विद्यार्थ्यांची लॉटरीः आता पुस्तक घेऊन परीक्षेला बसता येणार? CBSE करणार मोठे बदल

CBSE Open Book Exam: सीबीएसई विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाचा बदल होणार आहे. ओपन बुक टेस्ट ही प्रयोग राबवण्याचा विचार आहे. 

मानसी क्षीरसागर | Updated: Feb 22, 2024, 05:56 PM IST
विद्यार्थ्यांची लॉटरीः आता पुस्तक घेऊन परीक्षेला बसता येणार? CBSE करणार मोठे बदल title=
CBSE proposal to conduct open book test as a pilot project for classes 9 to 12

What is CBSE Open Book Exam: नॅशनल एज्युकेशन पॉलिसी (NEP) 2020 अंतर्गंत भारतीय शिक्षण क्षेत्रात मोठे बदल करण्यात येणार आहेत. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) इयत्ता नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी खुल्या पुस्तक परीक्षेच्या प्रस्तावावर विचार करत आहे. नॅशनल करिकुलम फ्रेमवर्क (NCF)ने केलेल्या शिफारसीनुसार सीबीएसईने नववी ते बारावीसाठी काही सीबीएसई शाळांमध्ये प्रायोगिक तत्वावर ओपन बुक एक्झाम आयोजित करण्याचा प्रस्ताव समोर ठेवला आहे. 

एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, हा निर्णय 2023मध्ये झालेल्या गवर्निंग बॉडी मिटिंगमध्ये घेण्यात आला असून प्रायोगिक तत्वावर लवकरच आयोजित करण्यात येईल. बोर्डने या वर्षाअखेर काही निवडक शाळांमध्ये ओपन बुक टेस्ट परीक्षा घेण्याची योजना आखली आहे. त्याचबरोबर नववी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी नोव्हेंबर महिन्यात प्रायोगिक तत्वावर ही योजना आमलात आणण्याच्या विचारात आहेत. विद्यार्थी परीक्षेदरम्यान पुस्तकं वापरण्याची मुभा असणार आहे. 

काय आहे ओपन बुक परीक्षा?

ओपन बुक परीक्षेचा अर्थ म्हणजे विद्यार्थी परीक्षेला बसताना त्यांना नोट्स, पुस्तके आणि वह्या वापरुन पेपर देण्याची मुभा असते. म्हणजेच प्रश्नपत्रिका सोडवत असताना विद्यार्थी पुस्तकातून उत्तरे शोधून लिहू शकतात. ओपन बुक परीक्षा दोन पद्धतीने घेतल्या जातात. पहिल्या पद्धतीत विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात बसवले जाते आणि त्यांना प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका दिल्या जातात. तर, विद्यार्थी परीक्षा देताना पुस्तकं किंवा नोट्समधून उत्तरं लिहू शकतात. 

तर, दुसऱ्या पद्धतीत ऑनलाइन परीक्षा घेतल्या जातात. विद्यार्थ्यांना ऑनलाइन पेपर सेट पाठवले जातात. ते महाविद्यालय किंवा शाळेच्या पोर्टलवर जाऊन लॉगइन करु शकतात. या परीक्षेदरम्यान विद्यार्थी पुस्तके, नोट्स किंवा इतर साहित्यांचा वापर करु शकतात. परीक्षेचा वेळ संपल्यानंतर आपोआप पोर्टल लॉगआऊट होऊन जाते. 

ओपन बुक परीक्षेचा फायदा काय?

पाठांतर आणि घोकंपट्टीची सवय आजकाल अनेक मुलांना लागलेली आहे. नियमीत परीक्षांमध्ये स्मरणशक्तीचे परीक्षण केले जाते. मात्र, ओपन बुक टेस्टमध्ये त्या विषयाची समज व विश्लेषण करण्याची क्षमता तपासली जाते. पाठांतर करुन पुस्तकातील उत्तर पेपरमध्ये लिहण्याऐवजी प्रश्नाचे उत्तर शोधून ओळखणे व शोधणं याची क्षमता निर्माण करणे हा या परीक्षांचा हेतू आहे. 

सीबीएसईच्या काही शाळांमध्ये नववी आणि दहावीच्या इंग्रजी, गणित, विज्ञान आणि इत्ता 11 आणि 12च्या विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी, गणित आणि जीवशास्त्र या विषयांची ओपन बुक टेस्ट प्रायोगिक तत्वावर चालवण्याचा विचार आहे. विद्यार्थ्यांना या परीक्षेसाठी किती वेळ लागतो याचे मुल्यांकन केले जाणार आहे. त्यानंतर सर्व शाळांमध्ये लागू करण्यात येणार आहे.