यापुढे कोणतीही निवडणूक लढवणार नाही; एकनाथ खडसेंची मोठी घोषणा, म्हणाले, राजकीय संन्यास...

Eknath Khadse: एकनाथ खडसे यांनी एक मोठी घोषणा केली आहे. यापुढे खडसे आमदारकीची व खासदारकीची निवडणुक लढवणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. 

मानसी क्षीरसागर | Updated: May 12, 2024, 04:44 PM IST
यापुढे कोणतीही निवडणूक लढवणार नाही; एकनाथ खडसेंची मोठी घोषणा, म्हणाले, राजकीय संन्यास... title=
loksabha election I will not contest any election says Eknath Khadse

Eknath Khadse: ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी यापुढे निवडणुका न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. पत्रकार परिषद घेत त्यांनी हा निर्णय जाहीर केला आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर खडसे यांनी हा निर्णय घेतल्याने जळगाव जिल्ह्यातील राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. तसंच, एकनाथ खडसे यांची लवकरच भाजपात घरवापसीदेखील होणार आहे. खडसे यांच्या भाजपप्रवेशाला दिल्लीकडून हिरवा कंदिल मिळाल्याचं सांगण्यात येतंय. मात्र भाजपमध्ये प्रवेश कधी होणार, याची मात्र अद्याप तारीख सांगण्यात आलेली नाहीये. 

एकनाथ खडसे यांनी मोठा निर्णय जाहीर केला आहे. त्यांनी म्हटलं आहे की, मी या पुढे विधानसभेची निवडणुक लढवणार नाही. मी आता विधानपरिषदेचा सदस्य आहे. हे सदस्यत्व असताना दुसरी  आमदारकीची निवडणुक लढवणे योग्य होणार नाही. मी आता विधानसभेची निवडणुक लढवणार नाही, असं एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे. तसंच, खासदारकी माझ्या परिवारात आहे. त्यामुळं खासदारकीची निवडणूकदेखील मी लढवणार नाही. ज्या छोट्या छोट्या निवडणुका आहेत. त्या लढवण्याच्या संदर्भात आजतरी विचार केलेला नाही. असं खडसे यांनी स्पष्ट केले आहे. 

एकनाथ खडसे यांचा राजकीय संन्यास आहे का? असा प्रश्न सध्या चर्चेत आहे. यावर त्यांनी राजकीय संन्यास मरेपर्यंत घेणार नाही, असं स्पष्ट उत्तर दिलं आहे.  एकनाथ खडसे यांनी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्वचा राजीनामा दिला होता. तसंच, भाजपमध्ये प्रवेश करण्यआधीच ते सून रक्षा खडसे यांचा प्रचार करताना दिसत होते. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना मुळ पक्षासोबत यावे, असं म्हटलं होतं. त्यावर पत्रकारांनी एकनाथ खडसे यांना प्रश्न विचारला होता. त्यावरही त्यांनी उत्तर दिलं आहे. पंतप्रधान मोदी असं का म्हटलं हे तर मोदीजीच सांगू शकतील. त्याचे अर्थ वेगवेगळे कुणाला लावायचे असतील ते लावू शकतात. परंतु, मला असं वाटतं नरेंद्र मोदी यांना सध्या तरी कोणाच्या मदतीची आवश्यकता भासणार नाही. एवढे बहुमत त्यांना या निवडणुकीत मिळेल. 

भाजपमध्ये प्रवेश कधी?

एकनाथ खडसे यांच्या भाजपप्रवेशावरुन पक्षात नाराजी असल्याचा सूर उमटला असल्याची चर्चा होती. मात्र, नाथाभाऊंनी या चर्चा फेटाळून लावत कोणाची नाराजी वगैरे नाहीये. लोकसभेची निवडणूक संपल्यानंतर तातडीने माझा भाजपमध्ये प्रवेश होईल, असे विनोद तावडे यांनी सांगितले आहे. 

दरम्यान, जळगाव जिल्ह्यात सोमवारी 13 मे रोजी मतदान होत आहे. रावेर लोकसभेत मतदारसंघात महायुतीकडून रक्षा खडसे यांना तिसऱ्यांदा उमेदवारी देण्यात आली आहे.