Weather Updates: विदर्भाला पुन्हा अवकाळी पावसाचा फटका; मुंबईत कशी असणार हवामानाची स्थिती?

Weather Updates: हवामान खात्याच्या अंदाजानुसार, पुढचे पाच दिवस विदर्भातील सर्व जिल्ह्यांना अवकाळी पाऊस, विजांच्या कडकडासह  30-40 किमी प्रति तास सोसाट्याच्या वादळी वाऱ्याचा इशारा देण्यात आलाय. 

सुरभि जगदीश | Updated: May 19, 2024, 06:41 AM IST
Weather Updates: विदर्भाला पुन्हा अवकाळी पावसाचा फटका; मुंबईत कशी असणार हवामानाची स्थिती? title=

Weather Updates: मुंबईसह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये नागरिकांना कडाक्याच्या उकाड्याचा सामना करावा लागतोय. महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून हवामानात सातत्याने बदल होताना दिसतेय. राज्यात उन्हाची तीव्रता वाढलेली असतानाच अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावलीये. यामुळे उष्णतेची तीव्रता काही प्रमाणात कमी झाल्याचं दिसून येतंय. हवामान खात्याच्या माहितीनुसार, राज्यातील अवकाळीचं सावट पुढील काही दिवस कायम असण्याची शक्यता आहे. 

गेल्या आठवड्याभरापासून राज्यासह विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांना अवकाळी पावसाने फटका बसल्याचं दिसून आलंय. अशातच हवामान खात्याच्या अंदाजानुसार, पुढचे पाच दिवस विदर्भातील सर्व जिल्ह्यांना अवकाळी पाऊस, विजांच्या कडकडासह  30-40 किमी प्रति तास सोसाट्याच्या वादळी वाऱ्याचा इशारा देण्यात आलाय. 

कोकणात कसं असणार हवामान?

कोकणातील तुरळक क्षेत्रात उष्ण आणि दमट परिस्थिती राहण्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. याचसोबत दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याचा वारा हलका ते  माध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.

मुंबईची परिस्थिती काय?

पुढील 24 तासांसाठी मुंबई शहर आणि उपनगरांसाठी स्थानिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. शहरात आकाश मुख्यतः निरभ्र राहणार आहे. याचसोबत शहर आणि उपनगरात उष्ण आणि दमट परिस्थिती राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे 36 अंश सेल्सिअस आणि 28 अंश सेल्सिअसच्या आसपास असेल, असाही अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

राज्यातील या जिल्ह्यांना 'यलो अलर्ट'

हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार विदर्भात आज पासून पुढचे पाच दिवस पुन्हा अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आलाय. नागपूर, वर्धा, वाशिम, बुलढाणा वगळता उर्वरित सर्व जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. अमरावती, अकोला, यवतमाळ, चंद्रपुर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यामध्ये विजांच्या कडकडासह वादळी वाऱ्याचा इशारा देण्यात आलाय. तर 19 मे ते 22 मे पर्यंत विदर्भातील सर्व जिल्ह्यांना नागपूर प्रादेशिक हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे.