केदारनाथमध्ये एक कप चहाची किंमत वाचून हैराण व्हाल, पाण्याची बाटली खरेदी करताना खिसा रिकामा होईल

Chardham Yatra: चारधाम यात्रेसाठी मोठ्या प्रमाणात भाविकांची झुंबड उडते. भाविकांची गर्दी पाहता व्हिआयपी दर्शनावर 31 मेपर्यंत बंदी घालण्यात आली आहे

मानसी क्षीरसागर | Updated: May 17, 2024, 05:04 PM IST
केदारनाथमध्ये एक कप चहाची किंमत वाचून हैराण व्हाल, पाण्याची बाटली खरेदी करताना खिसा रिकामा होईल title=
rudraprayag eatables sold at high range price of tea

Chardham Yatra: चारधाम यात्रेला सुरुवात झाली आहे. त्यामुळं भाविकांच्या संख्येतही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. येथे प्रत्येक दिवशी हजारोच्या संख्येने भाविक येतात. अलीकडेच सोशल मीडियावर केदारनाथ यात्रेदरम्यान भाविकांची मोठी झुंबड उडाल्याचे पाहायला मिळाले. लोकांना आग्रह केला जात आहे की काही काळासाठी भाविकांनी यात्रा टाळावी. पायी केदारनाथला जाणाऱ्या भाविकांना काही काळासाठी यात्रा थांबावी, असा आग्रह केला जात आहे. फक्त पायी केदारनाथला जाणाऱ्या भाविकांचीच ही स्थिती आहे. या दरम्यान आता केदारनाथचा आणखी एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. 

व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओत एका व्यक्तीने केदारनाथमध्ये खाण्या-पिण्याच्या वस्तुंची किंमत शेअर केली आहे. डोंगराळ भागात असंही खाण्या-पिण्याच्या वस्तुंची किंमत जास्तच असते. अशातच केदारनाथमध्ये तर या खाद्यपदार्थांच्या किंमती पाहून धक्काच बसेल. जे पदार्थ तुम्ही 10 रुपयांत खरेदी करतात ते तिथे 30 रुपयांपर्यंत मिळेल. या व्यक्तीने प्रत्येक एक खाद्यपदार्थांची किंमत दुकानदारांना विचारुन लोकांना सांगितली आहे. 

असा आहे खाद्यपदार्थांचे दर 

व्हिडिओमधील व्यक्तीने केदारनाथमध्ये चहा ते कोल्ड्रिंकपर्यंतच्या किंमतीबद्दल सांगितले आहे. येथे 10 रुपयांचा चहा ते तीस रुपयांत मिळतो. तर, दहा रुपयांची कॉफी 50 रुपयांत विकली जाते. त्याचबरोबर, मॅगी 70 रुपये, डोसा 150 रुपये आणि कोल्ड्रिंकची एक 20 रुपयांची बॉटल 50 रुपयांत विक्री केली जाते. पाण्याच्या वीस रुपयांच्या बॉटलसाठी तुम्हाला 100 रुपयांपर्यंत खर्च करावे लागू शकतात. समोशाची किंमत 30 आहे. अशाप्रकारे येथील प्रत्येक खाण्या-पिण्याच्या किंमती दुप्पट लावल्या जातात. तुम्हाला जास्त पैसे देऊन खाद्यपदार्थ घ्यावे लागतात. 

नागरिकांमध्ये सुरू झाले वाद

दरम्यान, या व्हिडिओच्या माध्यमातून प्रत्येक खाद्यपदार्थांच्या किंमती जाहीर केल्यानंतर त्या व्यक्तीने त्यामागचे कारणही जाहिर केले आहे. त्याने म्हटलं आहे की, डोंगरांवर सामान घेऊन येण्यासाठी मेहनत आणि लेबर कॉस्टमुळं या वस्तुंचे भाव वाढवून सांगावे लागतात. तर, यावर एका व्यक्तीने म्हटलं आहे की, वैष्णदेवीमध्ये मात्र असं काही होत नाही. तर, अनेकांनी हा व्यापार असल्याचे म्हटलं आहे. दरवर्षी केदारनाथला येणारे भाविकांकडे दुसरा कोणता पर्याय नसल्याने ते खाद्यपदार्थ खरेदी करतात.