अन् शाहरुखच्या चाहत्यांना धक्का

हे आहे यामागचं मुख्य कारण... 

Updated: Apr 8, 2019, 09:05 PM IST
अन् शाहरुखच्या चाहत्यांना धक्का title=
शाहरुख खान

मुंबई : 'डॉन को पकडना मुश्किल ही नही नामुमकीन है.... ' असं म्हटलं की शाहरुख खानचा चेहरा आणि त्याचं एक वेगळ्याच पद्धतीचं हास्य समोर येतं. 'डॉन' आणि 'डॉन २' या चित्रपटांतून मुख्य भूमिकेत झळकल्यानंतर आणि बॉक्स ऑफिसवरही गाजल्यानंतर या चित्रपटाच्या तिसऱ्या भागाकडे सर्वांचच लक्ष लागलं होतं. 'डॉन २' नंतर अभिनेता फरहान अख्तरनेही त्याच्या दिग्दर्शन कौशल्यापासून थोडं दूर राहत अभिनयावरच लक्ष केंद्रीत केलं होतं. पण, त्याच्याच दडलेल्या दिग्दर्शकाने पुन्हा एकदा 'डॉन' प्रेक्षकांच्या भेटीला आणावा अशीच मागणी वारंवार केली गेली. 

बराच काळ 'डॉन ३'च्या चर्चा शमल्या असताना एका वृत्ताने मात्र या विषयाला पुन्हा चालना मिळाली आहे. 'मुंबई मिरर'मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या वृत्तानुसार खरंतर ही शाहरुखच्या चाहत्यांसाठी फारशी चांगली बातमी नाही. त्यामागचं कारणंही तसंच आहे. काही खासगी कारणांमुळे शाहरुखने 'डॉन ३' या चित्रपटातून काढता पाय घेतल्याचं कळत आहे. ज्यामुळे अर्थातच निर्माते आणि दिग्दर्शकांसमोर एक मोठा पेच उभा राहिला आहे. 

'Don 3': Shah Rukh Khan out, Ranveer Singh in?

शाहरुखला पर्याय म्हणून निर्माते- दिग्दर्शकांसमोर एक नाव आलं असून, त्या अभिनेत्याला याविषयीची विचारणाही केली गेल्याचं वृत्त समोर येत आहे. किंग खानऐवजी चर्चेत असणारा हा अभिनेता आहे, रणवीर सिंग. शाहरुख ऐवजी रणवीरच्या नावाला पसंती मिळणं हा चाहत्यांनाही एक मोठा धक्काच आहे. दरम्यान, याविषयीची कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. पण, तरीही रणवीरने ही भूमिका साकारल्यास 'डॉन...' च्या भूमिकेचं शिवधनुष्य तो पेलतो का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल. रणवीरसोबत स्क्रीन शेअर करण्यासाठी अभिनेत्री कतरिना कैफ हिचं नाव पुढे येत असल्याचं कळत आहे. तेव्हा आता या बहुप्रतिक्षित प्रोजेक्टची अधिकृत घोषणा केव्हा होते, याकडे अनेकांचं लक्ष लागलं आहे.