Latur LokSabha : विलासरावांच्या लातूरमध्ये भाजप हॅटट्रिक करणार? की काँग्रेसला सुर गवसणार?

Latur LokSabha constituency : कधीकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेला लातूर मतदारसंघ सध्या भाजपच्या ताब्यात आहे. गेल्या सलग दोन निवडणुकांमध्ये इथं काँग्रेसला पराभवाचा सामना करावा लागला. यंदा लातूरची ही गढी कोण राखणार?

सौरभ तळेकर | Updated: Mar 14, 2024, 11:50 PM IST
Latur LokSabha : विलासरावांच्या लातूरमध्ये भाजप हॅटट्रिक करणार? की काँग्रेसला सुर गवसणार? title=
Latur LokSabha constituency Sudhakar Shrangare vs congress

Sudhakar Shrangare vs congress : लातूर... कधीकाळची राष्ट्रकूट राजघराण्याची राजधानी... तब्बल १९ मार्गांनी जोडली गेलेली गंजगोलाईची बाजारपेठ ही लातूरची खासियत... हैदराबाद संस्थान भारतात विलीन होईपर्यंत लातूर हैदराबाद संस्थानच्या अमलाखाली होतं. १९६० मध्ये ते महाराष्ट्रात विलीन झालं. 15 ऑगस्ट 1982 रोजी मराठवाड्यात लातूर जिल्हा अस्तित्वात आला. विलासराव देशमुख आणि डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर असे दोन माजी मुख्यमंत्री लातूरनं दिले. माजी मंत्री शिवराज पाटील चाकूरकर, केशवराव सोनवणे अशा दिग्गज राजकीय नेत्यांचा जिल्हा... मात्र एवढे मातब्बर नेते असतानाही लातूर विकासापासून दूरच राहिलं.

लातूरच्या समस्या काय?

भीषण पाणीटंचाई लातूरकरांच्या पाचवीलाच पुजलेली... पिण्याच्या पाण्याअभावी लातूर वर्षानुवर्ष तहानलेलंच आहे. त्यात दूषित पाणीपुरवठ्यानं डोकेदुखी वाढवलीय. लातूर जिल्हा रुग्णालयाचा प्रश्नही प्रलंबित आहे. आरोग्याच्या विविध समस्या देखील नागरिकांना जाणवतात. तर रस्ते आणि सोईसुविधांचा अभाव देखील दिसून येतो.

मतदारसंघ पुनर्रचनेनंतर 2009 पासून लातूर लोकसभा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव झाला. विलासराव देशमुख यांच्या निधनानंतर झालेल्या सलग दोन निवडणुकीत काँग्रेसचा उमेदवारांचा पराभवाची चव चाखावी लागली.

लातूरचं राजकीय गणित

2009 मध्ये काँग्रेसचे जयवंत आवळे यांनी भाजपचे सुनील गायकवाड यांचा ८ हजार मतांनी पराभव केला. मात्र 2014 मध्ये मोदी लाटेत भाजपचे डॉ. सुनील गायकवाड यांनी काँग्रेसचे दत्तात्रय बनसोडे यांना तब्बल अडीच लाखांच्या मताधिक्यानं हरवलं. 2019 मध्ये भाजपच्या सुधाकर श्रृंगारे यांनी काँग्रेसचे मच्छिंद्र कामत यांचा पावणे तीन लाखांनी पाडाव केला. विधानसभेत सध्या लातूर शहरमधून अमित देशमुख आणि लातूर ग्रामीणमधून धीरज देशमुख हे दोन काँग्रेस आमदार आहेत. अहमदपूरमध्ये बाबासाहेब पाटील आणि उदगीरमधून संजय बनसोडे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत. निलंग्यात भाजपचे संभाजी पाटील निलंगेकर, तर लोहामध्ये शेकापचे शामसुंदर शिंदे आमदार आहेत.

भाजपकडून अनेकजण गुडघ्याला बाशिंग बांधून तयार होते. मात्र भाजपनं पुन्हा एकदा विद्यमान खासदार सुधाकर श्रृंगारे यांनाच उमेदवारी जाहीर केलीय. तर काँग्रेसकडेही इच्छुकांची भाऊगर्दी असली तरी मातब्बर, तगडा उमेदवार नाही. माजी सनदी अधिकारी भा. ई. नागराळे आणि बाबासाहेब गायकवाड हे काँग्रेसकडून इच्छुक असल्याचं समजतंय. 

दरम्यान, मराठा आरक्षणावरून मनोज जरांगेंनी सुरू केलेल्या आंदोलनाचा परिणाम यंदाच्या निवडणुकीत पहायला मिळणार आहे. भाजपसाठी सध्या तरी पोषक वातावरण असल्याचं मानलं जातंय. भाजपला लागोपाठ तिसऱ्यांदा निवडणूक जिंकून विजयाची हॅटट्रिक करायची आहे. तर पुन्हा एकदा पक्षाला प्रतिष्ठा मिळवून देण्याचं मोठं आव्हान काँग्रेसपुढं आहे. यंदाच्या निवडणुकीत भाजपचं वर्चस्व मोडून काढणं काँग्रेसला खरंच शक्य होईल? असा सवाल विचारला जातोय.