स्वामी समर्थ केंद्रातील अश्लील क्लिपमुळे महिलेला मुलासह अटक; नाशिकमधील धक्कादायक प्रकार

Nashik Crime : नाशिकच्या दिंडोरीमध्ये स्वामी समर्थ केंद्रातील एका उपासिकेने विश्वस्तांना अश्लिल व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत तब्बल एक कोटी रुपये उकळले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी महिलेला तिच्या मुलासह अटक केली आहे.

योगेश खरे | Updated: Nov 20, 2023, 01:33 PM IST
स्वामी समर्थ केंद्रातील अश्लील क्लिपमुळे महिलेला मुलासह अटक; नाशिकमधील धक्कादायक प्रकार  title=

योगेश खरे, झी मीडिया, नाशिक : नाशिक (Nashik Crime) जिल्ह्यातील दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. मात्र यावेळी चर्चेत येणार कारण धक्कादायक आहे. सेवा केंद्रातील एका अधिकाऱ्याच्या कथित अश्लील व्हिडिओ क्लिपमुळे दोघांना अटक करण्यात आली आहे. श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रातील एका ज्येष्ठ विश्वस्ताच्या या व्हिडीओ क्लिपमुळे एक उपासिकेला आणि तिच्या मुलाला अटक करण्यात आली आहे. या उपासिकेने सतत बलात्काराचे आरोप करून ब्लॅकमेल केल्याचा आरोप केला आहे.

गेल्या पाच वर्षात आरोपी महिलेने एक कोटी पाच लाख रुपये खंडणी उकळल्याचे तक्रारीत म्हटलं आहे. नाशिक पोलिसांनी महिलेला मुलासह दहा लाख रुपयांची खंडणी मागताना अटक केली होती. सारिका सोनवणे असे या महिलेचे नाव असून तिचा मुलगा मोहित सोनवणे याला सुद्धा अटक करण्यात आलीये. महिलेकडून सेवा केंद्रातील काही आक्षेपार्ह क्लिप्स असलेला संगणक, मोबाईल आणि काही महत्त्वाची कागदपत्रे जप्त करण्यात आली आली आहेत. न्यायालयात हजर केले असता महिलेला चार दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

दरम्यान, गंगापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत 10 लाख रुपयांची खंडणी घेताना या महिलेला आणि मुलाला अटक करण्यात आली होती. 2014 सालापासून फिर्यादी सारिका सोनवणे या दोघांची ओळख होते. दोघेही एकाच परिसरात राहत होते. महिलेने वेळोवेळो फिर्यादीकडे पैशांची मागणी केली होती. नकार दिल्याने महिलेने तयार केलेले अश्लिल व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत खंडणीची मागणी केली. अखेर महिलेच्या त्रासाला कंटाळून पीडित व्यक्तीने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे या आश्रमाची जबाबदारी आरोपी महिलेकडे होती. सदर आरोपी महिला कृषी खात्यात अधिकारी म्हणून कार्यरत होती. तक्रार मिळाल्यानंतर सारिका बापूराव सोनवणे आणि मोहित बापूराव सोनवणे दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

पोलिसांनी काय सांगितले?

"गंगापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत 10 लाख रुपयांची रोख लाच घेत असताना एक महिला आणि तिच्या मुलाला रंगेहाथ पकडण्यात आलं आहे. यातील महिला आणि फिर्यादी यांची 2014-15 पासून ओळख आहे. आध्यात्मिक केंद्रात जात असताना महिलेची फिर्यादीसोबत ओळख झाली होती. एकाच परिसरातील असल्याने त्यांची ओळख वाढत गेली. ओळखीच्या माध्यमातून महिलेने सहानुभूती दाखवून पतीचे निधन झाल्याचे सांगत वेळोवेळी फिर्यादीकडे पैशांची मागणी केली. मागणी पूर्ण न केल्यास आपल्याकडे असलेले व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी महिलेने दिली होती. तसेच बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची देखील धमकी दिली. व्हिडीओ खरे आहेत की खोटे याची शहानिशा करणे गरजेचं आहे. व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत महिलेने वेळोवेळी पैसे घेतले. मागणी वाढल्याने फिर्यादीने पोलिसांत तक्रार केली. महिलेने व्हिडीओ तयार केल्याचे म्हटलं आहे. यामध्ये अश्लिल व्हिडीओ असल्याची शक्यता आहे. याप्रकरणी अधिक तपास केल्यावर माहिती समोर येणार आहे," अशी माहिती नाशिक पोलीस उपायुक्त किरण चव्हाण यांनी दिली.