मनमाडमध्ये इंधन टँकर चालक पुन्हा संपावर, कोण-कोणत्या जिल्ह्यात होऊ शकतो इंधन तुटवडा?

Maharashtra Truck Driver Strike: मनमाडमध्ये इंधन टँकर चालक पुन्हा संपावर गेले आहेत. सकाळपासून इंधन पुरवठा ठप्प. अनेक जिल्ह्यात इंधन तुटवडा होण्याची शक्यता. 

Updated: Jan 10, 2024, 12:43 PM IST
मनमाडमध्ये इंधन टँकर चालक पुन्हा संपावर, कोण-कोणत्या जिल्ह्यात होऊ शकतो इंधन तुटवडा? title=
Petrol Diesel Tanker Drivers On Strike In Manmad Fuel Shortage in other city

Maharashtra Truck Driver Strike: हिट अँड रन कायद्याविरोधात टँकर चालकांत तीव्र भावना असून नाशिकच्या मनमाडमध्ये इंधन टँकर चालकांनी मध्यरात्रीपासून पुन्हा स्टेअरिंग छोडो आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. त्यामुळं मनमाडमध्ये इंधनपुरवठा ठप्प झाल्याचेही समोर येतेय. 

मनमाडच्या इंधन प्रकल्पात मध्यरात्रीपासून चालक फिरकलेच नाही त्यामुळे शुकशुकाट पसरला आहे. तर सकाळपासून भारत पेट्रोलियम हिंदुस्थान पेट्रोलियम व इंडियन ऑइल प्रकल्पातून एकही इंधना टँकर भरून बाहेर पडला नाही. त्यामुळे इंधन पुरवठा ठप्प झाल्याने उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा तसेच अनेक जिल्ह्यात इंधन तुडवडा होण्याची शक्यता झाली आहे. 

दरम्यान या संपाची कुठल्याही वाहतूक संघटनेने संपाची अधिकृत जबाबदारी स्वीकारली नाही. त्यामुळं या संपाकडे प्रशासन काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. ट्रक चालकाच्या या आंदोलनाची जबाबदारी कोणतीही वाहतूक संघटना स्वीकारायला तयार नसल्याने हे आंदोलन किती यशस्वी होईल याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. अनेक चालक उद्या टँकर भरण्यासाठी येणार नाही मात्र ज्याला टँकर भरायचा आहे त्याला विरोधही केला जाणार नाही, अशी भूमिका घेतली जात आहे.

दरम्यान, गेल्या आठवड्यात ट्रक चालक आणि पेट्रोल-डिझेल टँकर चालक यांनी संपाची हाक दिली होती. हिट अँड रन कायद्याला विरोध करत ट्रक चालक संपात सहभागी झाले होते. मात्र, नंतर सरकारसोबत झालेल्या बैठकीनंतर संप मागे घेण्यात आला होता. मात्र, आता पुन्हा एकदा ट्रक चालकांनी संपाचे हत्यार उपसले आहे. त्यामुळं पुन्हा एकदा इंधन टंचाई निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

 मनमाडमध्ये इंधन टँकर चालकांनी संपावर जाण्याच्या निर्णय घेतल्यानंतर त्याचे पडसाद उत्तर महाराष्ट्रासह मराठवाडा, विदर्भ आणि मराठवाड्यावरही पडणार आहेत. मनमाडमधून या जिल्ह्यांना इंधन पुरवठा केला जातो. त्यामुळं या जिल्ह्यांवर त्याचे परिणाम होणार आहेत. आता प्रशासन यावर तोडगा काढण्यासाठी कोणते पाऊलं उचलले जाते हे पाहणं महत्वाचे असणार आहे. 

इंधन टँकर चालक संपावर गेल्यामुळं व इंधनाचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता असल्याच्या चर्चा परिसरात निर्माण होत आहेत. त्यामुळं नागरिकांनी इंधन भरण्यासाठी पेट्रोल पंपावर एकच गर्दी केली आहे. इंधन टंचाई निर्माण होण्याच्या शक्यतेमुळं नागरिक अतिरिक्त पेट्रोलही घेऊन जात आहेत. मात्र, अद्याप कुठेही इंधन टंचाई नसल्याची माहिती प्रशासनाकडून दिली आहे. त्यामुळं नागरिकांनी गर्दी करु नये, असं आवाहन करण्यात येत आहे.