मसाज, पेनकिलर अन्... शिवपुत्र संभाजी महानाट्यावेळी खासदार अमोल कोल्हेंना दुखापत

Shivputra Sambhaji : मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते व राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे खासदार अमोल कोल्हे शिवपुत्र संभाजी महानाट्या पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. ‘राजा शिवछत्रपती’, ‘स्वराज्यरक्षक संभाजी’, ‘स्वराज्यजननी जिजामाता’ या ऐतिहासिक मालिकांमधून अमोल कोल्हे घराघरात पोहोचले आहेत.

आकाश नेटके | Updated: May 1, 2023, 10:37 AM IST
मसाज, पेनकिलर अन्... शिवपुत्र संभाजी महानाट्यावेळी खासदार अमोल कोल्हेंना दुखापत title=

हेमंत चोपडे, झी मीडिया, पुणे : खासदार डॉ. अमोल कोल्हे (MP Doctor Amol Kolhe) 'शिवपुत्र संभाजी' (Shivputra Sambhaji play) हे नाटक घेऊन पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. डॉ. अमोल कोल्हे हे सध्या शिवपुत्र संभाजी या महानाट्याच्या प्रयोगामुळे महाराष्ट्रात चर्चेत आले आहेत. त्यांचे प्रयोग वेगवेगळ्या जिल्ह्यात यशस्वीरित्या पार पडत असतानाच एक मोठी दुर्घटना घडली आहे. डॉ. अमोल कोल्हे यांना कराड (karad) येथील प्रयोगादरम्यान दुखापत झाल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला. खासदार अमोल कोल्हे यांनी स्वतः याबाबत माहिती दिली आहे.

शिवपुत्र संभाजी महानाट्याच्या प्रयोगादरम्यान डॉ. अमोल कोल्हे यांच्या पाठीच्या मणक्याला दुखापत झाली आहे. रविवारी रात्री कराड येथे खासदार अमोल कोल्हे यांचा शिवपुत्र संभाजी महानाट्याच्या प्रयोग सुरू होता. सगळं काही सुरळीत सुरू असताना डॉ. अमोल कोल्हे यांची घोड्यावरून एन्ट्री होती. त्याच दरम्यान त्यांच्या पाठीला दुखापत झाली. त्यामुळे अमोल कोल्हे यांना पाठीच्या दुखण्याचा त्रास सुरु झाला. अमोल कोल्हे यांनी व्यायाम आणि वेदनानाशक गोळ्या खाऊन प्रयोग पूर्ण केला. दुसरीकडे महाराष्ट्राचा स्थापना दिन असल्याने 1 मे रोजीचा शिवपुत्र संभाजी महानाट्याचा कराडमधील प्रयोग होणार असून उर्वरित दोन्ही प्रयोग रद्द करण्यात आले आहेत.

छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास सांगण्यासाठी पुन्हा उभा राहीन - अमोल कोल्हे

"कोपऱ्यात बसलेल्या चाणाक्ष प्रेक्षकांच्या लक्षात आले असेल की, घोड्यावरुन फेरी मारत असताना घोड्याचा मागचा पाय दुमडला पाठीला जोरात झटका बसला. त्यामुळे पाठीच्या मणक्याला थोडीफार दुखापत झाली आहे. या दुखापतीवर लवकरात लवकर उपचार करणे गरजेचे आहे. कालचा आणि आजचा प्रयोग हा मसाज आणि गोळ्या खाऊन करतो आहे. पण माझ्या प्रकृतीच्या कारणास्तव उद्याचा प्रयोग हा शेवटचा प्रयोग असेल. जेव्हा मणक्याला दुखापत होते तेव्हा त्याच्यावर वेळेवर उपचार करणे गरजेचे असते. ज्यांनी दोन आणि तीन तारखेची तिकीटे काढली असतील त्यांना एकतर पैसे मिळतील किंवा ते 1 तारखेच्या प्रयोगाला येऊ शकतात. पण उचानक उद्भवलेल्या या दुखापतीमुळे 1 मे रोजी कराडमध्ये शेवटचा प्रयोग असणार आहे. 11 मे पासून पिंपरी चिंचवड येथे प्रयोग होणार आहेत. उपचार घेऊन छत्रपती संभाजी महाराजांचा धगधगता इतिहास सांगण्यासाठी तुमच्यासमोर उभा राहणार आहे. आयोजकांकडे मी दिलगिरी व्यक्त करतो," असे खासदार अमोल कोल्हे म्हणाले.