मुंबई ते शिर्डी प्रवास सुसाट! समृद्धी महामार्गाचा तिसरा टप्पा तुमच्या सेवेत; कुठून कुठपर्यंत जाता येणार?

Samruddhi Mahamarg Third phase Inauguration : महाराष्ट्रातील महत्त्वाच्या शहरांना जोडणाऱ्या समृद्धी महामार्गानं एक वेगळी क्रांती घडवलेली असतानाच यात आता आणखी एक भर पडली आहे.   

सायली पाटील | Updated: Mar 4, 2024, 08:33 AM IST
मुंबई ते शिर्डी प्रवास सुसाट! समृद्धी महामार्गाचा तिसरा टप्पा तुमच्या सेवेत; कुठून कुठपर्यंत जाता येणार?  title=
samruddhi mahamarg phase 3 Bharveer to Igatpuri will be inaugurated today latest news

Samruddhi Mahamarg Third phase Inauguration : मुंबई ते नागपूरमधील (Mumbai To Nagpur) अंतर मोठ्या फरकानं कमी करणाऱ्या समृद्धी महामार्गाच्या आणखी एका टप्प्याचं लोकार्पण सोमवारी (आज 4 मार्च 2024 रोजी) होत असून या नव्या टप्प्यामुळं आता मुंबई ते शिर्डी हा प्रवास आणखी सुकर आणि सुसाट होणार आहे. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे यांच्या हस्ते हे लोकार्पण पार पडणार आहे. आता समृद्धीचा भरवीर ते इगतपुरी असा साधारण 23 किमी अंतराचा टप्पा तुमच्या सेवेत सज्ज झाल्यामुळं नागपूर ते इगतपुरीपर्यंतचा मार्गही यामुळं मोकळा झाला आहे. 

भरवीर ते इगरपुरी अशा समृद्धी महामार्गाच्या नव्या टप्प्यामुळं आता नागपूरहून येणाऱ्यांना सहजपणे इगतपुरी गाठता येणार आहे. इथं पोहोचल्यानंतर इगतपुरी इंटरचेंजच्या मदतीनं वाहनं ठाणे, मुंबई गाठू शकणार आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे शेतमालाची ने- आण अधिक जलद गतीनं करण्यासाठीसुद्धा समृद्धीचा हा नवा टप्पा अतिशय फायद्याचा ठरणार आहे. 

हेसुद्धा वाचा : 'भाजपकडे स्वत:चं काय? तुरुंगात हवेत ते निवडणुकीच्या रिंगणात' संजय राऊतांनी डागली तोफ 

कसा आहे समृद्धीचा तिसरा टप्पा? 

समृद्धी महामार्गाचा तिसरा टप्पा 16 गावांमधून जात आहे. या टप्प्याच्या निर्मितीसाठी 1078 कोटी रुपयांचा खर्च झाला असून, आता या नव्या टप्प्याच्या लोकार्पणामुळं एकूण 701 पैकी 625 किमी अंतराचा महामार्ग वाहतुकीस उपलब्ध झाला आहे. समृद्धीच्या उर्वरित टप्प्याचं अर्थात इगतपुरी ते आमनेपपर्यंतचं काम आता प्रगतीपथावर असून, ठाणे आणि मुंबईतून शिर्डीच्या दिशेनं येण्यासाठीचा प्रवास आणखी वेगवान होणार आहे. दोन तासांहून कमी वेळात शिर्डी गाठता येणार आहे.

समृद्धी महामार्गाचा शेवटचा अर्थात इगतपुरी ते आमने हा टप्पासुद्धा यंदाच्याच वर्षी जुलै महिन्यापर्यंत वाहतुकीसाठी उपलब्ध करून दिला जाऊ शकतो. त्यासाठी एमएसआरडीसीकडून वेगानं कामं सुरुही असून, जवळपास 90 टक्के काम पूर्णत्वास गेलं आहे. तेव्हा आता हा संपूर्ण समृद्धी महामार्ग जुलै महिन्यापर्यंत महाराष्ट्राच्या विकासाला आणखी गती देणार असं म्हणणं गैर ठरणार नाही.