T20 World Cup : रोहित शर्मा क्रिकेटमधून निवृत्ती घेतोय? म्हणतो 'मी गेली 17 वर्ष खेळलोय, पण आता...'

Rohit Sharma opens up On retirement : टीम इंडिया कॅप्टन आणि सर्वांचा लाडका हिटमॅन याने निवृत्तीवर पहिल्यांदाच खुलेआम उत्तर दिलंय. काय म्हणाला रोहित शर्मा? 

सौरभ तळेकर | Updated: May 15, 2024, 04:59 PM IST
T20 World Cup : रोहित शर्मा क्रिकेटमधून निवृत्ती घेतोय? म्हणतो 'मी गेली 17 वर्ष खेळलोय, पण आता...' title=
Rohit Sharma opens up on international retirement plans

T20 World Cup 2024 : टीम इंडिया पुढील महिन्यापासून क्रिकेटच्या महाकुंभात म्हणजेच टी-ट्वेंटी क्रिकेटमध्ये (T20 World Cup 2024) सहभागी होणार आहे. वनडे वर्ल्ड कपमधील टीम इंडियाच्या अफलातून कामगिरीमुळे बीसीसीआयने रोहित शर्माला (Rohit Sharma) संघाचं नेतृत्व करण्याची आणखी एक संधी दिलीये. रोहित शर्मा गेली 17 वर्ष आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वर्चस्व गाजवतोय, त्यामुळेच त्याचं नाव आजही महान क्रिकेटरमध्ये घेतलं जातं. लिमिटेड ओव्हर क्रिकेटचा बेधुंद खेळाडू म्हणून रोहित शर्माकडे पाहिलं जातं. मात्र, आता वाढतं वय पाहता, रोहित शर्मा निवृत्ती घेणार, अशा चर्चा होताना दिसत आहेत. अशातच आता रोहित शर्माने स्वत: निवृत्तीवर (Rohit Sharma opens up On retirement) मोठा खुलासा केला आहे. 

काय म्हणाला रोहित शर्मा?

सध्या सुरू असलेल्या आयपीएलमधून मुंबई इंडियन्स बाहेर पडल्यानंतर आता माझा फोकस पूर्णपणे जूनमध्ये होणाऱ्या टी-ट्वेंटी वर्ल्ड कपवर आहे, असं रोहित शर्मा म्हणतो. यंदा टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडिया जिंकेल, अशी आशा देखील रोहित शर्माने व्यक्त केली. त्यावेळी त्याने व्यक्तिगत कामगिरीवर देखील भाष्य केलं. माझी आत्तापर्यंतचा प्रवास खूप चांगला राहिला. गेली 17 वर्ष मी खेळतोय आणि मला वाटतंय की मी आणखी काही वर्ष खेळेल, त्यासोबतच जागतिक क्रिकेटमध्ये इम्पॅक्ट म्हणून खेळेल, असंही रोहित शर्माने म्हटलं आहे.  

देशाच्या क्रिकेट संघाचं नेतृत्व करण्याची संधी मला मिळाली हा माझ्यासाठी सर्वात मोठा सन्मान होता. मी कधीही असा विचार देखील केला नव्हता. पण लोकं जसं म्हणतात... चांगल्या लोकांसोबत नेहमी चांगलं होतं, असं रोहित शर्माने नमूद केलं. जेव्हा माझ्या हातात संघाची जबाबदारी आली, तेव्हा माझा फोकस एकाच दिशेने होता, तो म्हणजे संघाची एकूण कामगिरी... व्यक्तिगत कामगिरीपेक्षा मला संघाची कामगिरीवर फोकस करायचं होतं. त्यामुळेच तुम्ही सामने जिंकू शकता अन् ट्रॉफी जिंकू शकता, असंही रोहित शर्माने म्हटलं आहे.

दरम्यान, रोहित शर्मान मुलाखतीत बोलताना मनातील खदखद देखील व्यक्त केली. तुला कोणत्या संघाविरुद्ध सर्वात जास्त खेळायला आवडतं, असं रोहित शर्माला विचारलं तेव्हा, त्याने मनातील भावना व्यक्त केली. मला नक्कीच पाकिस्ताविरुद्ध टेस्ट सिरीज खेळायला आवडेल, असं रोहित शर्माने यावेळी म्हटलं आहे.