पृथ्वी नष्ट होण्याच्या मार्गावर! दशकभरात भट्टीसारख्या तापमानानं जग होरपळलं; घाबरवणारी आकडेवारी समोर

UN Report On Warmest Decade: हवामान बदलाची जागतिक स्तरावर चिंता वाढवणारी बातमी. जागतिक तापमानवाढीचे सर्व विक्रम मोडले? 

सायली पाटील | Updated: Mar 20, 2024, 10:06 AM IST
पृथ्वी नष्ट होण्याच्या मार्गावर! दशकभरात भट्टीसारख्या तापमानानं जग होरपळलं; घाबरवणारी आकडेवारी समोर  title=
Climate Change raises tension UN Report On Warmest Decade know details

UN Report On Warmest Decade: हवामान बदल ही समस्या गेल्या कैक वर्षांपासून संपूर्ण जगाची चिंता वाढवत आहे. अशा या समस्येशी दोन हात करण्यासाठी जागतिक स्तरावरील अनेक संघटना काम करताना दिसत आहेत. त्यापैकीच एक असणाऱ्या संयुक्त राष्ट्र संघटनेच्या वतीनं नुकतीच एक आकडेवारी जाहीर करण्यात आली 
आहे. या आकडेवारीनुसार साधारण मागील दशकभराचा काळ जागतिक तापमानवाढीचे सर्व विक्रम मोडणारा ठरला आहे. 

2014 ते 2023 या दहा वर्षांच्या कालावधीमध्ये  पृथ्वीच्या तापमानात सरासरी मोठ्या फरकानं वाढ झाल्याची नोंद करण्यात आली आहे. आधुनिकतेच्या साथीनं अतिशय वेगात प्रवास करणाऱ्या या जगासाठी कार्बन उत्सर्जन ही एक मोठी समस्या ठरत असून, त्याचा थेट धोका मानवी अस्तित्वाला असल्याची बाब आता सातत्यानं समोर येत आहे. संयुक्त राष्ट्र संघटनेकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार मागीत दहा वर्षांचा काळ हा आतापर्यंतचा सर्वाधिक उष्ण काळ ठरला आहे. 

मंगळवारी संयुक्त राष्ट्र संघटनेच्या हवामान विभागाच्या वतीनं वार्षिक हवामान अहवाल सादर करण्यात आला. ज्यामध्ये 2023 हे वर्ष सर्वाधिक उष्ण वर्ष राहिल्याची नोंद करण्यात आली. गेल्या 10 वर्षांच्या काळात तापमानवाढीचे थेट परिणाम महासागरांवरही झाले, इतकंच नव्हे तर मोठमोठे हिमनगरही त्यामुळं वितळण्यास सुरुवात झाल्याची धास्तावणारी माहिती या अहवालातून समोर आली. 

हेसुद्धा वाचा : Weather Update : होळीआधीच बदलले हवामानाचे रंग; राज्यात भर उन्हाळ्यात गारपीटीसह वादळी पावसाची शक्यता 

WMO च्या माहितीनुसार 2023 मध्ये पृथ्वीच्या पृष्ठाचं सरासरी तापमान 1.45 अंशांनी अधिक असल्याची नोंद झाली. औद्योगिकीकरणापूर्वीच्या अर्थात 1850 ते 1900 दरम्यानच्या काळाच्या तुलनेत हे तापमान लक्षणीयरित्या अधिक असून, 2016 नंतर सध्याच्या तापमानामध्ये साधारण 1.29 अंश इतक्या फरकाची नोंद करण्यात आली आहे. 

पृथ्वी नष्ट होण्याच्या मार्गावर? 

जागतिक हवामान संघटनेच्या वरील अहवालावर संयुक्त राष्ट्र संघटनेचे प्रमुख एंटोनियो गुटेरेस यांनीही चिंता व्यक्त केली. अहवालातील माहिती आणि एकंदर आकडेवारी पाहता पृथ्वी नष्ट होण्याच्या मार्हावर असल्याचं वक्तव्य त्यांनी केलं. 'पृथ्वी संकेत देत असून, सध्या इंधनाच्या वापरामुळं होणाऱ्या प्रदूषणाची पातळी पाहता निसर्गाला त्यामुळं किती इजा पोहोचत आहे ही बाब लक्षणीयरित्या समोर आली आहे', असं ते म्हणाले. 

जागतिक हवामान संघटनेच्या प्रमुखपदी असणाऱ्या  एंड्रिया सेलेस्टे साउलो यांनी या अहवालाकडे संपूर्ण जगानं धोक्याचा इशारा म्हणून पाहणं गरजेचं असून, महासागरांच्या पृष्ठाचं तापमान वाढणं, ग्लेशिअर वितळणं या सर्व गोष्टी चिंता वाढवणाऱ्या असल्याचं त्यांनी स्पष्ट सांगितलं.