24 डिसेंबरची डेडलाईन वाढवून मिळणार? सरकारची विनंती, मनोज जरांगे म्हणतात आता...

मराठा आरक्षणप्रकरणी मनोज जरांगे यांनी सरकारला दिलेली डेडलाईन येत्या 24 डिसेंबरला संपणार आहे. 24 तारखेनंतर एक तासही वाढवून मिळणार नसल्याचं जरांगेंनी सांगितलं आहे. तसंच 23 डिसेंबरला बीडमध्ये इशारा सभेचंही आजोजन करण्यात आलं आहे. 

राजीव कासले | Updated: Dec 18, 2023, 07:19 AM IST
24 डिसेंबरची डेडलाईन वाढवून मिळणार? सरकारची विनंती, मनोज जरांगे म्हणतात आता... title=

Maratha Reservation : मनोज जरांगे 24 डिसेंबरच्या मुदतीवर ठाम आहेत. एका तासानंही मुदत वाढवून देणार नसल्याची भूमिका त्यांनी अंतरवाली सराटीत बैठकीनंतर मांडली. ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी मुदत वाढवून देण्याबाबत शनिवारी विनंती केली होती. मात्र सरकारची ही विनंती जरागेंनी धुडकावून लावलीय.  24 डिसेंबरपर्यंत मराठ्यांना ओबीसीतून आरक्षणाचा (Maratha Reservation) कायदा पारित न केल्यास 23 डिसेंबरला पुढील आंदोलनाची दिशा ठरवणार असल्याचा इशारा मनोज जरांगेंनी (Manoj Jarange Patil) दिलाय. मराठा समाजातल्या प्रतिनिधींसोबत त्यांनी अंतरवाली सराटीत बैठक घेतली. या बैठकीत पुढच्या रणनीतीवर चर्चा करण्यात आली. 

छगन भुजबळांबदद्ल नाराजी
मनोज जरांगे पाटील आणि छगन भुजबळांमधली (Chagan Bhujbal) नाराजी टोकाला गेल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट झालं. जरांगेंची समजूत काढण्यासाठी आलेले मंत्री गिरीश महाजन आणि सांदिपान भुमरे यांच्याकडे जरांगेंनी भुजबळांची तक्रार केली. भुजबळ मराठ्यांबद्दल विषारी का बोलतात, असा सवाल जरांगेंनी केला. तर वाद थांबवण्याची विनंती भुजबळांना करणार असल्याचं महाजनांनी स्पष्ट केलं.

दरम्यान, मराठा आरक्षणासाठी 23 डिसेंबरला जरांगे पाटील यांची बीडमध्ये भव्य सभा होणार आहे. 24 तारखेला सरकारला दिलेला अल्टिमेटम संपणार आहे. त्यामुळे बीडमझल्या सभेत जरांगे काय बोलणार याकडे मराठा समाजाचं लक्ष लागलं आहे. जरांगेच्या इशारा सभेची जोरदार तयारी सुरु आहे. 

छगन भुजबळ यांची बोचरी टीका
भिवंडीच्या ओबीसी मेळाव्यात अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी अत्यंत तिखट शब्दात मनोज जरांगेंवर टीका केली. आमची लायकी काढणारा जरांगे म्हणजे माकड असून बेवडा असल्याची टीका भुजबळांनी केली. तसंच जरांगेंची दादागिरी अजिबात सहन करणार नसल्याचा इशाराही त्यांनी दिला.  जे ओबीसींविरोधात बोलतायत, त्यांचा कार्यक्रम येणाऱ्या निवडणुकीत करा, असं आवाहन छगन भुजबळांनी केलंय. भिवंडीमधल्या ओबीसी मेळाव्यातून भुजबळांनी हे विधान केलं.  जरांगेंच्या पाठोपाठ भुजबळांनी राज्य सरकारवरही जोरदार हल्लाबोल केला. जरांगेंसमोर आणखी किती झुकणार असा थेट सवाल भुजबळांनी शिंदे सरकारला केला. तसंच आम्हाला समजवण्यापेक्षा जरांगेंना समजवा असा टोलाही त्यांनी सरकारला लगावला. त्यामुळे आता हा वाद शमण्याऐवजी आणखी पेटणार की काय अशी चर्चा सुरू झालीये.