'भाजपाने शिंदेंचा बळी घेऊ नये', बच्चू कडूंच्या टीकेला आशिष शेलारांनी दिलं उत्तर, 'जरा स्वत:च्या पक्षाकडे...'

LokSabha Election: भाजपासह महायुतीत सहभागी असणारे बच्चू कडू सध्या भाजपावर प्रचंड नाराज असून जाहीर टीका करत आहेत. भाजपाने एकनाथ शिंदे यांचा बळी देऊ नये असं ते म्हणाले आहेत. दरम्यान त्यांच्या टीकेला आशिष शेलार यांनी उत्तर दिलं आहे.   

शिवराज यादव | Updated: Apr 3, 2024, 02:01 PM IST
'भाजपाने शिंदेंचा बळी घेऊ नये', बच्चू कडूंच्या टीकेला आशिष शेलारांनी दिलं उत्तर, 'जरा स्वत:च्या पक्षाकडे...' title=

LokSabha Election: भाजपासह महायुतीत सहभागी असणारे बच्चू कडू सध्या भाजपावर प्रचंड नाराज असून जाहीर टीका करत आहेत. भाजपाने एकनाथ शिंदे यांचा बळी देऊ नये असं ते म्हणाले आहेत. दरम्यान त्यांच्या टीकेला आशिष शेलार यांनी उत्तर दिलं असून, आपल्या पक्षाकडे लक्ष द्या असा सल्ला दिला आहे. भाजपाने अमरावतीत बच्चू कडू यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर बच्चू कडू यांच्या नाराजीला सुरुवात झाली होती. त्यांनी जाहीरपणे आपण नवनीत राणा यांना निवडणुकीत पाडणार असल्याचं जाहीर केलं आहे.

बच्चू कडू काय म्हणाले?

"ही निवडणूक नाही तर जनआंदोलन आहे हे सिद्ध करुन दाखवणार आहे. प्रत्येक पक्षातील कार्यकर्ता स्वाभिमानाने समोर येईल. नेते लाचार झाले आहेत, पण कार्यकर्ता लाचार झालेला नाही. आम्ही एका कार्यकर्त्याला दिनेश बुब यांना निवडून आणल्याशिवाय राहणार नाही," असं बच्चू कडू म्हणाले आहेत. 

"अमरावती लोकसभेच्या मतदारसंघांमध्ये कोणाची लाट नाही. एक नकार मात्र नक्की आहे. नवनीत राणा नको, अशी लोकांची भावना आहे. भाजपच्या शेवटच्या कार्यकर्त्याला जरी विचारलं तरी तुम्ही सांगेल की ज्यांनी आमचं कार्यालय फोडलं, भाजपाच्या कार्यकत्याला रक्तबंबाळ केलं, पालकमंत्र्यांना ‘बालकमंत्री’ म्हटलं. त्यामुळे हे भाजपचे लोकही फक्त त्यांच्यासोबतआहेत. पण आम्ही उमेदवारी अर्ज दाखल करणार आहोत आणि आमचा उमेदवार जिंकणार," असा निर्धार बच्चू कडू यांनी व्यक्त केला आहे. 

"भाजपाने एकनाथ शिंदेंचा बळी घेऊ नये. त्यांना कशा पद्धतीने मदत केली पाहिजे, ते पाहिलं गेलं पाहिजे. भावना गवळी त्या ठिकाणी पाच वर्षांपासून खासदार आहेत. त्यामुळे कोणाला तिकीट द्यावं तो त्यांचा प्रश्न आहे. मी फक्त अमरावती पुरताच बोलेन," असंही ते म्हणाले.

आशिष शेलार यांचं उत्तर

आशिष शेलार यांना बच्चू कडू यांच्या एकनाथ शिंदेंबाबतच्या विधानाबद्दल विचारण्यात आलं असता त्यांनी स्वत:च्या पक्षाकडे लक्ष द्यावं असं उत्तर देण्यात आलं. "बच्चू कडू यांनी त्यांच्या पक्षाकडे लक्ष द्यावं. एकनाथ शिंदे यांना आम्ही सर्व मित्रपक्षांनी मजबुतीने मुख्यमंत्री पदावर बसवलं आहे," असं आशिष शेलार म्हणाले.