पाकिस्तान, स्मशान, कब्रस्तान, हिंदू-मुसलमान, मंदिर-मशीद, मासे-मुगल, मंगळसूत्र आणि गाय व म्हैस.’’ लालू पुढे म्हणतात, वरच्या शब्दांची यादी ही केवळ निवडणुकांच्या पहिल्या दोन टप्प्यांपर्यंतचीच आहे. सातव्या टप्प्याचा प्रचार संपेपर्यंत पंतप्रधानांच्या या शब्दावलीत आणखी असेच दोन-चार शब्द वाढू शकतात. नोकऱ्या-रोजगार, गरिबी, शेती, महागाई, वाढती बेकारी, विकास, गुंतवणूक, विद्यार्थी, विज्ञान व देशातील तरुण या देशातील महत्त्वाच्या मुद्द्यांचे पंतप्रधानांना विस्मरण झाले आहे. म्हणजेच देशातील मुख्य प्रश्नांना बगल देऊन केवळ धार्मिक उन्माद वाढवणारे शब्द तेवढे पंतप्रधानांनी पाठ करून ठेवले आहेत, असा लालूंच्या या पोस्टचा आशय आहे. लालूप्रसाद यादव यांनी कमीत कमी शब्दांत पंतप्रधानांची जी ‘बिनपाण्याने’ केली आहे ती समस्त देशवासीयांची भावना आहे," असं 'सामना'च्या अग्रलेखात म्हटलं आहे.

पंतप्रधान हिंदू व मुस्लिम धर्मीयांमध्ये द्वेष निर्माण करणारी भाषणं करतात

‘‘काँगेस सत्तेवर आली तर हिंदूंची संपत्ती ते जास्त मुले असलेल्यांना वाटतील. तुमची मंगळसूत्रे खेचली जातील व हिंदूंच्या संपत्तीचे वाटप मुसलमानांमध्ये केले जाईल’’, असे विखारी वक्तव्य देशाच्या पंतप्रधानांनी करावे यासारखे दुर्दैव नाही. मासे खाणे, मटण खाणे यांसारखे आहार स्वातंत्र्याचे मुद्दे निवडणूक प्रचारात आणून मांसाहार करणाऱ्यांचा संबंध थेट मोगलांशी जोडणे हे तर वैचारिक दारिद्रयच म्हणायला हवे. देशवासीयांना एकसंध ठेवण्याऐवजी केवळ मतांसाठी देशातील हिंदू व मुस्लिम धर्मीयांमध्ये द्वेष निर्माण करणारी भाषणे देशाचे पंतप्रधान देतात आणि त्यांचे घरगडी बनलेले निवडणूक आयुक्त ही भाषा खपवून घेतात, असा एकंदर तमाशा लोकशाही व निवडणुकांच्या नावाने देशात सध्या सुरू आहे," असा टोला ठाकरे गटाने लगावला आहे.

पंतप्रधान असा असावा काय?

"‘काळा पैसा खणून काढू’, ‘दरवर्षी 2 कोटी लोकांना रोजगार देऊ’, ‘स्मार्ट सिटी बनवू’, ‘बहोत हो गई महंगाई की मार’ वगैरे पोकळ घोषणा देऊन सत्तेवर आलेले पंतप्रधान मोदी आता मात्र या महत्त्वाच्या मुद्द्यांवर एकदाही तोंड उघडताना दिसत नाहीत. जिथे जिथे प्रचाराला जातील, तिथे केवळ हिंदू-मुसलमान, पाकिस्तान व पवित्र मंगळसूत्र अशा मुद्द्यांना हात घालून धार्मिक उन्माद माजवत आहेत. वाटेल तसा तोंडाचा पट्टा चालवून देशात दुही निर्माण करत आहेत. मोदींच्या डिक्शनरीतील याच विद्वेषी शब्दांवर लालूप्रसाद यादव यांनी जो चाबूक चालवला तो योग्यच म्हणायला हवा. मतांसाठी देशवासीयांच्या मनात द्वेषाची माती देशाच्या प्रमुखानेच कालवावी काय? पंतप्रधान असा असावा काय? फैसला आता देशवासीयांनीच करायचा आहे," असं लेखाच्या शेवटी म्हटलं आहे.