कोका-कोलाचा महाराष्ट्रातील पहिला प्रकल्प कोकणात, मुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते भूमिपूजन

कोकणातल्या खेड लोटे एमआयडीसी इथं हिंदूस्थान कोका-कोला ब्रेव्हरेज कंपनीचा प्रकल्प उभा राहतोय, या प्रकल्पाचं भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडलं. कोकणचा विकास हाच आमचा ध्यास असल्याचं यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितलं.  

Updated: Nov 30, 2023, 08:34 PM IST
कोका-कोलाचा महाराष्ट्रातील पहिला प्रकल्प कोकणात, मुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते भूमिपूजन title=

रत्नागिरी : कोकण महाराष्ट्राचं वैभव आहे, कोकणावर मी मनापासून प्रेम करतो. कोकण विकास प्राधिकरणाची अंमलबजावणी लवकरच होईल. कोकणचा विकास हाच आमचा ध्यास आहे. कोकणात जे आवश्यक आहे ते सर्व शासन पूर्ण करेल,असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी व्यक्त केला आहे.  खेड लोटे एमआयडीसी (Khed-Lote MIDC) इथं हिंदूस्थान कोका-कोला ब्रेव्हरेज कंपनीच्या प्रकल्पाचे (Coca-Cola Brewery Project) भूमिपुजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते कोनशिलेचे अनावरण करुन, श्रीफळ वाढवून आणि कुदळ मारून करण्यात आलं.

पर्यावरणपूरक उद्योग आले पाहिजेत. रत्नागिरी जिल्हा आता उद्योग वाढीसाठी पुढे येत आहे. आत्ताचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सातत्याने पाठपुरावा करून हा प्रकल्प आणण्यात यश मिळविलं. महाराष्ट्रामध्ये उद्योग, व्यापार वाढण्यासाठी गती दिली आहे. अवघ्या महिनाभात कोका कोलाला आवश्यक त्या परवानगी देण्यात आल्या, यालाच गतिमान सरकार म्हणतात. अशा उद्योगांसाठी महाराष्ट्र 'रेड कार्पेट' टाकून तयार आहे असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.

या कंपनीत 2500 कोटी रुपयांची गुंतवणूक आहे. साठ उत्पादने या कंपनीतून उत्पादित होणार आहेत. स्थानिक लोकांना रोजगार देण्याची भूमिका शासनाची आहे, स्थानिकांना प्राधान्य दिले जाईल. कोकणच्या जनतेने नेहमीच बाळासाहेबांवर प्रेम केलं आहे. परंतु, काही लोकांनी केवळ राजकारण केले उद्योग आणले नाहीत. कोकाकोला प्रकल्प मोठा आहे. महाराष्ट्रात यापुढेही उद्योग येतील. कोकणाला विकासाकडे न्यायचे आहे. प्रगतीकडे न्यायचे आहे. मोठ्या प्रमाणावर उद्योगधंदे आले पाहिजेत. गुंतवणुकीच्या पसंतीसाठी महाराष्ट्र हे प्रमुख राज्य आहे, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सहकार्यामुळे राज्यात विकास उद्योग वाढतो आहे. कोकणातील समुद्र किनारा समृद्ध आहे, यामुळे पर्यटन आणि उद्योग वाढीला चालना मिळेल. मुंबई गोवा ग्रीन फिल्ड रस्ता तयार करतोय. कोकणचा विकास हाच आमचा ध्यास आहे. त्यामुळे लवकरच कोकण विकास प्राधिकरणाची अंमलबजावणी होईल, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

गेले अनेक दिवस कोका कोला प्रकल्प रखडला होता. आपण त्याकडे गांभीर्याने लक्ष दिले आणि अल्पावधीत सर्व सुविधा या कंपनीला उपलब्ध करून दिल्या असं उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सांगितलं. एमआयडीसीच्या माध्यमातून आवश्यक त्या परवानग्या देण्यात आल्या. आज याच कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोका कोला कंपनीला 3 लाख 7 हजार चौ. मी.ची जमीन हस्तांतरण पावती देण्यात येणार आहे. इथल्या जमीनदारांचे काही प्रश्न होते. माजी मंत्री रामदास कदम आणि आपण आणि एमआयडीसीचे अधिकारी यांनी ग्रामस्थांचे प्रश्न सोडविले. प्रकल्प सुरू झाल्यावर 80 टक्के स्थानिकांना नोकऱ्या देण्याची मागणी आहे. या मागणीला प्राधान्य देणार आहोत, असंही  उद्योग मंत्री म्हणाले.