भाजपाला धक्का! उन्मेष पाटील यांनी हाती बांधलं शिवबंधन, उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत प्रवेश

LokSabha Election: जळगावमध्ये भाजपाला मोठा धक्का बसला आहे. भाजपा नेते उन्मेष पाटील यांनी खासदारकीचा राजीनामा दिला असून, ठाकरे गटात प्रवेश केला आहे. उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत मातोश्रीवर हा पक्षप्रवेश पार पडला.   

शिवराज यादव | Updated: Apr 3, 2024, 01:02 PM IST
भाजपाला धक्का! उन्मेष पाटील यांनी हाती बांधलं शिवबंधन, उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत प्रवेश title=

LokSabha Election: जळगावमध्ये भाजपाला मोठा धक्का बसला आहे. भाजपा नेते उन्मेष पाटील यांनी खासदारकीचा राजीनामा दिला असून, ठाकरे गटात प्रवेश केला आहे. उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत मातोश्रीवर हा पक्षप्रवेश पार पडला. बदला म्हणून नाही तर बदल म्हणून मी हे राजकारण करत आहे असं सांगत त्यांनी आपण कोणतीही अट न ठेवता शिवसेनेत प्रवेश करत असल्याचं सांगितलं. तसंच पण बदल्याचं राजकारण मनाला वेदना देणारं होतं असं सांगात भाजपावर टीका केली. दरम्यान उद्धव ठाकरेंनी यानिमित्ताने भाजपावर निशाणा साधत वापरुन फेकून द्या अशी त्यांची वृत्ती असल्याची टीका केली. तसंच विकासाच्या वाटेत येणाऱ्यांची वाट लावून दिल्लीत पोहोचू असा निर्धार व्यक्त केला. 

"जळगावचे विद्यमान खासदार, उत्तर महाराष्ट्रातील भाजपा नेते उन्मषे पाटील आज शिवसेनेच्या कुटुंबात प्रवेश करत आहेत. त्यांच्यासह पारोळाचे नगराध्यक्ष करण पवार, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी प्रवेश केला आहे. ते निष्ठावंत भाजपा कार्यकर्ते म्हणून ओळखले जात होते. पण निष्ठावंतांच्या नशिबी संघर्ष असतो. शिवसेनेत कदर असल्याने ते आले आहेत. त्यांच्या येण्याने उत्तर महाराष्ट्रात शिवसेनेला बळ मिळेल. संघर्षाच्या काळात त्यांच्यासारखा नेता उद्धव ठाकरेंसह उभा राहिला याबद्दल अभिनंदन करतो," असं संजय राऊत यावेळी म्हणाले. शिवसेनेतील प्रवेशाने जळगावमधील निवडणूक फक्त रंगतदार नाही, तर विजयाकडे घेऊन जाणारी होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. 

"राजकारण करत असताना आमदार, खासदार होण्याचं स्वप्न नव्हतं. एका हेतूने काम करत होतो. पण प्रामाणिक कार्यकर्त्याची अवहेलना होत आहे. बदल्याची भावना रुजवली जात असून, ती घातक आहे. आपण या पापाचे वाटेकरी होऊ नये असं ठरवलं. मान सन्मान नको, पण स्वाभिमान जपला जात नसेल तर थांबण्यात अर्थ नाही," अशा भावना उन्मेष पाटील यांनी व्यक्त केल्या. 

उद्धव ठाकरेंनी यावेळी उन्मेष पाटील यांना तुमच्या आणि माझ्या व्यथा सारख्याच आहेत असं सांगितलं. ते म्हणाले की, "काम झालं की फेकून द्या ही भाजपाची वृत्ती आहे. तुम्ही प्रवाहाच्या विरोधात उडी मारली आहे. हा प्रवाह जनमताचा आहे. प्रवाह एकदा फिरला की, मोठे ओंडकेही वाहून जातात. तशीच भाजपाची अवस्था होणार आहे. आज माझ्याकडे काही नाही, जे तिथे गेलेत त्यांची ओळख खोकेवाले अशी झाली आहे. अशा वेळी तुम्ही काम करण्यासाठी, बदल करण्यासाठी येथे आला आहात. सत्ता असते तिथे लोक जातात. पण जनतेची सत्ता आणण्यासाठी तुम्ही शिवसेनेसोबत आलात. 

पुढे त्यांनी सांगितलं की, "आपलं ध्येय, भगवा एक आहे. पण फसगत करणाऱ्यांना यापुढे निवडून द्यायचं नाही. हा मतदारसंघ आम्ही दरवेळी भाजपाला सोडत होतो. पण आता पहिल्यांदा छत्रपती शिवरायांचा अस्सल भगवा जळगावातून लोकसभेत जाईल. भाजपाने वापर करुन फेकलेले लोक भेटायला येत आहेत. पण तुम्ही आज देशाला दिशा दाखवून दिली आहे. सर्वजण शेपूट घालणारे नाहीत हे दाखवलं याबद्दल अभिनंदन. आपण एकत्रितपणे विकासाच्या वाटेत येणाऱ्यांची आपण वाट लावून दिल्लीत जाऊ".