वैभव आणि संतोषची जोडी जमली, ‘मर्डरवाले कुलकर्णी’ रंगमंचावर येण्यास सज्ज

Vaibhav Mangle and Santosh Pawar : लोकप्रिय मराठमोळे अभिनेते वैभव मांगले आणि लेखक-दिग्दर्शक अभिनेते संतोष पवार अखेर येणार एकत्र. 

दिक्षा पाटील | Updated: Nov 17, 2023, 04:42 PM IST
वैभव आणि संतोषची जोडी जमली, ‘मर्डरवाले कुलकर्णी’ रंगमंचावर येण्यास सज्ज  title=
(Photo Credit : Social Media)

Vaibhav Mangle and Santosh Pawar : विनोदाच्या अफलातून टायमिंगने रसिकांचे मनोरंजन करणारे अभिनेते वैभव मांगले आणि लेखक-दिग्दर्शक अभिनेते संतोष पवार हे एकत्र येणार आहेत. त्यामुळे आता हे विनोदाचे दोन हुकमी एक्के रंगमंचावर एकत्र येत धमाल उडविण्यास सज्ज झाले आहेत. या कलाकारांना नेहमीच आपण वेगवेगळे चित्रपट करत प्रेक्षकांचे मनोरंजन करताना पाहिले. पण कधी कोणी हा विचार केला नसेल की हे दोन कलाकार एकत्र येऊन आपल्या सगळ्यांचे मनोरंजन करतील. तर काही प्रेक्षकांनी कधी इच्छा व्यक्त केली होती की त्यांना या दोघांना एकत्र पाहायचं आहे. आता त्या सगळ्या चाहत्यांचं स्वप्न पूर्ण होतंय असं म्हणायला हरकत नाही. कारण त्याचं एक नाटक येणार असून आपल्याला खळखळून हसवण्यासाठी ते सज्ज झाले आहेत. 

वैभव आणि संतोष हे दोघं ‘मर्डरवाले कुलकर्णी’ या आगामी नाटकातून पहिल्यांदाच एकत्र येणार आहेत. येत्या 24 नोव्हेंबर रोजी हे नाटक रंगभूमीवर दाखल होतंय. वैभव मांगले यात मध्यवर्ती भूमिकेत असून संतोष पवार यांच्या भन्नाट दिग्दर्शनाखाली या नाटकाचा पट रंगला आहे. अष्टविनायक संस्थेचे दिलीप जाधव यांनी नाटकाची निर्मिती केली असून सहनिर्मात्या मयुरी मांगले आणि निवेदिता सराफ आहेत.   

प्रेक्षकांना मनमुराद हसवण्यासाठी आम्ही सज्ज असून आमच्या दोघांची केमिस्ट्री ‘मर्डरवाले कुलकर्णी’ या नाटकामध्ये सॉलिड धमाल आणेल, असा विश्वास या दोघांनी व्यक्त केला. एकत्र काम करताना आम्हाला खूपच मज्जा आल्याचे हे दोघेही सांगतात.

हेही वाचा : फ्लॉप चित्रपट देऊनही 2500 कोटींचा मालक आहे 'हा' अभिनेता

अष्टविनायक संस्थेच्या ‘मर्डरवाले कुलकर्णी’ या नाटकाचे लेखन जयंत उपाध्ये यांचे असून या निखळ कौटुंबिक मनोरंजक नाटकात भार्गवी चिरमुले, निमीश कुलकर्णी, सुकन्या काळण, विकास चव्हाण आणखी अनेक कलाकारांच्याही भूमिका आहेत. या नाटकाची गाणी वैभव जोशी यांनी लिहिली असून नेपथ्य संदेश बेंद्रे यांचे आहे. प्रकाश योजना रविरसिक तर संगीत आशुतोष वाघमारे यांचे आहे. संतोषची दिग्दर्शनाची अनोखी शैली आणि वैभव यांच्या अभिनयाचा हटके अंदाज ‘मर्डरवाले कुलकर्णी’ मध्ये धुमाकूळ घालणार हे नक्की.