उन्हाळ्यात होणाऱ्या टॅनिंगवर 'हे' सोपे घरगुती उपाय नक्की करा

मार्च महिन्यापासून हवेतील तापमान वाढण्यास सुरुवात होते. सूर्याची अतिनील किरणं त्वचेच्या संपर्कात येताच त्वचा काळवंडणं, कोरडी पडणं तसंच जळजळ होणं या समस्या उद्भवतात. उन्हामुळे त्वचेवरचा टॅन जाण्यासाठी घरगुती सोपे उपाय नक्की करा.   

Updated: Apr 10, 2024, 04:11 PM IST
उन्हाळ्यात होणाऱ्या टॅनिंगवर 'हे' सोपे घरगुती उपाय नक्की करा  title=

Summer Special Skin Care Tips :

बाजारात मिळणाऱ्या कॉस्मेटीक आणि स्कीन केअर प्रॉडक्टमध्ये असलेल्या केमिकल्समुळे त्वचेवर अ‍ॅलर्जी येते. त्यामुळे घरच्या घरी सोप्या आणि प्रभावशाली उपायांनी त्वचेची काळजी कशी घ्यावी ते जाणून घेऊयात. 

टोमॅटो आणि  चंदन
टोमॅटोला नॅचरल क्लिंजींग एजंट म्हटलं जातं. एंटीऑक्सीडेंट गुणधर्म असल्याने त्वचेवरील टॅन काढण्यासाठी टोमॅटो फायदेशीर ठरतं. अर्धा कापलेला टोमॅटो, मुलतानी माती आणि चंदन पावडर मिक्स करून चेहऱ्यावर हलक्या हाताने स्क्रब करावं. त्यामुळे धुळीमुळे खराब झालेला चेहरा साफ होण्यास मदत मिळते. 

लिंबू आणि मध 
थंडीप्रमाणे गरमीच्या दिवसातही त्वचा कोरडी पडते. उन्हामुळे काळवंडलेल्या त्वचेला 'व्हिटामीन सी' ची आवश्यकता जास्त असते. लिंबूमध्ये 'व्हिटामीन सी' ची मात्रा मुबलक प्रमाणात असते. त्याचबरोबर मधामुळे त्वचा मुलायम होण्यास मदत होते. मध, लिंबाचा रस आणि दूध एकत्र करून ही पेस्ट 15 मिनिटं चेहऱ्याला लावल्याने त्वचा चमकदार होते. 

दही आणि हळद 
दही त्वचेला मॉइश्चराईज करतं. दह्यामुळे त्वचा हायड्रेटेड राहण्यास मदत होते. आठवड्यातून दोन ते तीन वेळा दही आणि हळद मिक्स करून चेहऱ्याला लावल्याने चकाकी येते. जर तुम्हाला डी टॅन क्लिनअप करायचं असल्यास हा उपाय फायदेशीर आहे. 

कोरफड आणि गुलाबपाणी 
कोरफडीचा गर हा त्वचेचा पोत सुधारण्यासाठी फायदेशीर ठरतो. धुळ आणि उन्हामुळे चेहऱ्यावर पिंपल्स येतात. गुलाब पाणी आणि कोरफडीचा गर थंड असल्याने त्वचेला आराम पडतो. त्वचा जळजळणं, कोरडी पडणं हा त्रास वारंवार होत असल्यास कोरफडीचा गर आणि गुलाबपाण्याने चेहऱ्यावर हलका मसाज  केल्याने त्वचेचा दाह कमी होतो. 

तांदळाचं पीठ आणि नारळाचं तेल 
नारळाचं तेल उष्णता खेचून घेऊन थंडावा देतं, तर तांदळाचं पीठ हे उत्तम स्क्रबचं काम करत. बाजारातील महागड्या स्क्रबपेक्षा तांदळाचं पीठ आणि नारळाचं तेल मिक्स करून हलक्या हाताने चेहऱ्याला स्क्रब करावं. त्यामुळे चेहऱ्यावरील टॅन जाण्यास मदत होते. 

कॉफी स्क्रब 
कॉफी स्क्रबला सध्या बाजारात मोठ्या प्रमाणात मागणी आहे. कॉफीमध्ये असलेल्या अँटी-सेल्युलाईट गुणधर्मामुळे डोळ्याखालचे डार्क सर्कल कमी होण्यास मदत मिळते, तसंच टॅन झालेल्या त्वचेसाठी कॉफी स्क्रब रामबाण उपाय आहे. 

 

(येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)