भारतातही वसलंय इस्रायल; इथं दरवर्षी येतात असंख्य ज्यू, काही इथंच झाले स्थायिक

Israel palestine war : तिथं हमास आणि इस्रायल यांच्यातील संघर्ष पराकोटीला पोहोचलेला असतानाच इथं मित्रराष्ट्रांनी आपआपल्या परीनं दोन्ही गटांपैकी एका गटाला पाठिंबा दिला. 

सायली पाटील | Updated: Oct 20, 2023, 01:59 PM IST
भारतातही वसलंय इस्रायल; इथं दरवर्षी येतात असंख्य ज्यू, काही इथंच झाले स्थायिक title=
(छाया सौजन्य- towno.in)/ Himachal Pradesh is also Called as Israel Of India many Israeli Tourists visit this land

Israel palestine war : इस्रायल आणि पॅलेस्टाईनमध्ये सुरु असणारा संघर्ष दर दिवसागणिक आणखी चिघळताना दिसत आहे. पॅलेस्टाईनच्या हमासनं इस्रायलवर बेछूट रॉकेट हल्ले केले आणि यामध्ये अनेक निष्पाप इस्रायली नागरिकांचा मृत्यू झाला. देशावर ओढावलेली ही परिस्थिती पाहता इस्रायलच्या लष्करानंही हमासला जशास तसं उत्तर देण्याचं ठरवलं. गाझाला चारही बाजूंनी वेढा दिला आणि या संघर्षाला आणखी गंभीर वळण प्राप्त झालं. 

तिथं हमास आणि इस्रायल यांच्यातील संघर्ष पराकोटीला पोहोचलेला असतानाच इथं मित्रराष्ट्रांनी आपआपल्या परीनं दोन्ही गटांपैकी एका गटाला पाठिंबा दिला. यामध्ये भारतही मागं राहिला नाही. भारताकडून इस्रायलला समर्थन देण्यात आलं. मुळात भारत आणि इस्रायल या दोन्ही देशांमध्ये असणारं नातं काही नवं नाही. 

भारतात अनेक ज्यू नागरिकांचा वावर... 

तुम्हाला माहितीये का, भारतातही (India) असा एक भाग आहे जिथं इस्रायलमधील नागरिक सर्रास दिसतात. बरं हे ठिकाण असं आहे जिथं तुम्हीही भेट दिली असेल. इतकंच काय, तर इथं दरवर्षी अनेक पर्यटक भेट देतात. हे ठिकाण आहे, हिमाचल प्रदेशातील धर्मकोट आणि कसोल. 

धर्मकोट हे ठिकाण 'पर्वतांतील तेल अवीव' म्हणून ओळखलं जातं. तर, कसोल (Kasol) 'मिनी इस्रायल' म्हणून. धर्मकोट कांगडा जिल्ह्यामध्ये असून, कसोल हे कुल्लू (Kullu) जिल्ह्यामध्ये आहे. या दोन्ही ठिकाणांना इस्रायलमधून येणाऱ्या पर्यटकांची बरीच पसंती असते. या ठिकाणी वर्षातील कोणत्याही दिवशी गेलं असता तिथं तुम्हाला ज्यू हमखास दिसतील (Dharamshala). 

हेसुद्धा वाचा : भारतातील 'या' गावात नाही चालत सरकारचे नियम; इथं मिळतो वेगळ्याच दुनियेचा अनुभव

 

मागील तीन ते चार दशकांपासून इथं येणाऱ्या ज्यू नागरिकांचा आकडा मोठ्या फरकानं वाढला आहे. इतका, की इथं त्यांच्यासाठी काही खास हॉटेलही सुरु करण्यात आली आहेत. तर, काही ज्यू नागरिक तर इथंच स्थायिकही झाल्याचं क्वचितप्रसंगी पाहायला मिळतं. 

इस्रायलमधून भारत भ्रमणावर आलेले आणि त्यातही हिमाचलच्या या भागात वास्तव्यास असणारे हे ज्यू नागरिक येथील गावखेड्यांमध्ये भटकंती करतात, काहीजण येथील हॉस्टेलमध्ये मदतनीस म्हणूनही काम पाहतात. काही तर चक्क कॅफेमध्ये गाणीही गातात. गावकऱ्यांसोबत या ज्यू नागरिकांची खास मैत्री. हिमाचलच्याच धरमशाला येथील नागरिकही इस्रायली नववर्षाच्या निमित्तानं वार्षिक सामुदायिक स्नेहभोजन कार्यक्रमाचं आयोजन करतात. 

कसोलपर्यंत कसं पोहोचायचं? 

कसोल हे अनेक बॅगपॅकर्सच्या आवडीचं ठिकाण. कुल्लू जिल्ह्यातील भूंतरहून हे गाव 32 किमी दूर आहे. निसर्गानं मुक्तहस्तां केलेली उधळण इथं येणाऱ्या प्रत्येकाच्याच मनाचा ठाव घेते. दरवर्षी साधारण 500 ते 1000 ज्यू पर्यटक इथं येतात. इथून ते तोश, मलाणा यांसारख्या गावांमध्ये जातात. मग, तुम्ही कधी येताय भारतातील अनोखं इस्रायल अनुभवायला?