दगड फोडून मिळायची 10 रुपये रोजंदारी, UPSC क्रॅक करुन राम 'असे' बनले अधिकारी

Ram Bhajan UPSC Success Story:  राम यांच्याकडे राहण्यासाठी साधं घरही नव्हतं. पण अशा परिस्थितीतही राम भजन परिस्थितीशी झगडत राहिले आणि 667 रॅंकसह त्यांनी यूपीएससी उत्तीर्ण केली.

Pravin Dabholkar | Updated: May 7, 2024, 03:06 PM IST
दगड फोडून मिळायची 10 रुपये रोजंदारी, UPSC क्रॅक करुन राम 'असे' बनले अधिकारी  title=
IAS Ram Bhajan Success Story

Ram Bhajan UPSC Success Story: यूपीएससी ही देशातील सर्वात कठीण परीक्षांपैकी मानली जाते. त्यामुळे यूपीएससी उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची यादी म्हणजे वेगवेगळ्या संघर्षाच्या कहाण्या आहेत. यातील अनेक उमेदवारांना रोजच्या जगण्यासाठी संघर्ष करावा लागला. पण परिस्थितीवर मात करत त्यांनी यूपीएससी दिली. त्यांचा हा संघर्ष आणि यशाची कहाणी जाणून घेऊया. राम भजन हे राजस्थानच्या बापी नावाच्या छोट्या गावात आपल्या आईसोबत राहायचे. त्यांच्याकडे राहण्यासाठी साधं घरही नव्हतं. पण अशा परिस्थितीतही राम भजन परिस्थितीशी झगडत राहिले आणि 667 रॅंकसह त्यांनी यूपीएससी उत्तीर्ण केली.

गरिबीत गेलं बालपण 

राम भजन यांच्या यशाची कहाणी खूपच प्रेरणादायी आहे. आज ते एक सरकारी अधिकारी आहेत. यूपीएससी परीक्षा क्रॅक करण्यासाठी राम भजन यांना गरिब परिस्थितीशी झगडावं लागलं. ज्या वयात सोबतची मुलं खेळायची तेव्हा त्यांना रोजंदारीची कामे करावी लागायची.  

तासनतास फोडावे लागायचे दगड 

लहानपणी आपण आपल्या आईसोबत दगड फोडायच्या कामाला जायचो. मजदूर म्हणून आपल्याला काम करावे लागले, असे ते सांगतात. राम भजन यांना अनेक तास दगड फोडायचे काम दिले जायचे. तर त्यांची आई वजनदार दगड उचलून न्यायचे काम करायची. 

अवघे 5 ते 10 रुपये मजूरी 

यूपीएससी सिव्हिल सर्व्हिस 2022 परीक्षेत यशस्वी झालेले राम भजन दररोज 25 कार्टन दगड पोहोचवण्याचं काम करायचे. एवढं सगळं काम करुन राम भजन यांना दिवसाचे 5 ते 10 रुपये रोजंदारी मिळायची. यातून त्यांच्या दिवसाच्या जेवणाची सोयदेखील खूप मुश्किलीने व्हायची. 

करोना काळात गमावले वडील

राम भजन यांचा परिवार गरीब असला तरी मेहनती, महत्वाकांक्षी राहिला आहे. त्यांच्या कुटुंबाकडे बकऱ्या होत्या. ते बकरीचे दूध विकून आपला गुजराणा करायचे. राम भजन यांचे वडील हा व्यवसाय संभाळायचे. पण अचानक त्यांच्या कुटुंबात नको ती घटना घडली. कोरोना महामारीच्या काळात अस्थमाने ग्रासलेल्या राम भजन यांच्या वडिलांचे निधन झाले. 

वडिलांच्या मृत्यूनंतर राम भजन यांच्या परिवारावर मोठी शोककळा पसरली. गरिबी त्यांच्या आणखी जवळ आली आणि त्यांना अंग मेहनतीची कामे करावी लागली. असे असतानाही त्यांनी खूप मेहनत घेतली आणि दिल्ली पोलीसमध्ये कॉन्स्टेबलची नोकरी मिळवली. अनेक वर्षे दिल्लीमध्ये कॉन्स्टेबल राहिल्यानंतर राम भजन यांनी यूपीएससी परीक्षा देण्यास सुरुवात केली. आठव्या प्रयत्नामध्ये म्हणजे 2022 मध्ये त्यांना यश मिळालं आणि त्यांनी यूपीएससी उत्तीर्ण करत आयएएस होण्याचं स्वप्न पूर्ण केलं.