'तुम्ही आता 50 चे झालात, जोडीदार शोधा अन्यथा...', ओवेसींचा राहुल गांधींना टोला, 'हा एकटेपणा...'

काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी तेलंगणात प्रचारसभेत बोलताना बीआरएस, भाजपा आणि एमआयएम हे सर्वजण एकच असल्याचं म्हटलं होतं. त्यावर व्यक्त होताना एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी टीका केली आहे.    

शिवराज यादव | Updated: Nov 28, 2023, 01:20 PM IST
'तुम्ही आता 50 चे झालात, जोडीदार शोधा अन्यथा...', ओवेसींचा राहुल गांधींना टोला, 'हा एकटेपणा...' title=

तेलंगणात सध्या निवडणुकीचा हंगाम असल्याने राजकीय नेत्यांकडे एकमेकांवर शाब्दिक प्रहार केले जात आहेत. काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी एका प्रचारसभेत बोलताना एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी एकमेकांचे मित्र असल्याचा दावा केला होता. यानंतर असदुद्दीन ओवेसी यांनी राहुल गांधींना प्रत्युत्तर दिलं असून थेट त्यांच्या लग्नाच्या मुद्द्यालाच हात घातला आहे. एकटेपणा तुम्हाला सतावत असेल असा टोला त्यांनी लगावला आहे. 

"राहुल गांधी तुम्ही बोलण्याआधी जरा विचार करा. तुम्ही वयाची 50 शी ओलांडली आहे. एकटेपणा तुम्हाला सतावत असेल. हा तुमचा निर्णय आहे. आम्ही कोणाच्याही खासगी आयुष्यात दखल देऊ इच्छित नाही. आम्ही कोणालाही त्रास देऊ इच्छित नाही. पण जर आम्हाला छेडलं, तर आम्ही सोडणार नाही," असं असदुद्दीन ओवेसी राहुल गांधीच्या दाव्यावर म्हणाले आहेत.

राहुल गांधी यांनी तेलंगणात 25 नोव्हेंबरला झालेल्या सभेत भारत राष्ट्र समितीचं सरकार भ्रष्टाचारी असल्याची टीका केली होती. तसंच बीआरएस, भाजपा आणि एमआयएम सगळे एकच असल्याचा आरोप केला होता. "मोदींचे आहेत दोन यार, ओवेसी आणि केसीआर," असं राहुल गांधी म्हणाले. पुढे ते म्हणाले होते की, "केसीआर यांनी नरेंद्र मोदींना पंतप्रधान करायचं आहे आणि मोदींना केसीआर मुख्यमंत्रीपदी हवे आहेत," असाही आरोप राहुल गांधींनी केला होता.

काँग्रेस पक्षाने आधी तेलंगणात बीआरएस आणि नंतर केंद्रातील मोदींच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारचा पराभव करण्याचं उद्दिष्ट समोर ठेवलं आहे असं राहुल गांधी यावेळी म्हणाले. तेलंगणा विधानसभा निवडणुकीत काँग्रेस प्रचंड बहुमताने विजयी होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. 

तेलंगणात 119 सदस्यीय राज्य विधानसभेसाठी 30 नोव्हेंबर रोजी मतदान करणार आहे. छत्तीसगड, मिझोराम, मध्य प्रदेश आणि राजस्थानसह तेलंगणाचा निकाल 3 डिसेंबरला जाहीर होईल.