रणवीर-दीपिका, रणबीर- आलियाची अखेर हातमिळवणी

.....'या' निमित्ताने ते एकत्र आल्याचं कळत आहे.

Updated: Jun 6, 2019, 01:26 PM IST
रणवीर-दीपिका, रणबीर- आलियाची अखेर हातमिळवणी title=

मुंबई : कलाविश्वात पदार्पण केल्यापासून पहिला चित्रपट प्रदर्शित होईपर्यंत आणि खासगी आयुष्यात घडणाऱ्या असंख्य घडामोडींपर्यंत प्रत्येकवेळी सेलिब्रिटींचं आयुष्य चर्चेचा विषय ठरतं. या साऱ्या चर्चांमध्ये गेल्या काही महिन्यांपासून प्रकाशझोतात असणारी नावं म्हणजे आलिया, रणबीर आणि दीपिका रणवीर यांची. एकेकाळी दीपिका- रणबीर यांच्या रिलेशनशिपने कलावर्तुळात चांगलीच प्रसिद्धी मिळवली होती. पण, काही कारणाने त्यांच्या नात्यात दुरावा आला. 

रणबीरसोबतच्या नात्याला तडा गेल्यानंतर दीपिकाचं नाव अभिनेता रणवीर सिंगशी जोडलं गेलं, पुढे जाऊन त्यांनी लग्न करत या नात्याला एक नवं नावंही दिलं. तर, रणबीरने अभिनेत्री आलिया भट्टमध्ये आपली साथदार शोधली. आलिया आणि रणबीरही येत्या काळात त्यांच्या नात्याला एका वेगळ्या वळणावर नेऊ शकतात ही शक्यता नाकारता येत नाही. 

नियतीने काही नाती टीकली नाहीत, पण या साऱ्यामध्ये मैत्रीच्या नात्याने मात्र चांगलाच तग धरला. याच मैत्रीचं नातं विविध कार्यक्रमांमध्येही पाहायला मिळालं. 'झी सिने अवॉर्ड्स'मध्ये तर, एकाच रांगेत बसलेले आलिया- रणबीर, दीपिका- रणवीर छायाचित्रकारांना कॅमेऱ्याच्या नजरा त्यांच्यावर खिळवून ठेवण्यात भाग पाडत होते. अशी ही त्यांनी अनोखी केमिस्ट्री रुपेरी पडद्यावर झळकावी अशीच काही चाहत्यांची इच्छा होती. काही अंशी ही इच्छा आता पूर्ण होणार आहे. 

'फिल्मफेअर'च्या वृत्तानुसार पुढच्या वर्षी सुरू होणाऱ्या एका दौऱ्यासाठी हे चारही आघाडीचे कलाकार एकत्र आले आहेत. २०२० मध्ये या लोकप्रिय कलाकारांचा जलवा  US tour मध्ये पाहता येणार आहे. ज्याअंतर्गत ते न्यूयॉर्क, न्यूजर्सी, शिकागो आणि इतर काही ठिकाणी परफॉर्म करणार आहेत. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हे चारही सेलिब्रिटी त्यांच्या गाजलेल्या गाण्यावर परफॉर्म करत परदेशी प्रेक्षकांची मनं जिंकणार आहेत. पहिल्यांदाच या चारही कलाकारांना एकत्र पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे. ज्या निमित्ताने ते आंतरराष्ट्रीय पातळीवर चाहत्यांशी जोडले जाणार आहेत. त्यामुळे चाहत्यांसाठी ही एक परवणीच असेल.