'इतकी लाज...' रोहित शर्मावर 'टॉस फिक्सिंग'चा आरोप करणाऱ्या पाकिस्तानी खेळाडूवर वसीम अक्रम संतापला

पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू सिकंदर बख्त यांनी भारतीय कर्णधार रोहित शर्मावर टॉस फिक्सिंगचा आरोप केला आहे. यानंतर वसीम अक्रमने त्यांना खडे बोल सुनावले आहेत. समोरील संघाच्या कर्णधाराला दिसू नये यासाठी रोहित नाणं लांब फेकत असल्याचा हास्यास्पद आरोप त्यांनी केला आहे.   

शिवराज यादव | Updated: Nov 16, 2023, 07:23 PM IST
'इतकी लाज...' रोहित शर्मावर 'टॉस फिक्सिंग'चा आरोप करणाऱ्या पाकिस्तानी खेळाडूवर वसीम अक्रम संतापला title=

भारतीय संघाने वर्ल्डकपची अंतिम फेरी गाठल्यानंतर पाकिस्तानचे काही माजी खेळाडू हास्यास्पद आरोप करु लागले आहेत. पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू सिकंदर बख्त यांनी भारतीय कर्णधार रोहित शर्मावर टॉस फिक्सिंगचा आरोप केला आहे. न्यूझीलंडविरोधात झालेल्या सेमी-फायनल सामन्यात रोहित शर्माने टॉस फिक्सिंग केल्याचा त्यांचा दावा आहे. यानंतर पाकिस्तानचाच माजी गोलंदाज वसीम अक्रमने त्यांना खडे बोल सुनावले आहेत. हे फार लाजिरवाणं असल्याचंही त्याने म्हटलं आहे. 

सिकंदर बख्त यांनी रोहित शर्मावर गंभीर आरोप करत सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. सिकंदर बख्त यांनी म्हटलं आहे की, "रोहित शर्माने समोरील कर्णधारापेक्षा दूर नाणं फेकत संशयास्पद कृत्य केलं आहे. नाणं दूर गेल्याने समोरील कर्णधाराला नेमका निकाल काय लागला हे समजू शकलं नाही. भारताच्या बाजूने निकालावर प्रभाव टाकण्याची ही जाणीवपूर्वक केलेली खेळी असू शकते". 

बुधवारी मुंबईतील वानखेडे मैदानात भारत-न्यूझीलंड सेमी-फायनल सामना पार पडल्यानंतर सिकंदर बख्त यांनी हे आरोप केले आहेत. या सामन्यात भारताने टॉस जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय फलंदाजांनी यावेळी न्यूझीलंडसमोर 397 धावांचा डोंगर उभा केला होता. कर्णधार रोहित शर्माने स्फोटक सुरुवात करत 29 चेंडूत 47 धावा कुटल्या. शुभमनने 80 धावा केल्या, मात्र क्रॅम्पमुळे त्याला मैदान सोडावं लागलं. विराट कोहली आणि श्रेयस अय्यर न्यूझीलंड गोलंदाजांवर तुटून पडले आणि शतकं ठोकली. के एल राहुलने 20 चेंडूत 39 धावा ठोकल्या. यानंतर न्यूझीलंड संघाचा सहज पराभव होईल असं वाटत होतं. पण त्यांनीही भारताला चांगली झुंज दिली. अखेर 70 धावांनी त्यांचा पराभव झाला. 

66 वर्षीय सिकंदर बख्त यांनी एका न्यूज चॅनेलवर बोलताना यामागे मोठा कट असू शकतो असा अंदाज व्यक्त केला आहे. रोहित शर्माने ज्या अंतरावर नाणं फेकलं ते आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) यांच्या मोठ्या संगनमताचा भाग असू शकतो. भारतीय संघाच्या हितासाठी हा निर्णय झालेला असू शकतो असा त्यांचा दावा आहे. 

वसीम अक्रमने झापलं

सिकंदर बख्त यांच्या या आरोपांवर वसीम अक्रमने संताप व्यक्त केला आहे. A Sports शी बोलताना वसीम अक्रमने सांगितलं की, नाणं नेमकं कुठे पडलं पाहिजे यासंबंधी कोणताही नियम नाही. तसंच तिथे मॅट हे स्पॉन्सरशिपच्या कारणांमुळे असतं. दरम्यान असे दावे केले जात असल्याने आपल्याला फार लाजिरवाणं वाटत असल्याचंही त्याने सांगितलं. 

"नाणं नेमकं कुठे पडणार हे कोण ठरवतं? स्पॉन्सरशिपच्या कारणांमुळे तिथे मॅट असतं. मला फारच लाजिरवाणं वाटत आहे," असं वसीम अक्रमने सांगितलं.

पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूने असे हास्यास्पद, बालिश आरोप करण्याची ही पहिली वेळ नाही. याआधी हसन राजा याने आयसीसी भारतीय गोलंदाजांना वेगळा चेंडू देत असल्याचा आरोप केला होता.