'उद्धव ठाकरेंच्या 'त्या' निर्णयाने माविआचा प्रयोग फसला', शरद पवारांचा गौप्यस्फोट

Sharad Pawar On MVA Govt : माविआ प्रयोग 2014 मध्येही करण्याचा माझा प्रयत्न होता. उद्धव ठाकरेंनी भाजपाबरोबर जाण्याचा निर्णय तेव्हा घेतला, असं शरद पवारांनी खुलासा केलाय.

सौरभ तळेकर | Updated: May 19, 2024, 08:26 PM IST
'उद्धव ठाकरेंच्या 'त्या' निर्णयाने माविआचा प्रयोग फसला', शरद पवारांचा गौप्यस्फोट title=
Sharad Pawar,Uddhav Thackeray,BJP,MVA

Sharad Pawar Statement : 2004 मध्ये राष्ट्रवादीनं मुख्यमंत्रीपद का नाकारलं? याबाबत शरद पवारांनी एका मुलाखतीत नवा गौप्यस्फोट केलाय. अजित पवार अनुभवाने नवे होते आणि छगन भुजबळांना मुख्यमंत्री केल्यास पक्ष फुटला असता. त्यामुळं त्यावेळी मुख्यमंत्रीपद काँग्रेसला दिलं, असं शरद पवार यांनी स्पष्ट दिलंय. 2004 मध्ये संधी असताना मुख्यमंत्रीपद का घेतलं नाही? असा सवाल वारंवार अजित पवार गटाकडून उपस्थित केला जात होता. अशातच आता शरद पवार यांनी यावर खुलासा केला. त्याचबरोबर शरद पवार यांनी 2014 मध्ये फसलेल्या माविआच्या प्रयोगावर देखील मोठा खुलासा केलाय.

काय म्हणाले शरद पवार?

शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाविकास आघाडीचा प्रयोग 2019 मध्ये केला. हा प्रयोग 2014 मध्येही करण्याचा माझा प्रयत्न होता. उद्धव ठाकरेंनी भाजपाबरोबर जाण्याचा निर्णय तेव्हा घेतला. त्यामुळं मविआचा प्रयोग फसला. दरम्यान, शिवसेना – भाजपामध्ये वितुष्ट निर्माण व्हावे म्हणूनच मी शिवसेनेला सरकारमध्ये बरोबर ठेवण्यास विरोध केला होता. माझा भाजपा सरकारमध्ये शिवसेनेला सामील करण्यास 2017 मध्ये विरोध होता. पंतप्रधान नरेंद्र मोदींना तीन पक्षांचे सरकार हवं होतं, असं शरद पवारांनी म्हटलं आहे.

सुप्रिया सुळे यांना फक्त खासदारकी दिली. त्या दिल्लीच्या राजकारणातच आहेत. त्यांना कधीही सत्तापद देण्यात आलेले नाही. मात्र अजित पवारांना कायमच सत्तापदे दिली. राज्यमंत्रीपदापासून अनेक कॅबिनेट मंत्रीपदे, महत्त्वाची खाती, तीन वेळा उपमुख्यमंत्रीपद, विधिमंडळातील गटनेतेपद, विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपद हे सर्वकाही देण्यात आले. मी मुलगी आणि पुतण्या असा भेद कधीही केला नाही, असंही शरद पवारांनी यावेळी सांगितलं. 

दरम्यान, मुख्यमंत्रीपद मिळाल्यानंतर ते कोण चालवणार? याचा विचार आम्ही करत होतो. अजित पवार तेव्हा अनुभवाने नवीन होते. तेव्हा छगन भुजबळांसारखी आणखीही काही नावं होती. पण त्यांची निवड केली असती तर पक्ष एकत्र राहिला नसता. तेव्हा मुख्यमंत्रीपदाऐवजी मंत्रीपदाच्या काही जागा आणखी मिळत असतील तर घेऊ असं ठरलं, असंही शरद पवार यांनी यावेळी सांगितलं.