लोकप्रिय दाक्षिणात्य अभिनेत्याशी बॅडमिंटनपटूचा साखरपुडा

तिचा वाढदिवस ठरला खऱ्या अर्थानं खास.... 

Updated: Sep 7, 2020, 05:06 PM IST
लोकप्रिय दाक्षिणात्य अभिनेत्याशी बॅडमिंटनपटूचा साखरपुडा  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही महिन्यांपासून ठप्प असणारं आयुष्य अनलॉकच्या या काळात आता कुठं रुळावर येऊ लागलं आहे. याचदरम्यान, सेलिब्रिटींच्या लग्नसराईचे वारेही जोरानं वाहू लागले आहेत. कुठे साखरपुडा, कुठे नात्याची अधिकृत घोषणा, कुठे लग्नसोहळा याचीच रेलचेल सध्या सेलिब्रिटींच्या या वर्तुळात पाहायला मिळत आहे. त्यातच आता आणखी एका सेलिब्रिटीच्या, खरंतर आणखी दोन सेलिब्रिटींच्या नावाची भर पडली आहे. 

वाढदिवसाच्याच दिवशी साखरपुड्याची अधिकृत घोषणा होऊन या दिवशी जोडीदाराकडून खास भेट मिळणारी ही व्यक्ती आहे बॅडमिंटनपटू ज्वाला गुट्टा. ज्वालासाठी सरप्राईज बर्थडे पार्टीचा बेत आखण्यापलीकडे जात तिच्या आयुष्यातील एका खास व्यक्तीनं म्हणजेच लोकप्रिय दाक्षिणात्य अभिनेचा विष्णू विशाल यानं थेट त्यांच्या नात्याची अधिकृत घोषणाच केली आहे. इतकंच नव्हे, तर साखरपुड्याच्या अंगठीसह त्यानं या नात्यावर वेगळ्या पद्धतीनं शिक्कामोर्तब केलं आहे. 

सोशल मीडियावर ज्वालासोबतच्या या अतिशय सुरेख क्षणांचे फोटो पोस्ट करत विष्णूनं चाहत्यांना याबाबतची माहिती दिली. 'ज्वाला, वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. चल, सकारात्मक होऊया आणि आपल्या, आर्यनच्या, आपल्या कुटुंबाच्या, आजुबाजूला असणाऱ्यांच्या चांगल्या भविष्यासाठी काम करुया. आम्हाला तुमचं प्रेम आणि आशीर्वादाची गरज आहे....', असं लिहित विष्णूनं ही खास अंगठी मिळवून देण्यासाठी मदत करणाऱ्या व्यक्तीचेही आभार मानले.

 

'हैदराबाद टाईम्स'शी संवाद साधताना विष्णूनं आपला आनंद व्यक्त केला. ज्वालाच्या वाढदिवसाच्या निमित्तानं काहीतरी वेगळं करण्याच्या विचारात आपण होतो, असं सांगतच तिच्यासमोर अतिशय महत्त्वाचा प्रश्नच मांडला तर... हा विचार आपल्या मनात आल्याचं त्यानं सांगितलं. हा क्षण अगदी योग्य असल्याचं सांगत सारंकाही क्षणार्धात झाल्याचं विष्णू म्हणाला. विष्णूचं हे सरप्राईज ज्वालाला अनपेक्षित होतं, त्यामुळं हे खऱ्या अर्थानं तिच्यासाठी वाढदिवसाचं मौल्यवान गिफ्ट ठरलं.