कोरोनाचे जगभरात १० हजारावर बळी, इटलीत सर्वाधिक ३४०५ बळी

जगभरातल्या १७९ देशांमध्ये फैलावला असून जवळपास २ लाख ४५ हजारांहून अधिक लोक कोरोनाबाधित 

Updated: Mar 20, 2020, 10:25 AM IST
कोरोनाचे जगभरात १० हजारावर बळी, इटलीत सर्वाधिक ३४०५ बळी title=

नवी दिल्ली : कोरोना व्हायरस जगभरातल्या १७९ देशांमध्ये फैलावला असून जवळपास २ लाख ४५ हजारांहून अधिक लोक कोरोनाबाधित झाले आहेत, तर तब्बल १० हजारांवर लोक मृत्युमुखी पडले आहेत. कोरोनाबाधित देशांमध्ये इटलीला सर्वाधिक फटका बसला असून कोरोनामुळे मृत्युच्या संख्येत इटली आता चीनच्या पुढे गेला आहे. इटलीमध्ये ३४०५ जणांचा मृत्यू झाला आहे. इटलीत २४ तासांत ४२७ जणांचा बळी गेला. तर चीनमध्ये ३२४९ जण  मृत्युमुखी पडले आहेत. त्यानंतर इराणमध्ये १२८४ लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

स्पेनमध्ये ८३१ जण कोरोनामुळे दगावले आहेत. २४ तासांत स्पेनमध्ये २९४ जणांचा बळी गेला. फ्रान्समध्ये ३७२ जण मृत्युमुखी पडले. दक्षिण कोरियात ९१ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

अमेरिकेतही २०० हून अधिक मृत्यू

अमेरिकेतील सर्व राज्यांत कोरोना फैलावला आहे. अमेरिकेत २११ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. न्यूयॉर्कमध्ये कोरोना अधिक फैलावतो आहे. काही दिवसांत भीषण परिस्थितीला सामोरं जावं लागेल, असा इशारा न्यूयॉर्कच्या महापौरांनी तिथल्या नागरिकांना दिला आहे.

...तर लाखो लोक मृत्युमुखी पडतील – संयुक्त राष्ट्रसंघाच्या सरचिटणीसांचा इशारा

कोरोना व्हायरसचा फैलाव वेळीच रोखला नाही तर जगभरात लाखो लोक मृत्युमुखी पडतील. विशेषतः गरीब देशांमध्ये परिस्थिती गंभीर होईल, असा धोक्याचा इशारा संयुक्त राष्ट्रसंघाचे सरचिटणीस अँन्टोनिओ गटरेस यांनी दिला आहे. कोरोना रोखण्यासाठी जगतिक समन्वयाचं आवाहन त्यांनी केलं आहे. जर कोरोना व्हायरस जंगलातील वणव्यासारखा पसरू दिला, तर हा व्हायरस जगाच्या गरीब आणि असुरक्षित असलेल्या भागात लाखो लोकांचा बळी घेईल, असा इशारा त्यांनी दिला आहे. जगतिक एकोपा ही नैतिक गरजच नाही तर प्रत्येकाच्या हिताची बाब आहे, असं गटरेस यांनी म्हटलंय.

जागतिक मंदी अटळ

कोरोना व्हायरसमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे जागतिक मंदीची स्थिती उद्भवणार हे निश्चित आहे. ही अभूतपूर्व परिस्थिती असल्याचंही, संयुक्त राष्ट्रसंघाच्या सरचिटणीसांनी म्हटलंय. या आर्थिक संकटाला तोंड देण्यासाठी जगातील मोठ्या अर्थव्यवस्थांकडून ठोस आणि नाविन्यपूर्ण धोरणात्मक उपाययोजनांची गरज आहे, असं त्यांनी सांगितलं.