मैत्रिणीने लग्नाला नकार दिला, चिडलेल्या तरुणाने असं काही केलं ही संपूर्ण नाशिक शहर हादरले

Nashik News Today: नाशिकमधून एक धक्कादायक बातमी समोर येतेय. एकतर्फी प्रेमातून एका तरुणाने काय केलं पाहा.   

मानसी क्षीरसागर | Updated: Nov 16, 2023, 05:51 PM IST
 मैत्रिणीने लग्नाला नकार दिला, चिडलेल्या तरुणाने असं काही केलं ही संपूर्ण नाशिक शहर हादरले title=
nashik news today Seven cars were burnt due to one sided love

सागर गायकवाड, झी मीडिया

Nashik News Today: एकतर्फी प्रेमात नकार मिळाल्यावर तरुण काय काय करु शकतात याची अनेक उदाहरण तुम्ही पाहिले असतील. पण नाशिकच्या एका तरुणाने तर कहर केला आहे. तरुणीने विवाहास नकार दिल्याच्या रागातून त्याने सात वाहनांची जाळपोळ केली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या तरुणाला अटक केली आहे. 

एकतर्फी प्रेमातून एका तरुणाने त्याच्या साथीदारासह तब्बल सात वाहने पेटवून दिल्याची खळबळजनक घटना घडली. नाशिकच्या काठे गल्ली परिसरात ही घटना उघडकीस आलीय. यात फिर्यादी तरुणीच्या दोन गाड्या आणि इतर पाच अशा सात वाहनांची जाळपोळ करण्यात आली. 

या घटनेत वाहने जळून खाक झाल्याने मोठे नुकसान झाले. या घटनेनंतर भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी अवघ्या काही तासात दोघांना अटक केले. 

काय घडलं नेमकं?

या घटनेतील फिर्यादी तरुणी आणि संशयित सुमित पगारे यांची आधीपासून ओळख आहे. संशयित पगारे याने फिर्यादी तरुणीला लग्नाची मागणी घातली होती. मात्र तीने त्याला नकार दिला होता. तरीदेखील आरोपी तरुण सातत्याने तिच्याकडे लग्न करण्याचा तगादा लावत होता. तरुणीने यास नकार दिल्याने संशयित पगारे यास राग आला. 

संशयित तरुणाने त्याचे सहकारी संशयित विकी जावरे (रा. काठेगल्ली) याच्या मदतीने तरुणीच्या दुचाकीसह अन्य दुचाकी, चारचाकी वाहन आणि रिक्षाची जाळपोळ केली. स्थानिक रहिवाशांनी तातडीने पाण्याचा मारा करत आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत बहुतांशी वाहने जळून राख झाली होती. या घटनेने परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले.

डोंबिवलीत कुऱ्हाडीने फोडल्या गाड्या

डोंबिवलीत एका तरुणांने कुऱ्हाडीने गाड्या फोडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. डोंबिवली पश्चिमेच्या नेमाडे गल्ली परिसरात रात्रीच्या सुमारास हा प्रकार घडला आहे. निलेश शिनगारे या तरुणाने रागाच्या भरात हा सगळा प्रकार केला असून या प्रकरणी डोंबिवली विष्णू नगर पोलिसांनी त्याला नीलेशला अटक केली आहे.

निलेशच्या भावाला कोणीतरी मारहाण केली होती आणि याच रागात रात्रीच्या सुमारास हातात कुऱ्हाड घेऊन त्याने रिक्षा आणि दुचाकीची तोडफोड केली. यामध्ये रिक्षा आणि दुचाकींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.