जपानी नववधू, औरंगाबादचा नवरदेव आणि वृद्धाश्रमात विवाह सोहळा

विवाह... दोन जीवांचा... संबंध दोन कुटुंबांचा... मात्र याच लग्नाच्या माध्यमातून, एका जोडप्यानं सीमा ओलांडून दोन देशांचा ऋणानुबंध जोडला. सोबतच माणुसकीच्या नात्यानं असंख्यांना आपल्या नातेसंबंधांच्या कवेत घेतलं.

Updated: Aug 18, 2015, 01:44 PM IST
जपानी नववधू, औरंगाबादचा नवरदेव आणि वृद्धाश्रमात विवाह सोहळा title=

विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद: विवाह... दोन जीवांचा... संबंध दोन कुटुंबांचा... मात्र याच लग्नाच्या माध्यमातून, एका जोडप्यानं सीमा ओलांडून दोन देशांचा ऋणानुबंध जोडला. सोबतच माणुसकीच्या नात्यानं असंख्यांना आपल्या नातेसंबंधांच्या कवेत घेतलं.

जपानी गुडीया आता औरंगाबादकरांची सून झाली आहे. होय, औरंगाबादचा नवरदेव आणि जपानची नवरी यांचा आगळावेगळा लग्नसोहळा औरंगाबादमध्ये संपन्न झाला. औरंगाबादमधला चैतन्य भंडारे जपानच्या कोयोटो शहरात प्रोफेसर म्हणून काम करतो. आसुका योनेमोरी नावाची ही जपानी गुडीया त्याला तिथंच भेटली आणि हे दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले आणि लग्नासाठी जपानी वऱ्हाड थेट औरंगाबादमध्ये दाखल झालं. मात्र या जोडप्यानं शहरातल्या मातोश्री वृद्धाश्रमात लग्नाची गाठ बांधली.. आणि वृद्धाश्रमातले ११२ ज्येष्ठ नागरिक त्यात उत्साहानं सहभागी झाले. 

लग्नानिमित्तानं या जोडप्यानं वृद्धाश्रमातल्या सर्वच वृद्धांना कपडे घेतले होते. त्याचा आनंद या वृद्धांच्या चेहेऱ्यांवरुन ओसंडून वाहत होता. 

विशेष म्हणजे या लग्नात आहेर म्हणून भेटवस्तूं ऐवजी रोख रकमेचा आग्रह धरला गेला. अशा प्रकारे जमा झालेली सत्तावीस हजारांची रोकड, याच वृद्दाश्रमाला भेट म्हणून दिली गेली. अशा या आगळ्यावेगळ्या लग्नसोहळ्यासाठी प्रत्येकाच्या मुखातून शब्द उमटले, नांदा सौख्य भरे... 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.