आर्मी कॅन्टीनमध्ये मिळणारं सामान इतकं स्वस्त कसं? जाणून घ्या यामागचं खरं कारण

Army Canteen : आर्मी कॅन्टीनमध्ये खरेदी करताना नेमकी मर्यादा आणि नियम काय? तुम्ही कधी इथून खरेदी केली आहे का? कोणाकोणाला मिळते इथं खरेदी करण्याची मुभा?    

सायली पाटील | Updated: May 15, 2024, 01:20 PM IST
आर्मी कॅन्टीनमध्ये मिळणारं सामान इतकं स्वस्त कसं? जाणून घ्या यामागचं खरं कारण  title=
why Army Canteen sells products in lesser price know real reason

Army Canteen : आर्मी कॅन्टीनमध्ये अमूक एक गोष्ट स्वस्त मिळते, तमुक एक गोष्ट तर त्याहून स्वस्त, हे असं तुम्ही अनेकदा ऐकलं असेल. खाण्यापिण्याच्या गोष्टींवासून अगदी घरातील कामासाठी महत्त्वाच्या असणाऱ्या आणि इतरही बऱ्याच गोष्टी, बरीच उत्पादनं इथं इतकी स्वस्त कशी? कधी प्रश्न पडलाय का? लक्षात घेण्याजोगी बाब म्हणजे आर्मी कॅन्टीनमधून मिळणाऱ्या सुविधा या फक्त लष्करातील जवान, सुरक्षा दलातील विविध हुद्द्यांवर असणारे अधिकारी, कर्मचारी यांच्यापुरताच मर्यादित असतात. पण, शेवटी हाच प्रश्न की, इथं मिळणारी उत्पादनं इतक्या सवलतीच्या दरात विक्री करणं कसं परवडतं? 

भारतीय लष्करातील जवानांसाठी सुरु करण्यात आलेल्या कॅन्टीन स्टोर्स डिपार्टमेंटमध्ये लष्कराच्या सेवेत असणाऱ्या आणि निवृत्त अधिकारी, जवानांसह विविध हुद्द्यांवरील अनेकांनाच घसघशीत सवलती मिळतात. सध्याच्या घडीला जवळपास 13.5 मिलियन म्हणजेच 1 कोटी 30 लाखांहून अधिक जवान या सवलतीचा फायदा घेत आहेत., 

सर्वसामान्यांना करता येते इथून खरेदी? 

आर्मी कॅन्टीनच्या वतीनं लष्कराच्या जवानांसाठी स्मार्ट कार्ड जारी केलं जातं. याच कार्डचा वापर करून इथं खरेदी करता येते. या कार्डचेही दोन प्रकार असतात, ज्यामध्ये एक असतं ग्रॉरी आणि दुसरं असतं लिकर कार्ड. 

ग्रॉसरी कार्डच्या माध्यमातून किराणा, विद्युत उपकरणं अशा वस्तूंची खरेदी करता येते. तर, लिकर कार्डवर मद्याची खरेदी करता येते. राहता राहिला प्रश्न इथं सामान्य नागरिकांना खरेदी करता येते का? तर याचं उत्तर आहे नाही. कारण, कॅन्टीनची ही सुविधा फक्त लष्करी सेवेत असणाऱ्यांपुरताच सीमीत आहे. 

इतकं स्वस्त कसं मिळतं सामान? 

आर्मी कॅन्टीनमध्ये मिळणारं सामान इतकं स्वस्त कसं? असा प्रश्न तुम्हालाही पडतोय का? माध्यमांमध्येच प्रसिद्ध करण्यात आलेल्या एका वृत्तानुसार या ठिकाणी मिळणाऱ्या उत्पादनांवर सरकारकडून जीएसटीमध्ये 50 टक्क्यांची सवलत दिली जाते, ज्यामुळं इथं मिळणाऱ्या वस्तूंची विक्री इतक्या कमी दरात केली जाते. इथं उत्पादनं कमी दरात मिळत असली तरीही त्यांच्या खरेदीवर मात्र मर्यादा घालण्यात आली आहे. त्यामुळं इथं कोणीही अवाजवी खरेदी करू शकत नाही हेसुद्धा तितकंच महत्त्वाचं. 

हेसुद्धा वाचा : IT Raid in Nanded : व्यापारी कुटुंबाकडून 170 कोटींची मालमत्ता, 8 किलो सोनं, 14 कोटींची रोकड जप्त ; आयकर विभागानं 'असा' रचला सापळा 

कधी झाली आर्मी कॅन्टीनची सुरुवात? 

CSD अर्थात कॅन्टीन स्टोर्स डिपार्टमेंटची सुरुवात 1948 मध्ये झाली, जिथं दैनंदिन वापरातील गोष्टी उपलब्ध करून देण्यात आल्या. यामध्ये अन्नधान्यांपासून कपडे, बूट, उपकरणांचाही समावेश पाहायला मिळाला. महत्त्वाचे लष्करी तळ असणाऱ्या ठिकाणी हे आर्मी कॅन्टीन असून, ते लष्करातील मंडळीच चालवतात. सध्याच्या घडीला भारतात असे साधारण 3700 आर्मी कॅन्टीन युनिट आहेत.