कधी पाहिला आहे का कचऱ्याचा डोंगर?

घुसमटलेली शहरं आणि त्यांना या कचऱ्याचा विळखा... 

Updated: Sep 21, 2019, 08:32 PM IST
कधी पाहिला आहे का कचऱ्याचा डोंगर?  title=
कधी पाहिला आहे का कचऱ्याचा डोंगर?

आतीश भोईर, झी मीडिया, कल्याण : दुरून डोंगर साजरे ही म्हण कल्याणमध्ये चपखल लागू आहे. पण, त्यात एक छोटीशी सुधारणा करणंही गरजेचं आहे. कारण, हे दुरून साजरे दिसणारे हे डोंगर आहेत चक्क कचऱ्याचे. कल्याणला खाडीशेजारी गणेश घाट परिसरात असणाऱ्या कचऱ्याचा अवाढव्य डोंगर निर्माण झाला आहे. कारण हा डोंगर आहे एक मानवनिर्मित डोंगर. 

महापालिकेने अनधिकृतरित्या या भागात कचरा साठवला आणि काही वर्षात याचा डोंगरच तयार झाला आहे. कचऱ्याच्या या डोंगराची उंची आता तब्बल ३५ मीटरपर्यंत पोहोचली आहे. महापालिकेचं हे डम्पिंग ग्राऊंड शास्त्रोक्त पद्धतीने बंद करण्याचा दावा केला जातोय. मात्र, त्याची डेडलाईन मारूतीच्या शेपटीसारखी वाढतच चालली आहे. 

मनपा हद्दीतून रोज ६४० मेट्रीक टन कचरा इथे टाकला जातो. कल्याण शहरात भिवंडीकडून प्रवेश करताना स्वागत होतं ते याच कचऱ्याच्या दुर्गंधीने. पावसाळ्याचे ४ महिने वगळले तर कल्याणच्या आधारवाडी डम्पिंग ग्राऊंडला सातत्याने आगही लागत असते. 

अनेकदा या डम्पिंग ग्राऊंडला आग लावली जाते. यामुळे कल्याणच काय अगदी शेजारील डोंबिवलीतही पांढरा धूराचे ढग पसरतात. परिणामी, नागरिकांचं जगणं कठीण होऊन बसतं. मात्र महापालिका प्रशासन, राज्य सरकार ढिम्मं असतं. कल्याण डोंबिवलीच्या गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्ता उपभोगणाऱ्या युती सरकारला हा धूर दिसत नाही, त्याचा वास येत नाही आणि कचऱ्याच्या डोंगराची समस्याही वाटत नाही. त्यामुळे भोगतायत, घुसमटतायत कल्याण डोंबिवलीकरच.