MI vs KKR : कोलकाताने 12 वर्षांचा इतिहास मोडला, मुंबई इंडियन्सचा आयपीएलमधील 'खेळ खल्लास'

Mumbai Indians vs Kolkata Knight Riders : कोलकाता नाईट रायडर्सने 12 वर्षानंतर वानखेडे मैदानावर विजय मिळवला आहे. केकेआरने 2012 नंतर पहिल्यांदाच मुंबईला घरच्या मैदानावर पराभूत केलं.

सौरभ तळेकर | Updated: May 3, 2024, 11:45 PM IST
MI vs KKR : कोलकाताने 12 वर्षांचा इतिहास मोडला, मुंबई इंडियन्सचा आयपीएलमधील 'खेळ खल्लास' title=
Wankhede Stadium, Mumbai Indians vs Kolkata Knight Riders

KKR Win After 12 Years On wankhede : आयपीएलच्या 51 व्या सामन्यात कोलकाता नाइट रायडर्सने मुंबई इंडियन्सचा 24 धावांनी पराभव केला. या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने मुंबईला विजयासाठी 170 धावांचे लक्ष्य दिलं होतं. ज्याचा पाठलाग करताना त्यांचा संपूर्ण संघ 18.5 षटकांत 145 धावांत गारद झाला. त्यामुळे कोलकाताने 12 वर्षानंतर पहिल्यांदाच मुंबई इंडियन्सला घरच्या मैदानावर हरवण्यात यश मिळवलं आहे. 2012 मध्ये कोलकाताने मुंबईचा पराभव केला होता. त्यानंतर मुंबईने वानखेडेवर निर्विवाद सत्ता गाजवली. अशातच आता कोलकाता हार्दिक पांड्याच्या मुंबई इंडियन्सवर विजय मिळवून पाईंट्स टेबलमध्ये मोठी आघाडी घेतली आहे. 

मुंबईकडून सूर्यकुमार यादवने सर्वाधिक 56 धावा केल्या. यादरम्यान सूर्याने सहा चौकार आणि दोन षटकार मारले. तर टीम डेव्हिडने 20 चेंडूत 24 धावा केल्या. अखेरीस टीम डेव्हिडकडे सामना खेचण्याची संधी होती. मात्र, त्याला संधीचं सोनं करता आलं नाही. कोलकाता नाईट रायडर्सकडून वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने सर्वाधिक चार बळी घेतले. स्टार्कने 19व्या षटकात तीन खेळाडूंना बाद केले. वरुण चक्रवर्ती, सुनील नरेन आणि आंद्रे रसेल यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. अप्रतिम गोलंदाजीच्या जोरावर कोलकाताने सामना फिरवला आणि जिंकला सुद्धा...

मुंबई इंडियन्स आयपीएलमधून बाहेर

मुंबई इंडियन्सने आत्तापर्यंत 11 सामने खेळले आहेत. त्यात मुंबई इंडियन्सला फक्त 3 सामन्यात विजय मिळवता आलाय. तर मुंबईने 8 सामने गमावले आहेत. तसेच मुंबईचा नेट रननेट देखील - 0.356 आहे. मुंबईच्या खात्यात 6 गुण असल्याने आता मुंबईसाठी प्लेऑफचे दरवाजे बंद झाले आहेत. काहीही केलं तरी मुंबई इथून पुढे सर्व सामने जिंकली तरी 12 पाईंट्सवर जाऊ शकते. त्यामुळे आता मुंबईला एखादाच चमत्कारचं प्लेऑफमध्ये पोहोचवू शकतो, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. राजस्थान, कोलकाता, लखनऊ आणि हैदराबाद यांच्याकडे आधीच 12 गुण आहेत. लखनऊ आणि हैदराबाद यांनी उर्वरित सामन्यापैकी एक सामना जरी जिंकला तरी देखील मुंबई इंडियन्स आयपीएलमधून बाहेर पडणार आहे. प्लेऑफसाठी मुंबई इंडियन्सची संधी केवळ 0.0006 टक्के उरली आहे.

मुंबई इंडियन्स (प्लेइंग इलेव्हन) : इशान किशन (विकेटकीपर),  सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (कर्णधार), नेहल वढेरा, टीम डेव्हिड, मोहम्मद नबी , पीयूष चावला, जेराल्ड कोएत्झी, जसप्रीत बुमराह, नुवान तुषारा. इम्पॅक्ट प्लेयर्स- रोहित शर्मा.

कोलकाता नाइट रायडर्स (प्लेइंग इलेव्हन) : फिलिप सॉल्ट (विकेटकीपर), सुनील नरेन, आंग्रिश रघुवंशी, श्रेयस अय्यर (कर्णधार), व्यंकटेश अय्यर, रिंकू सिंग, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, मिचेल स्टार्क, वैभव अरोरा, वरुण चक्रवर्ती.