पाकिस्तानने संयुक्त राष्ट्रात CAA आणि राम मंदिराचा केला उल्लेख, भारताने दिलं सडेतोड उत्तर

भारताने संयुक्त राष्ट्र परिषदेत (UNGA) पाकिस्तानवर जोरदार हल्लाबोल करताना त्यांचा सर्वच बाबतीत संशयास्पद रेकॉर्ड असल्याचं सुनावलं आहे. राजदूत कंबोज यांनी भारतातील समृद्ध धार्मिक विविधता आणि शांततेवर बांगलादेशच्या प्रस्तावाला पाठिंबा देण्याबद्दलही सांगितलं.   

शिवराज यादव | Updated: May 3, 2024, 02:23 PM IST
पाकिस्तानने संयुक्त राष्ट्रात CAA आणि राम मंदिराचा केला उल्लेख, भारताने दिलं सडेतोड उत्तर title=

संयुक्त राष्ट्र महापरिषदेत (UNGA) भारताने यूएनजीएमध्ये पाकिस्तानच्या राजदुताककडून भारताच्या अंतर्गत मुद्द्यांवर करण्यात आलेल्या विधानांचा निषेध केला आहे. तसंच पाकिस्तानचा सर्वच बाबतीत संशयास्पद रेकॉर्ड असल्याचं सांगितलं. भारताच्या स्थायी प्रतिनिधी, राजदूत रुचिरा कंबोज (Ruchira Kamboj) यांनी या आव्हानात्मक वेळेत आम्ही शांतता कायम राखण्याचा प्रयत्न करत असून, आमचं लक्ष विधायक संभाषणांवर असतं असं सांगितलं. अशाप्रकारे आम्ही विशिष्ट प्रतिनिधी मंडळाच्या टिप्पण्यांकडे दुर्लक्ष करणं ठरवलं आहे. ज्यात फक्त मर्यादेचाच अभाव नाही, तर विध्वंसक आणि हानिकारक वृत्तीमुळे आमच्या सामूहिक प्रयत्नांना अडथळा देखील येतो असं त्या म्हणाल्या. 

भारतीय प्रतिनिधींनी यादरम्यान आणखी काही प्रश्न उपस्थित केले. हे प्रश्न उपस्थित करताना त्यांनी सांगितलं की, आम्ही त्या शिष्टमंडळाला आदर आणि मुत्सद्देगिरीच्या केंद्रीय तत्त्वांशी संलग्न होण्यासाठी प्रोत्साहित करू जे नेहमी आमच्या चर्चेला मार्गदर्शन करतात. सर्व आघाड्यांवर संशयास्पद ट्रॅक रेकॉर्ड असलेल्या देशाकडे विचारण्यासारखे अनेक प्रश्न आहेत का?

संयुक्त राष्ट्रातील पाकिस्तानचे राजदूत मुनीर अक्रम यांनी 'शांततेची संस्कृती' या विषयावर संयुक्त राष्ट्र महासभेच्या बैठकीत भारताच्या विरोधात काश्मीर, नागरिकत्व (दुरुस्ती) कायदा आणि अयोध्येतील राम मंदिराबाबत वक्तव्य केल्यानंतर कंबोज यांनी त्यांना उत्तर दिलं आहे. आपल्या भाषणादरम्यान, संयुक्त राष्ट्रातील भारतीय प्रतिनिधींनी असंही म्हटलं की दहशतवाद हा शांततेच्या संस्कृतीच्या आणि सर्व धर्मांच्या मूलभूत शिकवणींच्या थेट विरोधात आहे.

ते म्हणाले की हे मतभेद पसरवतात, शत्रुत्व निर्माण करतात आणि जगभरातील सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरांना चालना देणाऱ्या आदर आणि सद्भावनेच्या मूल्यांना कमी करतात. शांततेची खरी संस्कृती वाढवण्यासाठी आणि जगाला एक संयुक्त कुटुंब म्हणून पाहण्यासाठी सदस्य देशांनी सक्रियपणे एकत्र काम करण्याची गरज आहे. माझ्या देशाचा त्यावर खरोखर विश्वास आहे.