'या' मराठी अभिनेत्याला मिळाला बाळासाहेब ठाकरेंमुळे पहिला सिनेमा

अभिनेते अनंत जोग मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते आहेत. आत्तापर्यंत त्यांनी अनेक सिनेमा आणि मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन केलंय. या दिग्गज अभिनेत्याचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. 

Updated: May 19, 2024, 10:40 PM IST
'या' मराठी अभिनेत्याला मिळाला बाळासाहेब ठाकरेंमुळे पहिला सिनेमा title=

मुंबई : अभिनेते अनंत जोग मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते आहेत. आत्तापर्यंत त्यांनी अनेक सिनेमा आणि मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन केलंय. या दिग्गज अभिनेत्याचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. मालिकेत काम करत असताना बाळासाहेब ठाकरेंमुळे त्यांना पहिला सिनेमा मिळाला. नुकतीच अनंत जोग यांनी  सुलेखा तळवलकर यांच्या यूट्यूब चॅनलला मुलाखत दिली. अनंत यांनी दिलेल्या मुलाखतीत हा किस्सा त्यांच्या चाहत्यांसोबत शेअर केला. 

दिलेल्या मुलाखतीत अनंत जोग म्हणाले, ''माझी तेव्हा 'कुछ खोया, कुछ पाया' ही मालिका सुरू होती. तेव्हा ती बाळासाहेब ठाकरेंनी पाहिली आणि नंतर ते मला राज ठाकरेंच्या लग्नात भेटले. तेव्हा मी पहिल्यांदा आयुष्यात बाळासाहेब ठाकरेंना पर्सनली बघत होतो. त्यांनी माझ्या खांद्यावर हात टाकला आणि ते म्हणाले की, मला वाटतं तुम्ही हिंदी सिनेमात काम केलं पाहिजे. आपला नाना बघा कसा पुढे गेला. 

अनंत जोग पुढे म्हणाले, ''मी त्यांना म्हटलं की, बाळासाहेब एक तर माझी तिथे कोणाबरोबर ओळख नाही आणि माझा स्वभाव असा नाही की, मी जाऊन… बाळासाहेब म्हणाले, ''नाही नाही; तुम्ही उद्या येऊन बंगल्यावर भेटा'' मला हे राजकारणातलं काही कळेना. माझा मित्र विजय गोखले त्याचे वडील खासदार होते. तेव्हा मी त्याला म्हटलं, असं असं झालंय. तर, जाऊ का भेटायला? त्यांच्या लक्षात असेल का, त्यांनी मला बोलावलंय ते? तर तो मला म्हणाला की, जा बाळासाहेबांची स्मरणशक्ती खूप स्ट्रॉंग आहे.''

अनंत जोग पुढे म्हणाले, ''मी त्यांच्या घरी गेलो तेव्हा मीनाताई आतमध्ये मासे तळत होत्या. त्यांनी मला मासे ऑफर केले. पण, मला माश्याचा काटा काढता येईना. तर मी मीनाताईंना म्हटलं की, मला माफ करा; पण मला याचा काटा काढता येत नाही. पण, माझी बायको सीकेपी आहे; ती मला काढून देते. तर बाळासाहेब म्हणाले की, अच्छा आडनाव जोग आणि काटा काढता येत नाही.तेव्हा त्यांनी माझं नाव प्रकाश मेहरा यांना सुचवलं. ते कोणता तरी चित्रपट करीत होते, तेव्हा तो संपायला आला होता. बाळासाहेब म्हणाले की त्यांनी प्रकाश मेहरा यांना विनंती केली की याच्यासाठी काहीतरी काम असेल तर बघा.'' असं अनंत जोग यांनी मुलाखतीत म्हटलंय.