'विरोधीपक्षाच्या उमेदवाराला भेटूही नका', अजित पवार असं का म्हणाले? इशारा देत म्हटले, 'गप्पा..'

Loksabha Election 2024 Maval Constituency Ajit Pawar: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी मावळमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. यावेळेस कार्यकर्त्यांना मार्दर्शन करताना त्यांनी विरोधी पक्षाच्या उमेदवाराला न भेटण्याचं आवाहन केलं.

स्वप्निल घंगाळे | Updated: Apr 9, 2024, 07:46 AM IST
'विरोधीपक्षाच्या उमेदवाराला भेटूही नका', अजित पवार असं का म्हणाले? इशारा देत म्हटले, 'गप्पा..' title=
जाहीर भाषणात अजित पवारांचं विधान

Loksabha Election 2024 Maval Constituency Ajit Pawar: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे त्यांच्या रोखठोक विधानांसाठी प्रसिद्ध आहेत. अनेकदा सार्वजनिक सभेमध्ये एखाद्या अतिउत्साही कार्यकर्त्याला मारलेला टोमणा असेल किंवा पत्रकारपरिषदेमध्ये पत्रकारांचीच घेतलेली फिरकी असेल, अजित पवारांना आपल्याकडून अशी फिरकी घेण्याची संधी मिळू नये असेच प्रत्येकाला वाटते. मात्र सध्या सुरु असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या पार्श्वभूमीवर खास करुन बारामती मतदारसंघामध्ये नात्यानात्याच रस्सीखेच असल्याने संपूर्ण राज्याचं लक्ष या मतदारसंघाकडे लागलं आहे. मात्र बारामतीबरोबरच पुणे पट्ट्यातील अनेक मतदारसंघांमध्ये अशाप्रकारे राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्याने ओळखी ओळखीतीच उमेदवार निवडणुकीसाठी उभे असून त्यामुळे कार्यकर्त्यांची सर्वांनाच संभाळताना गोची होत आहे. खरं कर राज्यभरामध्ये उमेदवारांच्या प्रचारासाठी सभा, मेळावे घेतले जात आहेत. अशाच एका मेळाव्यात अजित पवारांनी आपल्या कार्यकर्त्यांना खेट आपल्या खास शैलीमध्ये दमच भरला. 'विरोधी पक्षातील उमेदवाराला भेटायला जाऊ नका,' अशी तंबी अजित पवारांनी दिली. एवढ्यावरच न थांबता अजित पवारांनी 'तुम्ही विरोधी पक्षाच्या उमेदवाराला भेटायला गेलात तर मी तुमचं काहाही ऐकूण घेणार नाही. सर्वांनी महायुतीचा धर्म पाळलाच पाहिजे,' असंही अजित पवार म्हणाले. 

"13 तारखेचं मतदान पार पडेपर्यंत..."

मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीचे श्रीरंग बारणे विरुद्ध महाविकास आघाडीचे संजोग वाघेरे अशी थेट लढत होणार आहे. या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट विरुद्ध उद्धव ठाकरे गट असा सामना पहायला मिळणार आहे. याच पार्श्वभूमीवर मावळमधील कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामध्ये अजित पवारांनी सोमवारी मार्गदर्शन केलं. यावेळेस त्यांनी, "महायुतीचा उमेदवार आपल्याला निवडून आणायचा आहे. आपल्यापैकी बरेच जण पिंपरी-चिंडवडमधील अनेकांना ओळखत असाल. आपल्या विरोधातील उमेदवाराचे आणि आपले अनेक वर्षांपासूनचे संबंध आहेत. मात्र असं असलं तरी माझी महायुतीमधील सर्व कार्यकर्त्यांना तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व सहकाऱ्यांना एक आग्रहाची विनंती आहे की, 13 तारखेचे (13 मे रोजी इथे मतदान पार पडणार आहे) मतदान पार पडेपर्यंत कोणालाही भेटायला जाऊ नका," असं कार्यकर्त्यांना सांगितलं. तसेच पुढे बोलताना आपण कोणतंही कारण ऐकून घेणार नसल्याचंही अजित पवारांनी अधोरेखित केलं. "दादा, सहज गेलो होतो. गप्पा मारायला गेलो होतो, असं नको. गप्पा नको आणि टप्पा नको. मैत्री, नातं-गोतं, भावकी-रावकी बाजूला ठेवा. महायुतीचा धर्म पाळा," अशा शब्दांमध्ये अजित पवारांनी कार्यकर्त्यांचे कान टोचले आहेत. 

मोदींना ताकद देण्यासाठी काम करायचं आहे

संजोग वाघोरे हे एकेकाळी अजित पवारांचे निकटवर्तीय होते. मात्र आता ते उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये असल्याने कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम होण्याची शक्यता आहे. म्हणूनच अजित पवारांनी आपलं निशाण धनुष्यबाण असल्याचं कार्यकर्त्यांना आवर्जून सांगितलं आहे. "समोरचा उमेदवार तुम्हाला सांगेल की दादांनीच मला पाठवलं आहे. दादांनीच मला उभं राहण्यास सांगितलंय. तर ते धादांत खोटं आहे. मी स्पष्ट आणि खरा बोलणारा कार्यकर्ता आहे हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. त्यामुळे कुठल्याही गोष्टीवर विश्वास ठेवू नका. धनुष्यबाण ऐके धनुष्यबाण हे चिन्ह आपल्याला माळवमध्ये चालवायचे आहे," असं अजित पवार म्हणाले. “पंतप्रधान नरेंद्र मोदींची निर्णय घेण्याची क्षमता आपण सर्वांनी पाहिली. त्यामुळे आपल्याला पंतप्रधान मोदींना ताकद देण्याचे काम करायचे आहे. यामध्ये आपण मागे राहता कामा नये. संविधान बदण्याचे काम होत आहे असे आरोप विरोधकांकडून होत आहेत. पण कुठेही संविधान बदलण्याचे काम झाले नाही.विरोधक वाटेल ते बोलत असून मागील 10 वर्षात कुठेही संविधान बदलण्याचे काम झाले नाही,” असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला.