'तू किती ट्रॉफी जिंकलायस...', सुनील गावसकरांनी रोहित शर्माला स्पष्टच सांगितलं

विराट कोहली कर्णधारपदावरुन पायउतार झाल्यानंतर रोहित शर्माकडे संघाचं नेतृत्व सोपवण्यात आलं आहे. पण रोहित शर्मा कर्णधार झाल्यापासून संघाने अद्यापपर्यंत एकही आयसीसी स्पर्धा जिंकलेली नाही.   

शिवराज यादव | Updated: Aug 29, 2023, 02:07 PM IST
'तू किती ट्रॉफी जिंकलायस...', सुनील गावसकरांनी रोहित शर्माला स्पष्टच सांगितलं title=

आशिया कप स्पर्धा पार पडल्यानंतर, भारतीय क्रिकेट संघ विश्वचषक स्पर्धा खेळणार आहे. या दोन्ही स्पर्धा जिंकण्याचा भारताचा प्रयत्न असेल. या स्पर्धांमध्ये कर्णधार म्हणून रोहित शर्माची कसोटी लागणार आहे. याचं कारण संघाचं नेतृत्व सोपवल्यापासून रोहित शर्मा अद्याप संघाला एकही आयसीसी स्पर्धा जिंकवून देऊ शकलेला नाही. विराट कोहली जेव्हा कर्णधार होता, तेव्हाने त्याने संघाला एका वेगळ्या उंचीवर नेलं. पण आयसीसी स्पर्धा जिंकण्यात तो अयशस्वी ठरला. विराट कोहलीला कर्णधारपदावरुन काढल्यानंतर रोहित शर्माकडे नेतृत्व सोपवण्यात आलं आहे. त्यामुळे जर रोहित शर्माला यशस्वी कर्णधार व्हायचं असेल तर आयसीसी स्पर्धा जिंकणं महत्त्वाचं आहे. लिटिल मास्टर सुनील गावसकर यांनीही रोहित शर्माने किती ट्रॉफी जिंकल्या आहेत, यावर तो कर्णधार म्हणून किती यशस्वी आहे हे ठरवलं जाईल. 

"दिवसाच्या शेवटी, तुम्ही किती ट्रॉफी, तसंच सामने जिंकले आहेत यावर तुमचं मूल्य ठरवलं जातं. या दोन स्पर्धा जिंकल्यास रोहित शर्मा भारताच्या महान कर्णधारांपैकी एक होईल," असं सुनील गावसकर यांनी हिंदुस्तान टाईम्सशी बोलताना सांगितलं आहे. यावेळी सुनील गावसकर यांनी भारतीय संघाने विश्वचषक स्पर्धेसाठी केलेल्या तयारीवरही भाष्य केलं आहे. 

अनेक क्रिकेटतज्ज्ञांना एकदिवसीय संघात चौथ्या क्रमांकाचा फलंदाज ही भारतीय संघासाठी मोठी डोकेदुखी असल्याचं वाटत आहे. पण सुनील गावसकर यांना संघात अष्टपैलू खेळाडू नसणे ही सर्वात मोठी समस्या असल्याचं वाटत आहे. ते म्हणालेत की "इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा तुमच्या नशीबाने तुम्हाला साथ देणंही महत्त्वाचं असतं. पण जर तुम्ही 1983, 1985 आणि 2011 मधील संघ पाहिले, तर त्या संघातांमध्ये टॉपचे अष्टपैलू खेळाडू होते. तुमच्याकडे असे फंलदाज होते जे 7 ते 9 ओव्हर्स टाकू शकत होते. तसंच असे गोलंदाज होते जे फलंदाजीही करु शकत होते. त्या संघांची ही सर्वात मोठी जमेची बाजू होती. तुम्ही महेंद्रसिह धोनीचा संघ पाहिला तर सुरेश रैना, युवराज सिंग, सचिन तेंडुलकर, विरेंद्र सेहवाग हे सगळे अष्टपैलू होते. हा सर्वात मोठा फायदा होता".

"जर तुम्ही मागील वर्षी टी-20 वर्ल्डकप जिंकणारा इंग्लंडचा संघ पाहिला तर त्यांचे अष्टपैलू खेळाडू पाहा. त्यामुळे अष्टपैलू खेळाडू हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे," असं सुनील गावसकर यांनी स्पष्टच सांगितलं. 

दरम्यान, सुनील गावसकर यांनी अशा स्पर्धांमध्ये थोडीशी नशीबाचीही साथ हवी असं म्हटलं आहे. यावेळी त्यांनी 2019 मध्ये न्यूझीलंडविरोधात झालेल्या सेमी-फायनलचा दाखला दिला. "आपल्याकडे अनेक प्रतिभावान खेळाडू आहेत. पण नॉकआऊट स्टेजला थोडी नशीबाचीही साथ लागते. बाद फेरीतील आपली परिस्थिती पाहिल्यास, जिथे आपण हारलो आहोत तिथे नशीबाची साथ नव्हती", असं ते म्हणाले. 

"गेल्या विश्वचषकात (2019) आपला सामना (उपांत्य फेरी विरुद्ध न्यूझीलंड) होता जो दुसऱ्या दिवसापर्यंत लांबला होता. जर तो पूर्ण दिवस योग्य गेला असता तर कदाचित निकाल वेगळा असता, कारण दुसऱ्या दिवशी परिस्थिती वेगळी होती. त्यात न्यूझीलंडचे गोलंदाज चांगली गोलंदाजी करू शकतात. त्यामुळे, मला वाटतं की त्या दिवशी थोडं नशीबही बाजूने हवं होतं. चार-पाच संघ खूप चांगले आहेत, त्यामुळे तुम्हाला नशीबाची गरज आहे", असं सुनील गावसकर यांनी सांगितलं आहे.