Pro Panja League : 34वी राज्यस्तरीय आर्म रेस्टलिंग स्पर्धा, महाराष्ट्र संघटनेच्या अध्यक्षपदी प्रीती झांगियानी

Pro Panja League : महाराष्ट्र आर्म रेस्टलिंग संघटनेच्या अध्यक्षपदी अभिनेत्री प्रीती झांगियानी यांची निवड, प्रीती  झांगियानी आणि परवीन दबस यांच्या हस्ते प्रो पंजा लीगचे फेब्रुवारी 2023 मध्ये उदघाटन

Updated: Mar 24, 2023, 02:12 PM IST
Pro Panja League :  34वी राज्यस्तरीय आर्म रेस्टलिंग स्पर्धा, महाराष्ट्र संघटनेच्या अध्यक्षपदी प्रीती झांगियानी title=

Pro Panja League : सिनेअभिनेत्री प्रीती झांगियानी (Preeti Zhangiani) यांची महाराष्ट्र आर्म रेस्टलिंग संघटनेच्या (Maharashtra Arm Wrestling Tournament) अध्यक्षपदी निवड करण्यात आली. आर्म रेस्टलिंग या क्रीडा प्रकारच्या भारत भरातील तसेच जगभरातील प्रचार आणि प्रसारासाठी तसेच गेल्या काही वर्षात महाराष्ट्रात आर्म रेस्टलिंग हा खेळ लोकप्रिय करण्यासाठी त्यांनी केलेल्या कार्याबद्दल त्यांना हा मान देण्यात आला.

प्रीती झांगियानी आणि परवीन दबस यांनी फेब्रुवारी 2020 मध्ये प्रो पंजा लीग स्पर्धेचा (Pro Panja League) प्रारंभ केला होता. तेव्हापासून आजपर्यंत हि स्पर्धा आशियातील सर्वात मोठी व लोकप्रिय स्पर्धा म्हणून प्रसिद्ध झाली आहे. प्रो पंजा लीगच्या वतीने आतापर्यंत काही मानांकन स्पर्धा तसंच, काही रोख पारितोषिक रकमेच्या स्पर्धा आणि विविध प्रायोजित कार्यक्रमांचे देशभरात आयोजन करण्यात आलं आहे. जुलै 2022 मध्ये ग्वालीयार इथं पार पडलेल्या अखेरच्या प्रो पंजा लीग मानांकन स्पर्धेपासून या लीगला सोशल मीडियावर (Social Media) 215 दशलक्ष प्रेक्षकांनी प्रतिसाद दिला आहे.

अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर प्रीती  झांगियानी यांनी महाराष्ट्रातील आर्म रेस्टलिंग समुदायाबद्दल कृतघ्नता व्यक्त केली.  तसंच, अधिकाधिक महिलांनी आणि विशेष खेळाडूंनी या खेळात सहभागी होण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिलं.

डॉ श्रीकांत वालनकर, सचिन मातणे व प्रमोद वालमदे यांसारख्या समर्थ सहकाऱ्यांबरोबर काम करणे आणि संघटनेचे अध्यक्षपद भूषवणे हा माझ्यासाठी मोठा सन्मान असल्याचं प्रीती  झांगियानी यांनी म्हटलं आहे.  प्रो पंजा लीगची सहसंस्थापक म्हणून मी करीत असलेल्या कामाप्रमाणेच महाराष्ट्रात सर्वदूर आर्म रेस्टलिंग या खेळाचा प्रसार करणं हेच माझं लक्ष्य असल्याचंही त्यांनी सांगितलं.

आर्म रेस्टलिंग या खेळात सहभागी होण्यामुळे प्रचंड शारीरिक आणि मानसिक फायदे होत असून त्याद्वारे सुरुवातीला फार मोठे आर्थिक फायदे होत नसले तरी आत्मविश्वास व मनोधैर्य या गुणांची कमाई करता येत असते. त्यामुळेच अधिकाधिक महिला आणि विशेष खेळाडूंना आर्म रेस्टलिंग मध्ये सहभागी होण्यासाठी आम्ही प्रोत्साहन देत असतो. माझा जन्म मुंबईत झाला असून महाराष्ट्र हेच माझे घर आहे. त्यामुळे महाराष्ट्राची उन्नती आणि महाराष्ट्रातील खेळाडूंची प्रगती यासाठीच मी काम करत राहीन असंही प्रीती यांनी सांगितलं.

महाराष्ट्र आर्म रेस्टलिंग संघटनेचे महासचिव आणि अखिल भारतीय आर्म रेस्टलिंग संघटनेचे वरिष्ठ उपाध्यक्ष डॉ श्रीकांत वालनकर यांनी प्रीती  झांगियानी यांचे नव्या सन्मानाबद्दल अभिनंदन केलं. प्रीती  झांगियानी यांच्या नियुक्तींमुळे अधिकाधिक महिला खेळाडू या खेळात सहभागी होतील असा विश्वास व्यक्त करून ते म्हणाले की, नागपूर इथं आर्म रेस्टलिंग खेळाडू व विशेष खेळाडूंसाठी आर्म रेस्टलिंग आणि पॉवर लिफ्टिंग प्रशिक्षण केंद्राचे आम्ही नुकतेच उदघाटन केलं आहे. विशेषकरून महाराष्ट्र भरातील महिला व विशेष खेळाडूंमध्ये आर्म रेस्टलिंग या खेळाचा प्रसार करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

महाराष्ट्र आर्म रेस्टलिंग संघटनेची सोसायटी ऍक्ट 1860 व महाराष्ट्र शासनाच्या बीपीटी ऍक्ट 1950 अन्वये नोंदणी करण्यात आली आहे. या संघटनेच्या वतीने पुणे येथे प्रीती  झांगियानी यांच्या नेतृत्वाखाली 34व्या राज्यस्तरीय आर्म रेस्टलिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आलं आहे.