'बाबर आझम रडत होता अन्...', पाकिस्तानच्या दिग्गज खेळाडूचा मोठा खुलासा, 'उद्या जर आम्ही...'

वर्ल्डकपमध्ये पाकिस्तान संघाचं भवितव्य आता इतर संघांच्या कामगिरीवर अवलंबून आहे. अन्यथा पाकिस्तान संघ लीग स्टेजमधूनच बाहेर पडण्याची पूर्ण शक्यता निर्माण झाली आहे.   

शिवराज यादव | Updated: Oct 25, 2023, 07:00 PM IST
'बाबर आझम रडत होता अन्...', पाकिस्तानच्या दिग्गज खेळाडूचा मोठा खुलासा, 'उद्या जर आम्ही...' title=

एकदिवसीय क्रिकेट वर्ल्डकपमध्ये पाकिस्तान संघाची खराब कामगिरी कायम असून, ते स्पर्धेतून बाहेर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. लीग स्टेजमधील अनेक सामने अद्याप शिल्लक असून, पाकिस्तानला चांगली खेळी करण्यासहच इतर संघाच्या कामगिरीवरही अवलंबून राहावं लागणार आहे. अन्यथा पाकिस्तान संघ सेमी फायनलमध्ये पोहोचण्यापूर्वीच अपात्र होणार आहे. पाकिस्तान संघ भारत, ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तानविरोधात पराभूत झाला असून, पुढील सामना दक्षिण आफ्रिकेविरोधात होणार आहे. जर पाकिस्तानला वर्ल्डकपमधील आपलं आव्हान कायम ठेवायचं असेल तर कोणत्याही परिस्थितीत हा सामना जिंकावा लागणार आहे. 

पाकिस्तान संघाच्या कामगिरीमुळे देशातील क्रिकेटप्रेमींसह माजी खेळाडूही प्रचंड संतापले आहेत. शोएब अख्तर आणि वसीम अक्रम यांनी तर संघाला कडक शब्दांत खडेबोल सुनावले आहेत. यामुळे पाकिस्तान संघावर प्रचंड दबाव आहे. यादरम्यान पाकिस्तान संघाचा माजी स्टार खेळाडू मोहम्मद युसूफ याने एक खळबळजनक दावा केला आहे. अफगाणिस्तान संघाने केलेल्या लाजिरवाण्या पराभवानंतर बाबर आझम रडत होता असं मी ऐकलं असल्याचं त्याने सांगितलं आहे. 

"मी पत्रकार परिषद पाहिली असून, त्यात बाबर आझम फार तणावात दिसत होता. बाबर आझम रडला असंही मी ऐकलं आहे. आम्ही बाबर आझमसह आहोत. पण आम्ही कोणत्या एका खेळाडूमुळे हारलो नाही. हा सांघिक खेळ आहे. जर आम्ही संघात असतो, तर ही आमचीही जबाबदारी असती. जिंकणं आणि हारणं हा खेळाचा भाग आहे," असं मोहम्मद युसूफने 'समा टीव्ही'वर सांगितलं.

"मला बाबरकडे पाहून फार वाईट वाटत आहे. त्याने इतका ताण घेता कामा नये. त्याने पुढील 4 सामन्यांवर लक्ष केंद्रीत केलं पाहिजे. संपूर्ण देश त्याच्या पाठीशी आहे. पण आपण काही गोष्टी प्रामाणिकपणे पडताळल्या पाहिजेत. अफगाणिस्तानविरोधात खेळताना चांगल्या खेळपट्टीवर 50 ते 60 धावा कमी पडल्या. पाकिस्तान संघ मुरलीधरनचा सामना करत असल्यासारखं वाटत होतं. ते सामान्य गोलंदाज आहेत. आमची गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणही चांगलं नव्हतं," अशी टीका त्याने केली.

पाकिस्तान संघाचा कर्णधार बाबर आझम याने अफगाणिस्तानविरोधातील पराभवानंतर आम्ही फार दुखावलो असल्याचं मान्य केलं. अफगाणिस्तान संघाने पाकिस्तान संघाचा 8 गडी राखत लाजिरवाणा पराभव केला. या पराभवासह पाकिस्तानच्या सेमी फायनल गाठण्याच्या आशाही मावळल्या आहेत. पाकिस्तानने अफगाणिस्तानसमोर 283 धावांचं आव्हान ठेवलं होतं. एकदिवसीय क्रिकेटमध्ये दोन्ही संघ आतापर्यंत 8 वेळा आमने-सामने आले असून, हा अफगाणिस्तानचा पहिला विजय ठरला. 

पाकिस्तान आतापर्यंत 5 सामने खेळला असून यामधील तीन सामन्यात पराभव झाला आहे. "या पराभवामुळे आम्हाला विचलित होण्याची गरज आहे. तसंच संघाने या पराभवातून शिकावं असा माझा त्यांना संदेश आहे," असं बाबर आझम सामन्यानंतर म्हणाला. पुढे तो म्हणाला की, "आम्ही फलंदाजीत जे हवं ते मिळवलं होतं. पण क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजीत आम्ही कमी पडलो. आम्ही अफगाणिस्तानवर दबाव निर्माण करण्यात अपयशी ठरलो".