उदयनराजेंनी शरद पवारांना कॉलर उडवून दिलं उत्तर, म्हणाले 'माझं बारसं जेवलेल्यांना...'

LokSabha Election: उदयनराजे भोसले साताऱ्यातून निवडणूक लढण्यावर ठाम आहे. मी उभा राहणार म्हणजे राहणार. जे काही पुढे होईल ते पाहू असं ते म्हणाले आहेत. यावेळी त्यांनी शरद पवारांना कॉलर उडवून उत्तर दिलं.   

शिवराज यादव | Updated: Apr 4, 2024, 05:58 PM IST
उदयनराजेंनी शरद पवारांना कॉलर उडवून दिलं उत्तर, म्हणाले 'माझं बारसं जेवलेल्यांना...' title=

LokSabha Election: भाजपाने अद्यापही साताऱ्यातून उदयनराजे भोसलेंची उमेदवारी जाहीर केलेली नाही. यामुळे साताऱ्यातून उदयनराजेंना तिकीट मिळणार की नाही याबाबत संभ्रम व्यक्त होत आहे. दरम्यान उदयनराजे भोसले यांनी मात्र आपण निवडणूक लढवणारच असा निर्धार व्यक्त केला आहे. मी आजपर्यंत कधीही राजकारण केलं नसून लोकहिताचं समाजकारण केलं आहे. मी कधी कोणाला दुखावलं नाही असंही ते म्हणाले आहेत. तसंच कॉलर उडवून शरद पवारांना उत्तर दिलं आहे. ते साताऱ्यात प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते. 

"मी उभा राहणार म्हणजे राहणार. जे काही पुढे होईल ते पाहू. लोकांचा मला चांगला प्रतिसाद आहे. मी आजपर्यंत कधीही राजकारण केलं नसून लोकहिताचं समाजकारण केलं आहे. मी कधी कोणाला दुखावलं नाही. लोकशाही असून लोक निर्णय घेतील," असं उदयनराजे म्हणाले आहेत. 

दरम्यान शरद पवारांनी कॉलर उडवून दिलेल्या आव्हानाबद्दल विचारण्यात आलं असता त्यांनीही कॉलर उडवून दाखवली. उदयनराजेंनी तुमच्याशी संपर्क साधल्यास त्यांच्याशी बोलणार का? असा प्रश्न शरद पवारांना विचारण्यात आला होता. त्यावर शरद पवारांनी तशी शक्यता नाही सांगत कॉलर उडवली होती. यावर उदयनराजे म्हणाले की, "शरद पवार वडीलधारे आहेत. माझं बारस जेवलेल्यांबद्दल मी काय बोलणार. कॉलर उडवण्याची माझी स्टाईल असून त्यावर अनेकदा टीका झाली आहे. तुम्ही कॉलर काढून घेऊ शकता पण लोकांचा माझ्यावर जीव आहे तो काढून घेऊ शकत नाही". 

उदयनराजे यांनी यावेळी वैचारिक मतभेद असले तरी माझे सर्वांसह चांगले संबंध आहेत असं स्पष्ट केलं. "चूक, बरोबर असले तरी विचार आपापले असतात. चर्चेतून मार्ग काढता येतो. श्रीनिवास पाटील, शशिकांत शिंदे हे मोठे लोक आहेत. त्यांच्याशी माझे चांगले संबंध आहेत," असं उदयनराजे म्हणाले. 

"आज पाण्याचा प्रश्न फार मोठा आहे. धरणाची पातळी खालावली आहे. पाऊस लवकर पडला पाहिजे. तसंच लोकसंख्या वाढते त्या तुलनेत प्रश्न वाढत जातात. पण विकास कधी थांबत नाही. ती प्रक्रिया सुरुच असते," असं ते म्हणाले. महाविकास आघाडीने अद्याप उमेदवार जाहीर केला नसून, निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न आहे का? असं विचारण्यात आलं असता त्यांचं माझ्यावर प्रेम आहे असं उत्तर त्यांनी दिलं. 

सातारा लोकसभा मतदारसंघातून उदयनराजे भोसले यांना भाजपाकडून उमेदवारी मिळणं आता जवळपास निश्चित झालं आहे. आता फक्त याची औपचारिक घोषणा होणं बाकी आहे. उदयनराजे भोसले दिल्लीत भाजपाच्या पक्षश्रेष्ठींशी चर्चा करुन साताऱ्यात परतल्यानंतर जिल्हा प्रवेश सीमेवर शिरवळ-निरा नदीजवळ समर्थकांनी त्यांचं भव्य स्वागत केलं होतं. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना उदयनराजे भोसले यांनी सूचक विधान करत भाजपाच्या पक्षश्रेष्ठींनी तसा शब्द दिल्याचं सांगितलं आहे. त्यांच्या गळ्यात यावेळी भाजपाचं कमळ चिन्ह असणारं उपरणं घातलं होतं.