शिक्षा संपवून घरी आला तेव्हा जवळच्या मित्रानेच...; अनैतिक संबंधातून नागपुरात धक्कादायक प्रकार

Nagpur Crime News : नागपुरमध्ये अनैतिक संबंधांच्या संशयातून एका मित्रानेच त्याच्या मित्राच्या हत्येचा प्रयत्न केला आहे. जखमी व्यक्तीच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरु केला आहे.

आकाश नेटके | Updated: Jan 11, 2024, 09:34 AM IST
शिक्षा संपवून घरी आला तेव्हा जवळच्या मित्रानेच...; अनैतिक संबंधातून नागपुरात धक्कादायक प्रकार title=

Nagpur Crime : नागपुरात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटना वाढलेल्या दिसत आहेत. अशातच अनैतिक संबंधांच्या संशयातून एका मित्राने दुसऱ्या मित्राची हत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे दोघेही गुन्हेगार असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून जखमीला रुग्णालयात उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केलं आहे.

नागपूरमध्ये अनैतिक संबंधाच्या संशयावरून दोन गुन्हेगार मित्रांमध्ये वाद झाला होता. सोमवारी रात्री हा वाद इतका वाढला की एका गुन्हेगाराने दुसऱ्यावर चाकूने वार केले. या हल्ल्यात मित्र गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पोलिसांनी आरोपीला अटक करुन या प्रकरणाचा अधिक तपास सुरु केला आहे. अनैतिक संबंधांच्या संशयातून हा सगळा प्रकार घडल्याचे समोर आलं आहे.

सोमवारी रात्री हुडकेश्वर पोलीस ठाण्यांतर्गत हा सगळा धक्कादायक प्रकार घडला आहे. योगराज ऊर्फ योगेश मोतिराम बांते (53) रा. गड्डीगोदाम असे आरोपीचे नाव आहे. तर नितीन गंगाधर टुले (45) रा. पवनपूत्रनगर, दिघोरी रोड, असे जखमीचे नाव आहे. पोलिसांनी नितीनची पत्नी ज्योत्सना (43) यांच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदवत आरोपी योगराजला अटक केली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे योगराज आणि नितीन हे दोघेही मित्र होते. मिळालेल्या माहितीनुसार, नितीनवर खुनाचे 3 गुन्हे दाखल होते. याशिवाय इतर गुन्ह्यांमध्येही नितीनचा सहभाग असल्याचे समोर आलं आहे. तसेच योगराज विरुद्धही अनेक गुन्हे नोंद आहेत.

योगराज आणि नितीनची घट्ट मैत्री होती. त्यांची मैत्री इतकी घट्ट होती की योगराज बराच काळ नितीनच्या घरी राहत होता. दोन वर्षांपूर्वी झोन चारच्या पोलीस उपायुक्तांनी नितीनला नागपूर जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार केले होते. मात्र वेळोवेळी तो गुपचूप नागपुरात येऊन कुटुंबीयांना भेटायचा. गेल्या महिन्यात नितीनची तडीपारी संपली आणि तो घरी आला. पत्नी आणि योगराज यांच्यात अनैतिक संबंध असल्याचा संशय नितीनला होता. यावरून नितीन आणि योगराज यांच्यात वाद झाला. नितीनने योगराजला जीवे मारण्याची धमकीही दिली होती. 

सोमवारी रात्री नऊच्या सुमारास योगराज त्यांच्या घरी पोहोचले. त्यावेळी त्याने नितीनला जोरात हाक मारली. त्यावेळी योगराजने नितीनला घरापासून थोडं दूर नेलं. या दरम्यान दोघांमध्ये पुन्हा एकदा वाद झाला. रागाच्या भरात योगराजने चाकू काढून नितीनवर एकापाठोपाठ अनेक वार केले. त्यानंतर आरडाओरडा ऐकून लोक जमा झाले. लोक जमल्याचे पाहून योगराज तिथून पळून गेला. त्यानंतर नितीनची पत्नीही तिथे आली. त्यांनी तात्काळ नितीनला रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर नितीनच्या पत्नीने पोलीस ठाण्यात जाऊन योगराजच्या विरोधात तक्रार दिली. पोलिसांनी आरोपी योगराजला अटक केली आहे.