Pune Lok Sabha : पुण्यात चाललंय काय? कसबा पेठ विधानसभा मतदार संघात 3 लाख 80 हजार रुपये जप्त

Pune News : पुण्यातील कसबा पेठ भागात स्थिर सर्वेक्षण पथकामार्फत दुपारच्या सुमारास 3 लाख 80 हजार 500 रुपये इतकी रक्कम हस्तगत करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे.

सौरभ तळेकर | Updated: Apr 22, 2024, 11:27 PM IST
Pune Lok Sabha : पुण्यात चाललंय काय? कसबा पेठ विधानसभा मतदार संघात 3 लाख 80 हजार रुपये जप्त title=
Pune Lok Sabha 3 lakh 80 thousand was recovered during election work

Pune Lok Sabha Election : पुणे लोकसभा मतदार संघाअंतर्गत कसबा पेठ विधानसभा मतदार संघात निवडणूक कामासाठी नियुक्त स्थिर सर्वेक्षण पथकामार्फत दुपारच्या सुमारास 3 लाख 80 हजार 500 रुपये इतकी रक्कम हस्तगत करण्यात आली असल्याची माहिती सहायक निवडणूक निर्णय अधिकारी स्नेहा देवकाते यांनी दिली आहे. फरासखाना पोलीस स्टेशन अंतर्गत शनिवार वाडा गेटसमोर आज दुपारी 12 वाजता एका इसमाकडून ही रक्कम जप्त करण्यात आली. रकमेबाबत सदर व्यक्तीने योग्य स्पष्टीकरण न दिल्याने ही रक्कम जिल्हा कोषागार कार्यालयात जमा करण्यात आली आहे.

उमेदवारांकडून निवडणूक प्रचारासाठी केल्या जाणाऱ्या खर्चाच्या नोंदी कक्ष अधिकारी व कर्मचाऱ्यांनी काटेकोरपणे अद्ययावत ठेवाव्यात, असा आदेश जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिले होते. निवडणूक आयोगाकडून खर्च संनियत्रणावरील लेख्यांची तपासणी केली जाते. यात प्रत्येक उमेदवाराने निवडणूक प्रचारासाठी केलेल्या दैनंदिन खर्चविषयक लेख्यांची तपासणी करण्यात येते. 

पुणे लोकसभेचे महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ 25 तारखेला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार उपस्थित असतील तर महायुतीची पुण्यात 25 तारखेला नदीपात्रात सभा देखील होणार आहे. तर लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला रामराम ठोकून वंचित बहुजन आघाडीतर्फे निवडणूक लढविणारे वसंत मोरे यांनी शुक्रवारी गुपचूप जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन उमेदवारी अर्ज दाखल केला.

दरम्यान, पुणे लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या विरोधात काँग्रेसतर्फे आचारसंहिता भंगाची तक्रार दाखल केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अयोध्येतील राममूर्तीच्या पाया पडत आहेत असे छायाचित्र असलेली पत्रके वाटली. तसेच 'राम मंदिर झाले आता राष्ट्रमंदिरासाठी संकल्प करूयात' या शिर्षकाखाली काही जाहिराती देण्यात आल्या होत्या. त्यामुळे काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे तक्रार नोंदवली आहे.